ई...ही कसली बुक्स? | पुढारी

ई...ही कसली बुक्स?

चिरंजीव, बाहेर निघालात?
हो. तुम्हाला काही आणून हवंय?
पुस्तकं. वाचनालयातून.
मी त्या भागात जात नाहीये बाबा. अगदी विरुद्ध दिशेला जातोय.
मग कर की माझ्यासाठी थोडी वाकडी वाट. मी फार काही मागतोय का तुझ्याकडे?
नाही खरं तर; पण तुम्ही ई बुक का वाचत नाही हो बाबा?
ई ती कसली बुकं? हातात नवंकोरं पुस्तक धरण्याचा, त्याचा वास घेण्याचा आनंद त्यात कुठून यायला बसलाय?
कबूल आहे बाबा. तुम्हाला त्याची सवय आहे, आवड आहे; पण आता तुमच्या वयात सारखी बाहेरून पुस्तकं मिळवणं, वेळच्यावेळी वाचून परत करणं जमणार आहे का तुम्हाला?
जमवायचं.
कसं? सारखं ह्याच्या मागे लाग, त्याच्या मागे लाग, हे करण्यापेक्षा आपली वाचायची सामग्री, पुस्तकं आपल्याजवळ बाळगली तर बरं पडेल तुम्हालाच.
तू तुझी एकेक मॉडर्न फॅडं लावू नकोस रे माझ्यामागे. आमचं आहे ते बरंय म्हणायचं.
मी नाही म्हणणार तसं. मुळात बाबा, ई बुक हे काही नवं फॅड नाहीये. सत्तर सालापासून अमेरिकेत सुरुवात झालीये.
अमेरिकेचं मला काय सांगतोस?
राहिलं. आपल्याकडलं सांगतो. गेली दहा वर्षं आपल्याकडेही ई बुक्स आलीयेत. तरुण लोक खूप वाचताहेत ती. आणि गेल्या एका वर्षात ई पुस्तकांचा तब्बल हजार, बाराशे कोटींचा व्यवसाय झालाय म्हणे.
ठीक आहे. ज्यांना ती वाचायची आहेत त्यांना वाचू देत. आम्ही आमची वाचली तर कोणाचं काही जातंय का?
जातंय, खूप काही जातंय बाबा.
मी तुला लायब्ररीत चकरा मारायला लावतो म्हणून म्हणतोयस ना तसं?
नाही हो. अहो, कागद बनवायला वृक्ष तोडावे लागतात. म्हणजे पर्यावरणाचं काही जातंच ना? शिवाय पुस्तकं भिजतात, जुनी होतात, वाळवी किंवा कसरीची भक्ष्यं होतात, कचरा वाढवतात, त्याचं काय?
गेली शंभर दोनशे वर्षं हेच होतंय ना रे बाबा?
म्हणून तर आता थांबवायला हवं. पुरे झाला पर्यावरणाचा र्‍हास. आता मोबाईलवरच वाचण्याचा घ्या ध्यास.
ते बारीकबारीक अक्षरातलं मला कुठलं रे दिसायला?
डोळे शिणले असतील तर पुस्तकं वाचू नका, कानाने ऐका फक्त. आता ऑडियो बुक्सपण आलीयेत बरं का.
म्हणजे काय?
म्हणजे दुसरा कोणीतरी पुस्तक वाचून दाखवेल ते आपण ऐकायचं!
ह्या! त्यात कसला वाचनाचा आनंद मिळणारआहे?
असं कसं म्हणता हो तुम्ही? आता पुस्तकांनी कपाटं भरून ठेवणं, घर बदलताना त्यांचे भारे वाहणं थांबवायची वेळ आलीये. जरा सवयी बदला. पुढे ई पुस्तकं हीच खरी पुस्तकं असं म्हणायला लागाल तुम्हीच.

– झटका

Back to top button