या गणराया, विघ्न हराया…!

संग्रहित
संग्रहित
Published on
Updated on

गणरायाचे आगमन होत आहे आणि सामूहिक लोकजीवनात आनंदाचे चैतन्य उभे राहत आहे. गणरायाचे स्वरूप तीन भूमिकांतून व्यक्‍त होते. पहिले म्हणजे 1) तत्त्वरूप गणेश 2) नादरूप गणेश आणि 3) भावरूप गणेश. त्याचे तत्त्वरूप हे ज्ञानदर्शी आहे. नादरूप हे कला आणि शब्ददर्शी आहे.

तर भावरूप हे लोकदर्शी आहे आणि या तिन्हींचे एकरूपत्व हेच त्याचे भक्‍तिदर्शन आहे. व्यापक लोकजीवनात श्रद्धेचे स्थान असणार्‍या गणरायाचे वेद, उपनिषदे, पुराणे, संस्कृत स्तोत्रे, संतसाहित्य, लोकसाहित्य आणि लोककथांमधून वर्णिलेले गणेशाचे रूप प्रथम समजून घ्यावे लागेल. गणेशाचे सांप्रत रूप केव्हा आणि कसे निश्‍चित झाले, हे त्यातून ज्ञात होऊ शकते.

श्री गणेशाचे स्वरूप आणि परंपरा हा भारतीय दैवतशास्त्र संस्कृती, भक्‍तिपंथ, सारस्वत आणि कलासंप्रदाय या सर्वांशी जोडला गेलेला विषय आहे. एवढे लोकप्रिय दैवत युगायुगाच्या स्थित्यंतरणामुळे नुसते टिकून राहिले नाही, तर प्रत्येक कालखंडात गणेश महिमा वाढत गेला आणि अगदी आजच्या काळापर्यंत अध्यात्मिक आणि सांस्कृतिक भूमिकेतून, लोकजीवनात नवे नवे चैतन्य निर्माण करू लागला.

गणेशोत्सवाच्या माध्यमातून वर्तमानस्थितीत गणपती हा सार्वजनिक स्वरूपात देशाच्या सीमा ओलांडून परदेशातही गेला आणि सामूहिक लोकमनाचे श्रद्धास्थान होऊन बसला. 'निर्विघ्नं कुरू मे देवः' म्हणजे कोणत्याही कार्यातील विघ्नेे नाहीशी करणारा विघ्नहर्ता ठरला.

गणेशपुराणे, गणेशगीता, गणेशसहस्रनाम, गणेशस्तोत्रे, गणेशमंत्र-तंत्रविधाने, गणपती अथर्वशीर्ष अशा विविध ग्रंथवाङ्मयातून गणपती महात्म्य वर्णिले आहे. श्री गणेश हा गणांचा ईश आहे. समूहमनाचा देव आहे. तोच ज्ञानदाता आहे. गणेशपुराणाबरोबर मुदगलपुराण, ब्रह्मवैवर्तातील गणेश खंड, भविष्यातील ब्राह्मखंड, गणेशतापिनी, गणेशहेरंबोपनिषद, स्कंदपुराणातील काशीखण्डान्तर्गत विनायक महात्म्य, गणेशभागवत इ. ग्रंथांमधून गणेशविषयाचे विपुल साहित्य उपलब्ध आहे.

अथर्ववेदांत 'गणपत्यथर्वशीर्ष' नावाचे एक उपनिषद विद्यमान आहे, तर ऋग्वेदातील ब्रह्मणस्पतीसूक्‍त हे गणपतीचेच सूक्‍त आहे. ब्रह्मणस्पती ही एक वैदिक देवता आहे. अथर्ववेदातला गणपती हा सर्वमान्य ठरला; पण वैदिक ब्रह्मणस्पती हा त्याचा पूर्वावतार आहे. कार्यारंभी जसे गणपतीला आवाहन करतो, तसेच आवाहन ब्रह्मणस्पतीचेही केले आहे आणि त्याच्याच मंत्रपरंपरेने 'गणानां त्वा गणपतिं हवामहे' हा ऋग्वेदातील गणपतीचा मंत्र गणपतीपूजेत स्वीकृत झाला.

