कसरत सर्वांचीच | पुढारी

कसरत सर्वांचीच

यंदा काही ठिकाणी बैलगाडा शर्यती होताहेत वाटतं. है शाबाश्श! आता कसं बरं वाटतंय.
तुम्हाला का बरं वाटावं गाववाले?
तसल्या शर्यतींची मजा असते. दणकट, रुबाबदार जित्राबं बघायला मिळतात. गावात कसं चैतन्य पसरतं. तसंही ट्रॅक्टर आल्यापासून बैलांचं कौतुक कमीकमीच होत चाललंय. शर्यतीच्या निमित्ताने त्यांच्याकडे पुन्हा थोडंतरी लक्ष दिलं जाईल.
तसंतुम्हा शहरी लोकांना वाटत असेल. आम्ही गाववाले तर वाट बघत असतो अशा शर्यतींची. बाकी गाड्यांच्या शर्यतींची मजा तुम्हाला काय माहिती?

का? शहरामध्ये आमच्या गाड्यांच्या शर्यती नसतात असं वाटतं की काय तुम्हाला?
शहरात बैलगाडा शर्यत कशी असेल?
तेवढे बैल वजा केलेत तर एरवी आमच्या रस्त्यारस्त्यांवर गाड्यांच्या शर्यती सारख्या सुरूच असतात बरं का. पळा, पळा, कोण पुढे पळतो, असं म्हणत डावंउजवं विसरत, सिग्नल धाब्यावर बसवत सगळे लोक गाड्या पळवत असतात.
असणारच. तुम्हा लोकांच्या गाड्या एकाहून एक उंची! यंत्राच्या ताकदीने वेगाने पळणार्‍या!
हो. म्हणजे आम्ही खरेदी करतो तेव्हा त्या उच्च दर्जाच्या, वेगवान वगैरे असतात; पण लवकरच आमच्या शहरी रस्त्यांमुळे त्यांना बैलगाड्यांची, खटार्‍यांची वगैरे कळा येते. हॉर्न सोडून सगळे पार्ट वाजायला लागतात गाड्यांचे.
इतके खराब आहेत तुमच्याकडले रस्ते?
खूप ठिकाणी मुळात रस्तेच नाहीत, असले तर त्यांच्यात खड्डे, खडबड, खणाखणी ह्यातून सलग पाच-दहा फूटही गुळगुळीत रस्ता मिळत नाहम.

पावसाळ्यात होत असेल ही स्थिती!
नाही, बारा महिने हेच सुरू असतं. तुमच्या त्या बैलगाडा शर्यती निदान वर्षातून ठराविक हंगामात होत असतील नाही का?
हो तर. पुणं, नगर वगैरे जिल्ह्यांमध्ये खास जत्रा, यात्रांच्या दिवसात होतात शर्यती.
आमच्याकडे शहरात बारोमास रस्त्यावरल्या शर्यती, रेसेस बघायला मिळतात.
माणसं आणि बैल हे वेगवेगळे चालक असतील दोन्हीकडे, हे तरी मान्य कराल?

हो, म्हणजे जन्माने माणसं असलेलेच दुचाक्या, चारचाक्या वगैरे चालवू शकतात हे तर खरंच आहे; पण शहरी नोकरी-उद्योगाचं जू सगळ्यांच्याच मानेवर असतं. आणि शहरातली अंतरं, रोजची धकाधक ह्यामुळे सगळे घाण्याच्या बैलासारखंच जगायला लागतात हेही खरं!
असतं तर! फार असतं! शेवटी कसंय, माणसांकडून प्राण्यांची दयाबिया तरी केली जाते थोडीफार; पण माणसांची दया थोडीच करतं कोणी? सांगायचा मुद्दा एवढाच की, बैलगाडा शर्यत हा विषय आमच्या शहरी लोकांच्याही जिव्हाळ्याचा आहे. त्या ठिकाणी घाटाचा राजा, झुंझारश्री वगैरे किताब देता जिंकणार्‍या बैलांना तसेच माणसांनाही द्यायला लागा हळूहळू. एवढी जिवापाड वाहनं पळवणार्‍यांना कधीतरी दाद द्यायला नको?

Back to top button