पारंपरिक शेती टिकवा | पुढारी

पारंपरिक शेती टिकवा

वाढत्या लोकसंख्येची भूक भागवण्यासाठी जनुकीय बदल केलेले सुधारित बियाणे आपल्याला आवश्यक आहेत का? असा प्रश्न निर्माण होत आहे. मानवी गरजा पूर्ण करण्यासाठी पारंपरिक बियाणांच्या उत्पादनाऐवजी बियाणांच्या डीएनएमध्ये बदल करून जीवजंतूंपासून तयार झालेले जीएम फूड्ससाठी आनुवंशिक अभियांत्रिकीची पद्धत वापरण्याचा विचार शाश्वत विकासाच्या आधारावर केला जात नाही असे वाटते.

1988 मध्ये आनुवंशिकरीत्या बदल केलेल्या सूक्ष्मजीव संप्ररके अन्न उत्पादनात वापरण्यासाठी प्रथम मान्यता देण्यात आली. जीएम फूडची व्यावसायिक विक्री 1994 मध्ये सुरू झाली. प्रतिकारशक्ती वाढवणे आणि पोषक तत्त्वांसाठी रोगजनक आणि उत्कृष्ट लक्ष्यासह जगण्याची क्षमता वाढविणे याची क्षमता जीएम पिकांमध्ये असणे आवश्यक आहे. केवळ चार मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्या 75 टक्के जीएम बियाण्यांवर नियंत्रण ठेवतात. मानवकेंद्रित विचार करून केवळ विकासासाठी जीएम बियाण्यांचा वापर सध्या कपडे, औषधे आणि इंधन या क्षेत्रांत होत आहे. मात्र, त्याची शाश्वत वाढ दिसून येत नसल्याचे दिसून आले आहे. जीएम बियाण्यांमागील उद्देश नफा वाढवणे आणि कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळवणे हा आहे.

आज उगवलेल्या जीएमओ पिकांचा विकास शेतकर्‍यांसाठी केला जात आहे. त्यांच्या पिकाची नासाडी, तण नियंत्रण आणि अन्नाची हानी रोखण्यासाठी जीएम बियाण्यांचा वापर करण्यात आला आहे, यात शंका नाही. मानवाला केंद्रस्थानी ठेवून जीएम पिकांचे काही फायदे विकसित केले जातात. यामध्ये अन्न आणि औषध उत्पादनासाठी कमी खर्चात पीक उत्पादनात वाढ करणे, कीटकनाशकांची गरज कमी करणे, विशेषतः वर्धित पोषक रचना आणि अन्न गुणवत्ता राखणे, कीटक आणि रोगांचा प्रतिकार आणि जगातील वाढत्या लोकसंख्येसाठी अन्नसुरक्षा यावर काम करणे यामध्ये अपेक्षित आहे.

संबंधित बातम्या

आपल्याला हे समजले पाहिजे की, पिकांमध्ये जीएम जीन्स, काही संभाव्य जोखीम आणतात. यामध्ये माणूस, इकोसिस्टम आणि सभोवतालच्या वातावरणातील इतर जीवांचाही समावेश होतो. सामान्य वैशिष्ट्ये, जीएमओ पिकांमध्ये आढळतात. विशिष्ट हानिकारक कीटकांचा प्रतिकार, तण नियंत्रित करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या काही तणनाशकांची सहनशीलता, वनस्पती विषाणूंचा प्रतिकार यांचा यात समावेश आहे.

शेतकरी हा जीएमओमधून सर्वाधिक लाभ घेणारा समुदाय आहे, असे चित्र तयार केले आहे. मात्र, प्रत्यक्षात याचा फायदा बियाणे कंपन्या, रासायनिक कंपन्या आणि बायोटेक कंपन्यांना सर्वाधिक झाला आहे. कारण, जीएम बियाणे आणि आनुवंशिक नवकल्पना यांचे पेटंट घेतले जातात आणि शेतकर्‍यांना दरवर्षी ते पुन्हा पुन्हा ते खरेदी करावे लागत आहेत. जीएम पीक आणि बियाणांचा वापर वाढल्याने आपले अवलंबित्व काही मोजक्याच बियाणांवरच राहणार आहे.

बहुराष्ट्रीय कंपन्या आपल्या बियाणांचे उत्पादन वाढवतील आणि स्थानिक बियाणांचा नाश होईल. यामुळे नैसर्गिकरीत्या विकसित झालेले बियाणे धोक्यात येतील. आपल्या जैवविविधतेत बदल आणि खाण्याच्या सवयी बदलतील. तसेच जैवविविधतेवर घातक परिणाम होतील. यामध्ये कीटकांच्या जैवविविधता, अन्य पिकांवर किंवा प्राण्यांवर अनपेक्षित परिणाम होतो. तसेच यामुळे आक्रमक तणांच्या प्रजातींना मारणे कठीण होणार आहे. जीएमओ जनुकांचे जंगली वनस्पती आणि प्राण्यांमध्ये नकळत संक्रमण होण्याची भीती तर आहेच; शिवाय आनुवंशिक अभियांत्रिकी अन्नामुळे उद्भवणारे अनपेक्षित परिणाम आणि आरोग्याचे धोके आहेत. विषाक्तता हे त्याचे एक कारण आहे.

कारण, आनुवंशिकरीत्या अभियांत्रिकी अन्न हे स्वाभाविकपणे अस्थिर असतात. यात अ‍ॅलर्जी, प्रतिजैविक प्रतिकार, रोगप्रतिकारक शक्ती, कर्करोग, संपूर्ण पोषण कमी होणे, वंध्यत्व अशा समस्यांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. सरकारने मोहरी बियाण्यास मान्यता दिली आहे. एकदा परवानगी दिली की, जीएम फूडचा समावेश असलेले अन्न अन्नसाखळीत प्रवेश करेल. यामुळे प्रत्येक सजीवाच्या निरोगी जगण्यावर परिणाम होण्याची भीती आहे.

शेतात सुपीकता आणण्याचे पारंपरिक मार्ग स्वीकारण्याची गरज असून, त्यामुळे निश्चितपणे आपल्या पिकांचे उत्पन्न वाढेल. विविध रोगांना दूर सारून आणि निरोगी अन्नाद्वारे संतुलित पोषण आपल्या देशाला आणि पृथ्वीला निरोगी बनवेल. पुढच्या पिढीला निरोगी बनवण्यासाठी स्थानिक बियाणे बँक तयार करण्याची गरज आहे. भावी पिढीचे भविष्य ठरवण्याचा अधिकार सरकारकडे आहे. आणि म्हणून त्यांच्याकडे सर्वांगीण विकासाचा विचार करून शाश्वत दृष्टिकोन असण्याची आवश्यकता आहे.

-सिद्धार्थ शिंदे

Back to top button