परफेक्शनिस्ट अब्जाधीश | पुढारी

परफेक्शनिस्ट अब्जाधीश

पालनजी मिस्त्री यांचे नुकतेच निधन झाले. उद्योगजगतात देदीप्यमान मजल मारल्यानंतरही ते सदैव प्रसिद्धीपासून दूर राहिले. ते मूलतः परफेक्शनिस्ट होते. गुणवत्तेशी तडजोड त्यांना कधीच रुचली नाही.

भारताच्या या धवल औद्योगिक प्रवासामध्ये काही घराण्यांचे योगदान मोठे राहिले आहे. त्यामध्ये पालनजी घराण्याचा समावेश आहे. या शापूरजी पालनजी उद्योग समूहाचे अध्यक्ष आणि दिग्गज उद्योजक पालनजी मिस्त्री यांचे नुकतेच मुंबईमध्ये निधन झाले. जगातील यशस्वी उद्योजकांमध्ये गणल्या जाणार्‍या पालनजींच्या उद्योगाचे साम्राज्य अनेक देशांमध्ये विस्तारलेले आहे. सुमारे 29 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीमुळे त्यांची वर्णी जगभरातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्‍तींच्या यादीमध्ये केली जात असे. पालनजी हे टाटा समूहातील सर्वांत मोठे वैयक्‍तिक भागधारक होते.

पालनजी हे एक अद्भूत रसायन होते. उद्योगजगतात इतकी मोठी मजल मारल्यानंतरही ते सदैव प्रसिद्धीपासून दूर राहिलेले दिसले. त्यामुळेच त्यांना ‘बेपत्ता अब्जाधीश’ म्हटले जायचे. सार्वजनिक व्यासपीठांवर त्यांची उपस्थिती फारशी कधीच दिसली नाही. याचा अर्थ ते एकांतवासी किंवा एकाकीपणाप्रिय होते, असा नाही; पण प्रसिद्धीच्या हव्यासाने उथळपणा करत राहणे हा त्यांचा पिंड नव्हता. व्यवसाय कौशल्याच्या, विद्वत्तेच्या आधारे व्यवसाय विस्तारामध्येच ते गढलेले दिसले. त्यांचे व्यक्‍तिमत्त्व गरजूंना मदतीसाठी सदैव तत्पर असणारे होते, असे त्यांचे मित्रगण आणि परिचित सांगतात. याखेरीज कोणतीही गोष्ट मुळासकट जाणून घेण्याचा त्यांचा स्वभाव होता. ते मूलतः परफेक्शनिस्ट होते. कार्यामध्ये अचूकता येण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करत राहण्यावर त्यांचा सदैव भर राहिला. आपल्या उद्योगांमध्येही त्यांनी हाच सिद्धांत केंद्रस्थानी ठेवला. त्यासाठी भलेही खर्चाचा आकडा वाढला तरी चालेल; पण गुणवत्तेशी तडजोड त्यांना कधीच रुचली नाही.

पालनजींचा जन्म 1929 मध्ये भारतातील पारसी कुटुंबात झाला. मुंबईतील कॅथेड्रल आणि जॉन केनन स्कूलमध्ये त्यांचे प्राथमिक शिक्षण पार पडले. त्यानंतर लंडनमधील इम्पिरियल कॉलेजमधून त्यांनी उच्च शिक्षण घेतले. वयाच्या 18 व्या वर्षापासून पालनजी कौटुंबिक व्यवसायात रुजू झाले. 1865 मध्ये वडिलांनी स्थापन केलेल्या कंपनीसाठी त्यांनी अनेक देशांना सेवा दिली. 1970 च्या दशकामध्ये पालनजी यांनी हा व्यवसाय अबूधाबी, कतार, दुबई आणि मध्य पूर्वेतील देशांमध्ये विस्तारला. पालनजी उद्योग समूह बांधकाम क्षेत्र, पायाभूत सुविधा, पाणी, ऊर्जा, अभियांत्रिकी, आर्थिक सेवा यासह अनेक क्षेत्रांत कार्यरत आहे. आखाती देशांमधील बांधकाम क्षेत्रात, पायाभूत सुविधांच्या विकासात पालनजी उद्योग समूहाचे योगदान आहे.

विशेषत्वाने उल्लेख करायचा झाल्यास ओमानच्या सुलतानाचा निळा आणि सोनेरी अल आलम हा राजमहाल हा शापूरजी पालनजी कन्स्ट्रक्शन प्रा. लि. कंपनीने बांधला आहे. भारतातही अनेक ऐतिहासिक वास्तूंच्या उभारणीमध्ये या उद्योगसमूहाचा वाटा मोठा राहिला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, ताजमहाल हॉटेल, मुंबई सेंट्रल स्टेशन, एचएसबीसी बँक, सेलचा पोलाद प्रकल्प, सिटी बँकेचे भारतातील मुख्यालय, राजधानी दिल्‍लीमधील जवाहरलाल नेहरू स्टेडियम अशी अनेक उदाहरणे या समूहाच्या स्थावर मालमत्तेच्या क्षेत्रातील गुणवत्तापूर्ण कार्याचे साक्षीदार आहेत. 157 वर्षांपासून कार्यरत असलेल्या आणि आशियापासून आफ्रिकेपर्यंत पसरलेल्या पालनजींच्या उद्योग समूहात आज 50 हजारांहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. पालनजी यांनी विस्तारलेला हा व्यवसायाचा वटवृक्ष आज त्यांची पुढची पिढी सांभाळत आहे.

1960 च्या दशकात शापूरजी पालनजी उद्योग समूहाची चर्चा आणखी एका कारणाने देशभरात झाली होती. ‘मुगल-ए-आझम’ या बहुचर्चित चित्रपटाच्या निर्मितीमध्ये शापूरजी उद्योग समूहाची महत्त्वाची भूमिका होती. हा चित्रपट त्या काळातील सर्वाधिक महागडा चित्रपट होता. आजही बॉलीवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय चित्रपटांच्या यादीत या चित्रपटाचा समावेश आहे.

– संतोष घारे, सनदी लेखापाल

Back to top button