'समुदायाचा प्रभू म्हणून तू गणपती, ज्ञानी जगात तू अत्यंत ज्ञानी, कीर्तिवंतांमध्ये वरिष्ठ, तूच राजाधिराज. तुला आम्ही आदराने बोलावतो. तू आपल्या सर्व शक्‍तींसह ये आणि आसनावर विराजमान हो,' असे आवाहन ऋग्वेदात केले आहे. श्री गणेशाला वैदिक वाङ्मयात किंवा पुराण वाङ्मयात जेवढे स्थान मिळाले त्याहून अधिक मोठे स्थान लोकवाङ्मयात मिळाले. पुराणातील गणपती जेव्हा लोककलेत आला आणि आपले दैवी अलौकिकत्व विसरून लोकजीवनाशी एकरूप होऊन ऋद्धी-सिद्धीसह नर्तन करू लागला, तेव्हाच गण, गणेशाच्या लोककथा, आख्याने, गणेशलीला सांगणारी लोकगीते यांसारख्या साहित्य प्रकारांतून एक प्रकारे लोकवाणीतील गणेशाचे लोकपुराणच जन्माला आले आणि श्री विठ्ठलाप्रमाणे गणेशालाही महाराष्ट्राचा लोकदेव म्हणून स्वीकारले गेले.

लोकवाणीतील गणेश हे त्याचे उत्कट भावदर्शन होय. तत्त्ववेत्त्यांनी त्याला तत्त्वाच्या तळाशी आणि नादाच्या मुळाशी नेऊन बसविले आहे व तात्त्विक तत्त्वांना घेऊन रूपकात्मक गणपती उभा केला आहे. ज्ञानदेवांनी ज्ञानेश्‍वरीची सुरुवात 'ॐ नमोजी आद्या' अशी करून गणेशाचे ओंकाररूप वर्णिले आहे. विश्‍ववृक्षाचा नामरूपरंगमय विकास व विस्तार हा 'ॐ' या ध्वनिबीजाने होतो. ॐकारापासून निघालेल्या वर्णमालेतील प्रत्येक अक्षर आणि ध्वनिशक्‍तिगर्भ आहे. या ओंकाराला पदार्थसृष्टीमध्ये आणण्याचे काम गणेश मूर्तीने केले आहे. ज्ञानदेव म्हणतात,

अकार चरणयुगुल।
उकार उदर विशाल।
मकार महामंडल।
मस्तकाकारे॥

'अ'कार म्हणजे गणपतीने घातलेले पद्मासन, 'उ'कार म्हणजे विशाल पोट आणि 'म'कार म्हणजे त्याचे मस्तक. अकार, उकार आणि मकार या तिन्हींचा एक मेळ झाला की, जो ॐकार होतो त्यात सर्व वाङ्मयविश्‍व सामावते. ज्ञानदेवांनी त्याला तत्त्वरूपात मांडले आहे. चारी वेद हे त्याचे शरीर आहे. स्मृती हे त्या शरीराचे अवयव आहेत. अठरा पुराणे हे त्याच्या अंगावरील रत्नजडित अलंकार आहेत.

शब्दांची छंदोबद्ध रचना ही त्याची कोंदणे आहेत. काव्य आणि नाटके ही त्याच्या पायातील घागर्‍या आहेत आणि साहित्यरत्नांना घेऊन तो नर्तन करीत आहे.

ज्ञानदेवांनी त्याला 'स्वसंवेद्य' म्हणजे स्वत:च 'ज्ञाता' म्हणजे जाणणारा आणि 'ज्ञेय' म्हणजे ज्याला जाणायचे तो, असा स्वत:च स्वत:ला जाणणारा आहे, असे संबोधले आहे. हे सारे ज्ञानदर्शन, तत्त्वदर्शन क्षणभर बाजूला ठेवून सामान्यांना गणेश भावला तो, 'सुखकर्ता, दु:खहर्ता वार्ता विघ्नाची… नुरवी' म्हणजे सुख देणारा, दु:ख हरविणारा आणि विघ्नाची वार्ताही न उरविणारा असा आनंदरूप देव.

कोणत्याही उत्सवाचे ' प्रेय' आणि 'श्रेय' हे दोन भाग असतात. लोकाचारातील मिरवणूक, आरास, सजावट, नृत्य, कार्यक्रम हा त्यातील 'प्रेय' भाग, तर उत्साहामागचे मूळ तत्त्व आणि जीवनदर्शन हा त्याचा 'श्रेय' भाग होय. लोकमान्य टिळकांनी 'प्रेय' आणि 'श्रेय' या दोन्ही भूमिकांतून हा उत्सव सुरू केला. गणराया यावर्षीचा गणेशोत्सवही कोरोनामुळे लोकोत्सव होत नसल्याने एका अर्थाने मुकाच आहे. परंतु,
तुज देखे जो नरू।
त्यासी सुखाचा होय संसारु।

ही गणेश भक्‍तांची श्रद्धा द‍ृढ आहे. तुझ्या द‍ृष्टीतही सुखाची सृष्टी उभी करण्याचे सामर्थ्य आहे. तुझ्या सामर्थ्याला पुन्हा प्रकट कर, विघ्न हरू दे, सौख्य भरू दे, तुला आवाहन करताना आम्ही एवढेच म्हणू,
या गणराया विघ्न हराया!

– डॉ. रामचंद्र देखणे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news