Russia-Ukraine war : युद्धाची वर्षपूर्ती | पुढारी

Russia-Ukraine war : युद्धाची वर्षपूर्ती

युद्ध सुरू झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच युक्रेनला चिरडण्यात रशिया यशस्वी होईल, हा जागतिक पातळीवरचा समज चुकीचा ठरवत युक्रेनने चिवटपणे प्रतिकार केल्याने एक वर्षानंतरही हे युद्ध संपलेले नाही. ते संपवण्यात रशियाला यश आलेले नाही. उलट मधल्या काळात युक्रेनच्या सैन्याने प्रतिहल्ला करून रशियाने बळकावलेला भूभाग परत मिळवण्यात यश मिळवले. हे युद्ध आणखी किती काळ चालणार, याचा अंदाज कुणालाच येत नाही. चार दिवसांपूर्वी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी पोलंड दौर्‍यावर असताना अचानक युक्रेनला भेट देऊन सगळ्या जगाला आश्चर्यचकित केले.

अमेरिका आणि संपूर्ण जग युक्रेनच्या मागे खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही त्यांनी दिली. त्यामुळे युक्रेनचा आत्मविश्वास शतपटीने वाढला आहे. युद्ध सुरू होताना अमेरिकेसह पाश्चिमात्य देशांनी युक्रेनला एकटे पाडल्याचे चित्र होते; परंतु युद्ध पुढे जाईल तसतशी युक्रेनला मिळणारी मदत वाढत गेली आणि त्याचमुळे युक्रेन एक वर्षानंतरही युद्धभूमीवर टिकून आहे. याउलट रशियाच्या अपेक्षेप्रमाणे यश मिळत नसल्यामुळे व्लादिमीर पुतीन यांच्या नेतृत्वाबाबतही प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

आधीच रशियात युद्धाला विरोध करणारा एक गट सक्रिय असताना आता युद्धाच्या बाजूने असणार्‍या लोकांचाही पुतीन यांच्याप्रती रोष वाढू लागला आहे. युद्धामुळे होणारे दोन्हीकडील सैनिकांचे मृत्यू, सर्वसामान्य नागरिकांचे जाणारे बळी, संपत्तीची बेसुमार हानी या सगळ्या गोष्टी जगाच्या द़ृष्टीने चिंताजनक आहेत. त्यामुळे युद्ध थांबावे, असे सर्वसामान्य नागरिकांना कितीही वाटत असले, तरी त्याद़ृष्टीने कोणत्याही पातळीवर ठोस प्रयत्न होताना दिसत नाहीत. या युद्धाची झळ संपूर्ण जगाला अनेक पातळ्यांवर सोसावी लागत आहे. शिवाय नुकसान फक्त युक्रेनचेच झालेले नाही, तर रशियालाही मोठी किंमत चुकवावी लागली आहे. रशियाचे हजारो सैनिक जखमी झाले आहेत.

रशियाने अफगाणिस्तान युद्धात जेवढे सैनिक गमावले, त्याहून अधिक सैनिकांचे प्राण युक्रेनविरोधातील युद्धात पहिल्या सहा महिन्यांत गमावावे लागले, तरीही पुतीन माघार घेण्यास तयार नाहीत आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांची झुकण्याची तयारी नाही. बायडन यांच्या आधी अनेक देशांच्या प्रमुखांनी युक्रेनला भेट दिली आहे. युक्रेनने 31 वा स्वातंत्र्यदिन साजरा केला, त्यानिमित्ताने बि-टनचे माजी पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी युक्रेनची राजधानी कीव्हला भेट दिली. युरोपीय राष्ट्रे युक्रेनसोबत असल्याचे दाखवण्यासाठी अशा भेटी आवश्यक असल्या, तरी रशियासारख्या महासत्तेशी लढण्यासाठी तेवढे पुरेसे नाही. रशियाविरुद्धच्या युद्धात नाटो राष्ट्रे आपल्या बाजूने थेट युद्धात उतरतील, असे युक्रेनच्या अध्यक्षांना प्रारंभी वाटत होते. परंतु, त्याबाबत भ-मनिरास झाला, तरी हिंमत न सोडता ते लढत राहिले आणि आज त्यांच्या बाजूने अनेकजण उभे आहेत.

