लवंगी मिरची : बदल की अद्दल? | पुढारी

लवंगी मिरची : बदल की अद्दल?

‘अच्छा. आज मस्त रपेट मारली. उद्या पण संध्याकाळी असेच भेटूया.’
‘बहुतेक जमणार नाही मला उद्या.’
‘का हो?’
‘घरी माणसं बोलावलीयेत कामाला. घरच्या सोफ्यांना, खुर्च्यांना सीटबेल्ट बसवून घ्यायचेत.’
‘काय सांगता? घरच्या सोफ्यांना सीटबेल्ट बसवायचे? हे काय भलतंच काढलंत?’
‘सुरक्षेसाठी. मागच्या सगळ्या खुर्च्या-कोचांना पर्मनंट बेल्ट बसवून घेतोच एकदाचे.’
‘त्याने काय होईल?’
‘पुढेमागे तसा नियम बशिवला सरकारने, तर आपली तयारी असेल. ऐनवेळी धावाधाव
नको.’
‘काय नसत्या कल्पना लढवताय राव?’
‘बेल्ट नसतील त्यांना सरळ दंड ठोका, असं फर्मान कोणी काढलं तर?’
‘असे कशालाही बेल्ट कसे बशिवणार मिष्टर? सगळ्या खुर्च्यांना सोय नसेल तशी.’
‘तशी तर आमच्या गाडीलाही नाहीये सोय, फार जुनी आहे ना ती? तेव्हा मुळी सीटबेल्ट नसायचेच. आता कायद्याप्रमाणे मागच्या शिटांवर सीटबेल्ट कंपल्सरी केल्येत, ते लावा नाहीतर दंड भरा. काय परवडणार, सांगा.’
‘आपल्याकडे नवनवे नियम लावायचा जेवढा उत्साह आहे, तेवढा जुने नियम पाळायचा उरक नाहीये, असं नाही वाटत?’
‘कशावरून?’
‘आता हेच बघा ना. मागे पी.ओ.पी.च्या गणेशमूर्तींना बंदी आली होती, बरोबर?’
‘हो तर. पर्यावरणाला धोका पोचवत होत्या त्या. म्हणून फक्त मातीचाच वापर करायचा नियम होता.’
‘ठीके. पण काय हो, आताही विसर्जनात अनेक पी.ओ.पी.च्या मूर्ती सापडतातच की. त्यांच्यावर काय मोठी कारवाई होते?’
‘पाईण्ट आहे.’
‘तशीच ती प्लॅस्टिकबंदी. एवढा गाजावाजा झाला. प्रत्यक्षात काय झालं? छोटे पाणीपुरी, भेळपुरीवाले फार तर पकडले गेले असतील चुकीचं, घातक प्लॅस्टिक वापरल्याबद्दल. मोठे प्लॅस्टिक उद्योग सक्तीने बंद पाडल्याचं वाचलं कुठे?’
‘नाय बा! तसल्या मोठ्यांच्या छोट्या गोष्टी आपल्याला कोण सांगतो?’
‘म्हणूनच म्हणतोय. कशाचंही थोडे दिवस अवडंबर माजवतो आपण. दणादण घोषणांचे गड सर करतात मंत्री. चार कच्च्या-बच्च्यांना, दुबळ्यांना मारे दंड होतात. पोलीस धरपकडीचा पराक्रम गाजवतात. पुढे काय? पहिले पाढे पंचावन्न.’
‘आसं म्हणता? एवढ्यात सोफ्याला बेल्ट बसवायला नको म्हणता?’
‘बघा बुवा. एवढीच हौस आली असेल तर बसवू शकताही. पण सुरक्षेसाठी सक्ती करून फार काही होत नसतं जगात. सक्ती केली की मूठभर लोकांना अद्दल घडते, खरा सगळा आतून बदल व्हायला हवाय हे महत्त्वाचं.’

– झटका

Back to top button