भाजपला कौल | पुढारी

भाजपला कौल

विविध कारणांनी होणार्‍या पोटनिवडणुकांच्या निकालांमुळे बहुतेक वेळा थेट सत्तेवर परिणाम होत नसतो किंवा सत्तेची गणिते बदलत नसतात; परंतु राजकीय वारे कोणत्या दिशेने वाहते आहे याचा अंदाज बांधण्यासाठी हे निकाल महत्त्वाचे ठरत असतात. असे असले तरी त्यावरून निष्कर्ष काढणेही अनेकदा धोक्याचे असते.

कारण, तत्कालीन राजकीय वास्तव, त्या मतदारसंघातील परिस्थिती आणि निवडणूक काळात चर्चेत आणि प्रचारात असलेले मुद्दे यांवरून हे निकाल ठरत असतात. तो प्रभाव किंवा ते वारे पुढे राहील याची खात्री नसते. तरीसुद्धा जनभावना काय आहे, हे जाणून घेण्यासाठीची त्यांची उपयुक्‍तता नाकारता येत नाही. उत्तर प्रदेश, पंजाब, दिल्ली, त्रिपुरा, झारखंड, आंध्र प्रदेश आदी राज्यांमध्ये झालेल्या लोकसभा आणि विधानसभा पोटनिवडणुकांच्या निकालांनी अनेक ठिकाणी अनेक धक्के दिले आणि संबंधित राजकीय पक्ष तसेच नेत्यांना धडा देण्याचे काम या निकालांनी केले. यातील सर्वात महत्त्वाचे निकाल आहेत, ते उत्तर प्रदेशातील लोकसभा पोटनिवडणुकीचे. समाजवादी पक्षाकडे असलेल्या दोन जागांवर झालेल्या निवडणुकीत दोन्ही जागा भाजपने अक्षरशः हिसकावून घेतल्या.

राज्यातील समाजवादी पक्षाच्या दोन ताकदवान नेत्यांचे हे मतदारसंघ आणि याठिकाणी दोन्ही जागा राखण्यात समाजवादी पक्षाला काही अडचण नसल्याचे बोलले जात असताना दोन्ही जागांवर त्यांना पराभव पत्करावा लागला. पहिली जागा आहे, ती खुद्द समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांची. अखिलेश यादव यांनी विधानसभा निवडणुकीत भाजपपुढे मोठे आव्हान निर्माण केले होते. योगी आदित्यनाथ यांच्याकडून पर्यायाने भाजपकडून समाजवादी पक्ष सत्ता काढून घेईल, असे वातावरण बनविण्यात त्यांना यश आले होते; परंतु प्रत्यक्षात भाजपनेच बहुमत मिळवले आणि अखिलेश यादव यांचा भ्रमनिरास झाला.

संबंधित बातम्या

विधानसभा निवडणुकीनंतर अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेशावरच लक्ष केंद्रित करण्याच्या उद्देशाने लोकसभेच्या जागेचा राजीनामा दिला, त्यामुळे ही पोटनिवडणूक झाली. 2019च्या लोकसभा निवडणुकीत अखिलेश यादव यांनी या जागेवर 24 टक्के मतांच्या फरकाने विजय मिळवला होता. या जागेवर त्यांनी आपले चुलतभाऊ धर्मेंद्र यादव यांना उमेदवारी दिली होती, त्यांचा सामना भोजपुरी स्टार दिनेशलाल यादव ऊर्फ निरहुआ यांच्याशी होता.

निरहुआ यांची कलावंत म्हणून असलेली लोकप्रियता आणि त्याला भारतीय जनता पक्षाची मिळालेली साथ यामुळे इथे समाजवादी पक्षाला प्रतिष्ठेच्या जागेवर पराभव पत्करावा लागला. दुसरी जागाही एवढीच महत्त्वाची होती, ती पक्षाचे ज्येष्ठ नेते आझम खान यांची. आझम खान यांची अलीकडेच तुरुंगातून मुक्‍तता झाल्याने त्यांच्या बाजूने सहानुभूतीची लाटही होती. समाजवादी पक्षाला ही जागा राखणे अवघड जाईल, असे वाटत नव्हते. इथे आसीम राजा यांना भाजपच्या घनश्याम लोधी यांनी चाळीस हजारांहून अधिक मतांनी हरवले. लोधी हेसुद्धा आझम खान यांचेच निकटवर्ती आणि विधानसभा निवडणुकीच्या आधी ते समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये दाखल झाले होते.

