संपर्कक्रांतीचे सीमोल्लंघन! | पुढारी

संपर्कक्रांतीचे सीमोल्लंघन!

देशातील मोबाईल ग्राहक दीर्घकाळ ज्या प्रतीक्षेत होते, त्या 5-जी सेवेचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले आणि देशाने संपर्कक्रांतीच्या एका नव्या युगात दमदार पाऊल टाकले. झपाट्याने बदलणार्‍या नव्या युगाने भारताच्या दरवाजावर थाप मारली असून, देशवासीयांसाठी पुढचा अनुभव म्हणजे अमर्याद आकाशात मुक्तविहारासारखा विस्मयकारक असेल, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. राजधानी दिल्लीतील इंडिया मोबाईल काँग्रेसमध्ये पंतप्रधानांनी या सेवेचा प्रारंभ केला. देशातील तेरा प्रमुख शहरांमध्ये सेवा सुरू होत असून, महाराष्ट्रातील मुंबई आणि पुणे शहरांत दिवाळीपर्यंत ही सेवा उपलब्ध होणार आहे.

येत्या वर्षभरात देशभर 5-जी सेवेचा विस्तार करण्याचे नियोजन आहे. 5-जी क्रांती ही केवळ तांत्रिक बाब नसून आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रांतही आमूलाग्र बदल घडविणारी असेल, त्यामुळे एकूण समाजजीवनावर या सेवेचे मोठे सकारात्मक परिणाम होतील, अशी अपेक्षा आहे. 5-जी सेवेमुळे 4-जीपेक्षा दसपट वेगाने इंटरनेट सेवा उपलब्ध होऊ शकेल. इंटरनेटच्या प्रारंभापासून रडतखडत 4-जीपर्यंत आलेल्या पिढीसाठी हा अनुभव अभूतपूर्व असेल. कारण, इंटरनेट सेवा प्रारंभीच्या काळात ज्या वेगाने उपलब्ध होत होती, त्यामध्ये त्या सेवेद्वारे करावयाच्या कामांपेक्षा ती उपलब्ध होण्यासाठी जो विलंब लागत होता, तो वेळ अधिक होता. त्यामुळे अनेकदा समोर ताटात पक्वान्न दिसताहेत; परंतु ती खाता येत नाहीत अशी इंटरनेटधारकांची अवस्था व्हायची. 4-जी सेवा आल्यानंतर परिस्थितीमध्ये फरक पडला असला तरी 5-जीचा अनुभव त्याहून वेगळा आणि अधिक गतिमान असेल. इंटरनेटचा वेग प्रचंड असेल आणि त्यामुळे चित्रपट, मोबाईल गेम्स, विविध अ‍ॅप्स कमीत कमी वेळात डाऊनलोड होऊ शकतील.

मोबाईलमध्ये इंटरनेटची गती वाढल्यामुळे त्याआधारे जी कामे केली जातात, ती सहज आणि सुलभ बनतील. ही सेवा मुंबई, पुण्यासह दिल्ली, चेन्नई, कोलकाता, बंगळुरू, चंदीगड, गुरुग्राम, हैदराबाद, लखनौ, गांधीनगर, अहमदाबाद आणि जामनगर या तेरा शहरांमध्ये सुरुवातीच्या काळात सुरू होत आहे. देशातील 130 कोटी जनतेला टेलिकॉम इंडस्ट्रीने दिलेली ही दसरा-दिवाळीची भेट मानली जाते. भारत या तंत्रज्ञानाचा केवळ ग्राहक असणार नाही, तर या तंत्रज्ञानाच्या आधारे भारत अनेक क्षेत्रांत मोठी झेप घेईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला असून, तो रास्त आहे. भविष्यातील वायरलेस तंत्रज्ञानाची रचना करण्यामध्ये, त्यासंबंधी उत्पादनामध्येही भारताची मोठी भूमिका राहणार आहे. ‘डिजिटल इंडिया’चा गजर सातत्यान केला जातो, तेव्हा ती केवळ सरकारी योजना नव्हे तर देशाच्या विकासाचा दृष्टिकोन असतो आणि 5-जी सेवेच्या आधारे त्या विकासपथावरून मार्गक्रमण करणे देशासाठी फायदेशीर ठरणार आहे. हे तंत्रज्ञान सामान्य लोकांपर्यंत पोहोचल्यानंतर त्यासोबत लोक काम करू लागतील तेव्हा सर्वसामान्य लोकांची जीवनशैलीही उन्नत झाल्यावाचून राहणार नाही.