रशियाची वर्चस्ववादी आणि विस्तारवादी वृत्ती युक्रेनच्या स्वाभिमानाला मान्य होणारी नसली, तरी मुद्दाम होऊन रशियाला खिजवण्याएवढी युक्रेनची ताकद आधीही नव्हती आणि आजही नाही; परंतु अमेरिका, बि-टन, फ्रान्ससारख्या तीस राष्ट्रांचा समावेश असलेल्या ‘नाटो’ संघटनेने भरीस घातल्यामुळे युक्रेन रशियापासून दुरावत आणि पाश्चिमात्य राष्ट्रांच्या जवळ गेला. बलदंड राष्ट्रांच्या संपर्कात राहून आपणही त्यांचाच भाग असल्याचा भ-म युक्रेनला होऊ लागला. त्यातूनच युक्रेनने युद्ध ओढवून घेतले. हल्ला करण्याआधी रशियाला इशारे देणार्‍या आणि युक्रेनच्या पाठिशी ठामपणे उभे असल्याचा देखावा करणार्‍या राष्ट्रांनी प्रत्यक्ष हल्ल्यानंतर मात्र सोयीस्कर पलायनाची भूमिका घेतली. युक्रेन हा ‘नाटो’चा सदस्य नसल्यामुळे रशियाविरुद्धच्या युद्धात अमेरिका किंवा कुठल्याही ‘नाटो’ राष्ट्रांचा संबंध नसल्याचे सांगून या बड्या राष्ट्रांनी हात वर केले.

युक्रेनसाठी हा मोठा धक्का असला, तरी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी परिस्थितीपुढे न डगमगता लढाऊ बाण्याने संघर्ष सुरू ठेवला. या युद्धामुळे रशियाच्या आर्थिक पायाला कितपत धक्का पोहोचला, हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. रशियातील जनतेला कितपत झळ पोहोचली किंवा पुतीन यांच्या लोकप्रियतेवरही नेमका काय परिणाम झाला, यासंदर्भातील निष्कर्षही बाहेर आलेले नाहीत. पुतीन यांना समर्थन देणार्‍या रशियातील जनतेला युद्धाची झळ पोहोचावी, यासाठी युक्रेन आणि त्यांच्या समर्थकांकडून प्रयत्न सुरू आहेत. रशियावरील निर्बंध वाढवण्याच्या द़ृष्टीने प्रारंभी काही पावले टाकण्यात आली. त्याबाबत आजही व्यापक पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. रशियन पासपोर्टधारकांना युरोपचा व्हिसा दिला जाऊ नये, असाही एक विचार पुढे आला होता; परंतु त्यासंदर्भात युरोपीय देशांमध्ये एकमत होत नव्हते. युद्धामुळे जागतिक राजकारणावर तसेच अर्थकारणावरही व्यापक परिणाम झाले आहेत. भारतासाठी तर एकूण परिस्थिती आव्हानात्मक होती.

एकीकडे जागतिक राजकारणात अमेरिकेसोबतचे सुधारलेले संबंध आणि दुसरीकडे रशियासारखा जुना मित्र होता. रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जग दोन गटांमध्ये विभागले असताना युद्धामध्ये कोणतीही बाजू न घेणार्‍या भारतासारख्या देशाची अनेक आघाड्यांवर अडचण झाली; परंतु परराष्ट्र धोरणासंदर्भातील ठामपणा घेऊनच भारताची वाटचाल सुरू राहिली. ज्या गटाला रशिया आपला विरोधक मानतो त्या ‘क्वाड’मध्ये भारताचा सहभाग आहे आणि अमेरिकेला जो गट आवडत नाही, त्या ‘बि-क्स’मध्येही आहे. दोहोंमधील समन्वय राखण्यात भारताने यश मिळवले आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांच्याशी अनेकदा दूरध्वनीवरून चर्चा केली. मोदी यांनी रशिया-युक्रेनमधील युद्धासंदर्भात भारताच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला आणि संवाद-समन्वयातून मार्ग काढण्याची भारताची भूमिका ठामपणे मांडली. अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीतही देशाने समन्वयाची भूमिका सोडलेली नाही, हे विशेष! परराष्ट्र धोरणामधील हा ठामपणा जागतिक पातळीवर भारताला नवी ओळख मिळवून देईल, यात शंका नाही.

Back to top button