लवंगी मिरची : नसती कटकट | पुढारी

लवंगी मिरची : नसती कटकट

शपथ तुम्हाला सांगते ताई, जसे हे नगरसेवक झाले तसे आमच्या घराची मुन्शीपाल्टी झाली बघ.
तुझं काय सांगतेस ? माझ्या घरी पण तसेच झाले आहे. आपण आपला व्यापार करावा, व्यवसाय करावा, इलेक्शन काय येत राहते, जात राहते. उभे राहिले आणि निवडून पण आले. ह्यांना मतदान करणारे ते मतदार पण धन्य आहेत.

ताई, नगरसेवक झाल्यापासून माझा नवरा माझा राहिला नाही गं. झोपेतसुद्धा गुत्तेदार आले का? चेक वटला का नाही? अधिकार्‍याला बघून घेतो, असे बडबडत असतात. घरादाराकडे, बायको पोरांकडे लक्ष नाही. अगं, परवा म्हटलं शाळेत डबा नेऊन द्या, तर जाऊन उभे राहिले चौथीच्या वर्गापुढे. सर म्हणाले, तुमचा पोरगा आता सातवीत गेला आहे तिकडे जा. म्हणजे आपले लेकरू कोणत्या शाळेत, कोणत्या वर्गात शिकत आहेत हे पण नीट माहीत नाही ह्यांना.

हे निवडून आल्यामुळे सगळ्या घराची काशी झाली आमच्या. आमचे हे तर जसे निवडून आले, तसे आमदार झाल्यासारखा रूबाब करायला लागले आहेत. मागे एक अविश्वास ठराव आला होता. ते लोक ह्यांना घेऊन गेले फिरायला. सोलापूर, कोल्हापूर, हैदराबाद कुठे कुठे जाऊन आले. पंधरा दिवस तिकडेच होते. फोन लागत नाही की, संपर्क होत नाही. शेवटी एके दिवशी कसे बसे परत आले तेही वरात मिरवीत. अविश्वास ठराव झाला आणि किती पैसे मिळाले हे त्यांचे त्यांनाच माहीत; पण महिनाभर घराकडे लक्ष नाही.

अगं, परवा तर कोणत्या तरी गुत्तेदाराचा चेक निघाला नाही म्हणून खूप भांडले म्हणे नगरपरिषदेत. आता मला सांग ताई, गुत्तेदाराचा चेक निघाला नाही तर ह्यांना काय करायचे आहे? त्याचा संसार कसा चालवायचा तो बघून घेईल ना? सकाळी हे उठायच्या आधी ते गुत्तेदार लोक हजर असतात. त्यांची चर्चा चालते बारा-एक वाजेपर्यंत. घातले कपडे टापटीप की निघाले हिंडायला

कशाचं सुख आणि कशाचं दुःख. कशाच्या गोष्टी नाही, घरामध्ये लक्ष नाही. माझं डोकंच काम करत नाहीये गं. मला म्हणाले की, पुढच्या टायमाला जर समजा महिला आरक्षणामध्ये आपला वॉर्ड गेला तर तुला उभे राहावे लागेल. माझ्या तर बाई अंगावर काटाच यायला लागलाय. म्हणजे उद्या मी होणार नगरसेवक आणि हे बघणार कारभार. सगळी जिंदगी याच्यामध्ये जाते की काय, असं वाटायला लागले आहे. आता त्याच्यापेक्षा मला वाटते की, पुढच्या इलेक्शनला हे पडले तर बरेच होईल.आपणच काहीतरी गेम करावा आणि वॉर्डमधील लोकांना सांगावे की, या माणसात काही कर्तबगारी नाही, याला निवडून देऊ नका. तरच आपल्या संसाराचे काही खरे आहे. नाही तर संसाराचं सगळं वाटोळं झालंच समज.

आता संसाराचं काय वाटोळं व्हायचं राहिलं आहे? सगळा विस्कोट झालाय. परवा माझी आई आणि बाबा आले होते पाच-सहा दिवस राहण्यासाठी. जावयाला भेटायचे म्हणून नाद लावला होता. सात दिवसांमध्ये यांना एकदाही टाईम भेटला नाही सासू-सासर्‍याला भेटायला. सकाळी जे गायब व्हायचे ते रात्री एक वाजताच घरी परत. काय करतात काय नाही, माहीत नाही. त्यांना वाटते आपले आमदारकीचे तिकीट पक्के आहे. कशाची आमदारकी आणि कशाची खासदारकी घेऊन बसलेत काय माहीत. पाच-पंचवीस माणसं बरोबरच असतात. ती माणसं पण अशी की, बघितल्याबरोबर डेंजर वाटतात.

वाचव गं जगदंबे माझा संसार. पुढच्या इलेक्शनमध्ये पाड ह्यांना.
नुसतं बोलून उपयोग नाही. लाग कामाला. निघते मी. 

Back to top button