5-जी क्रांतीचे ढोल वाजवले जात असताना इंटरनेट वेगाने मिळणार एवढेच सामान्य माणसांच्या लक्षात येते. कारण, त्यांनी आधीच्या संथपणाचा अनुभव असतो. 4-जी आल्यानंतर यू-ट्यूबसारख्या गोष्टींची उपलब्धता पाहिलेली असते. आणि त्यातला व्यत्ययही अनुभवलेला असतो. व्हिडीओ डाऊनलोड करताना होणारी रखडपट्टी पाहिलेली असते. आता हे सगळे पटापट होणार आहे, एवढाच या नव्या क्रांतीचा अर्थ सामान्यांना उमगलेला असतो. त्यापलीकडे तपशिलामध्ये जाऊन पाहायचे तर 4-जीमध्ये सरासरी इंटरनेटचा वेग 45 एमबीपीएस आहे, तर 5-जी नेटवर्कमध्ये हा वेग एक हजार एमबीपीएसपर्यंत जाईल. इंटरनेटचे जग पूर्णपणे बदलून जाईल. 4-जी नेटवर्कवर एखादा चित्रपट डाऊनलोड करण्यासाठी सहा मिनिटे लागतात, तिथे 5-जी नेटवर्कवर अवघ्या वीस सेकंदांत तो डाऊनलोड होईल. सरकारने स्थापन केलेल्या एका समितीच्या अहवालानुसार 5-जीमुळे 2035 पर्यंत भारतात एक ट्रिलियन डॉलरची आर्थिक उलाढाल वाढेल. आणखी एका अहवालानुसार 2026 पर्यंत जगभरात 3.5 अब्ज 5-जी कनेक्शन असतील, तर भारतात त्यांची संख्या 350 दशलक्षांपर्यंत पोहोचलेली असेल.

जगाच्या तुलनेत भारत इंटरनेटचा सर्वात मोठा ग्राहक आहे. अलीकडच्या काही वर्षांतील अभ्यासानुसार जगात सर्वाधिक ‘डेटा’ वापर भारतात सुरू आहे. 5-जीच्या काळात हा वापर आणखी वाढत जाईल, यात शंका नाही; परंतु दुसरीकडे या तंत्रज्ञानाच्या वेगाचा व्यक्तिगत, सामाजिक आणि सरकारी पातळीवर सकारात्मक उपयोग होण्याची आवश्यकता आहे. अलीकडच्या काळातील देशातील वास्तव पाहिले तर स्वस्तात ‘डेटा’ उपलब्ध झाल्यामुळे इंटरनेटचा अमर्याद वापर होत असला तरी त्यातील बहुतांश रिकामटेकड्यांच्या हातून होत असल्याचे दिसून आले आहे. वापरकर्त्यांमध्ये युवकांचे प्रमाण अधिक आणि त्यांना गुंतवून ठेवण्यात इंटरनेट सेवा यशस्वी झाली आहे. 5-जी सेवा ते काम अधिक प्रभावीपणे करू शकेल; परंतु युवकांकडून या सेवेचा सकारात्मक वापर होण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. शैक्षणिक क्षेत्रात नवनवी क्षितिजे काबीज करण्यासाठी इंटरनेट सेवा महत्त्वाची भूमिका बजावू शकते. जगभरातील उत्तमातील उत्तम शिक्षण इथल्या तरुणांना उपलब्ध करून देता येऊ शकते. शेती क्षेत्रामध्ये इंटरनेटची भूमिका महत्त्वाची राहिली. शेतकर्‍यांना शेती तंत्रज्ञानापासून बाजारभावापर्यंत अनेक बाबतीत अद्ययावत ठेवण्याची भूमिका इंटरनेटने पार पाडली. 5-जी सेवेमुळे शेतकर्‍यांसाठीही इंटरनेटची सुलभता वाढेल आणि त्याचा त्यांना निश्चित लाभ होऊ शकेल. व्यापार-उद्योग, विज्ञान-तंत्रज्ञान याही क्षेत्रांमध्ये 5-जी तंत्रज्ञान क्रांतिकारक भूमिका बजावू शकेल. स्वाभाविकच 5-जी सेवा उंबर्‍यापाशी येऊन ठेपली आहे. मुंबई, पुण्यापाठोपाठ येत्या वर्षभरात सगळीकडे ही सेवा उपलब्ध होईल. संपर्कक्रांतीचे हे सीमोल्लंघन विकासाच्या नव्या वाटा खुल्या आणि प्रशस्त करेल.

Back to top button