समाजवादी पक्षाकडे उत्तर प्रदेशात लोकसभेच्या तीन जागा होत्या, त्यापैकी दोन जागांवर पोटनिवडणूक झाली आणि या दोन्ही जागा पक्षाला गमावाव्या लागल्या. पक्षांतर्गत मतभेद हेही या पराभवामागचे कारण सांगितले जाते. आझम खान यांच्या रामपूर मतदारसंघामध्ये पक्षाचे नेते असलेल्या अखिलेश यादव यांनी सभासुद्धा घेतली नव्हती. सगळी प्रचारयंत्रणा एकहाती आझम खान यांनी राबविली होती; परंतु आझमगड मतदारसंघात मात्र पक्षांची संपूर्ण यंत्रणा उतरली होती, तरीही तिथे पराभव झाला. योगी आदित्यनाथ यांनी विधानसभा निवडणुकीनंतरही उत्तर प्रदेशच्या राजकारणावरील पकड जराही ढिली होऊ दिली नसल्याचे या निकालावरून स्पष्ट झाले. त्यांनी दोन्ही मतदारसंघांमध्ये प्रचार करून आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी ताकद दिली.

विधानसभा निवडणुकीत पराभवाचा झटका सहन करावा लागलेल्या समाजवादी पक्षाला पोटनिवडणुकीतील पराभव जिव्हारी लागणारा आहे. अखिलेश यादव यांच्या आत्मविश्‍वासाला धक्‍का देणारे हे निकाल आहेत. आझम खान यांनाही झटका देणारा हा निकाल असून व्यक्‍तिगत अहंकार कुरवाळत बसल्यावर हाती भोपळाच राहील, असा संदेश या निकालांनी दिला. उत्तर प्रदेशाप्रमाणेच पंजाबमध्येही लोकसभा निवडणुकीत धक्‍कादायक निकाल लागला असून, आम आदमी पक्षाकडील जागा शिरोमणी अकाली दलाने (अमृतसर) काढून घेतली. भगवंत मान यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर संगरूर लोकसभा मतदारसंघातील आपल्या जागेचा राजीनामा दिल्यामुळे इथे निवडणूक झाली.

दस्तुरखुद्द मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातला हा निकाल आम आदमी पक्षाला विचार करायला भाग पाडणारा आहे. शिरोमणी अकाली दलाचे (अमृतसर) उमेदवार सिमरनजितसिंह मान यांनी इथे विजय मिळवला. 2014 आणि 2016च्या लोकसभा निवडणुकीत 72 आणि 76 टक्के असे मतदान झालेल्या या मतदारसंघात यावेळी अवघे 45 टक्के मतदान झाले, त्याचाही निकालावर परिणाम झालेला दिसतो. दिल्लीत आम आदमी पक्ष, झारखंडमध्ये काँग्रेस आणि आंध्र प्रदेशात वायएसआर काँग्रेसने आपापली एकेक जागा राखली. त्रिपुरामध्ये चारपैकी तीन जागा जिंकून या राज्यात अजूनही आपला प्रभाव असल्याचे भाजपने दाखवून दिले.

मुख्यमंत्री माणिक साहा हे स्वतः उमेदवार असल्यामुळे येथील निवडणूकही महत्त्वाची होती. भारतीय जनता पक्षाने प्रादेशिक राजकारणावरही पकड ठेवण्यासाठी आखलेली रणनीती यशस्वी झाल्याचे दिसले. आगामी निवडणुकांतही हा पक्ष प्रादेशिक पक्षांसमोर आव्हान निर्माण करेल, हे या निकालांनी स्पष्ट केले आहेच. आम आदमी पक्ष, समाजवादी पक्षाला त्यांची जागा दाखविणारा आणि आत्मपरीक्षण करायला लावणारा हा निकाल राज्याच्या राजकारणात उतरती कळा लागलेल्या शिरोमणी अकाली दलाला अल्पसा दिलासा देणारा आहे.

Back to top button