शाळाच नापास होतात तेव्हा? | पुढारी

शाळाच नापास होतात तेव्हा?

पेढा घ्या!
घेतो तर! मी कुठल्याही कारणाने पेढे खाऊ शकतो; पण हा गोडवा कशाचा म्हणे?
नात छान मार्कांनी पास झाली आमची. आनंद वाटला.
अभिनंदन! पण, तिची शाळा नीट पास होईल ना?
आता काय शाळांची परीक्षा घेणार? का मास्तरांना मार्क देणार?
अहो, फार महत्त्वाचा प्रश्‍न आहे हा. नुसती मुलं पास होणं हा एक भाग झाला. त्यांचे शिक्षक, मुख्याध्यापक, खुद्द शाळापण पास व्हायला हव्यात.

ती आपली जबाबदारी आहे का?
त्यात आपला आनंद, आपल्या मुलांचं भलं होणं तर आहेच ना!
हे उगाचच काहीतरी काढताय तुम्ही!
उगाचच नाही. अलीकडेच जिल्हा परिषदेच्या शाळासुधार कार्यक्रमात नेमकं हेच तपासलं गेलं तेव्हा अनेक शिक्षक, मुख्याध्यापक नापास झालेत यंदा.

काय सांगता? शिक्षण संस्था आणि संस्था चालवणारेच नापास?
हो. आपल्या जिल्ह्यातल्या जिल्हा परिषद शाळांची हल्लीच तपासणी झाली आणि तिच्यात 40 टक्के शाळा एका ना एका विषयात नापास झाल्या.
शाळांचे विषय? मूल्यमापन? काय चेष्टा करता राव?
चेष्टा नाही. खरंच झालंय हे. म्हणजे उदाहरणार्थ, किती विद्यार्थी संख्येमागे किती शिक्षक नेमलेले आहेत? पुरेसे आहेत की नाहीत? इथपासून सुरुवात होते.

संबंधित बातम्या

बाबो! शिक्षक नेमण्यापासूनच काटकसर होतेय की काय?
काटकसर म्हणा, चालढकल म्हणा, शब्द काहीही वापरा; पण अनेक विषयांना स्वतंत्र शिक्षकच नाहीहेत काही ठिकाणी.
म्हणजे गणिताच्या सरांनी इतिहास शिकवायचा?
तसंच काहीसं. भाषा, इतिहास, भूगोल असे विषय कोणावरही सोडायचे.
ते का म्हणे?

ते काय, वाचून शिकवायचे विषय. कोणीही शिकवू शकतो, असा गैरसमज!
आणखी कोणतेकोणते गैरसमज आहेत?
शिक्षकांचंही ज्ञान अद्ययावत हवं ना?
प्रश्‍नच नाही.

उलट आहे. तो एक गंभीर प्रश्‍न आहे. अभ्यास वाढतोय, बदलतोय, शिक्षकांना नवी तंत्रं शिकायला हवीत; पण तिकडे कोणाचं लक्ष नाही.
मध्ये आमच्या नातीच्या शाळेला मुख्याध्यापकच नव्हते काही दिवस.
हो. पदभरती होतच नाही महिनोन् महिने.
शाळेची स्वच्छता नीट नसते. आवार नसतं.

स्वच्छतागृहांची तर दैना विचारू नका. आत पुरेसं पाणी नाही. दरवाजाच्या कड्या लागत नाहीत हे नेहमीचं. आमच्या नातीच्या शाळेचा ‘परिमळ’ तर कोपर्‍यापर्यंत येतो एकेकदा!
लोक म्हणत असतील ना? पुढे शाळा आहे अशी पाटी लावायलाच नको! शाळेचा ‘सुवास’ दूरवर पसरतो.
होतं काय माहितीये का, परवानगी मिळून शाळा सुरू करेपर्यंत सगळी काळजी घेतली जाते. नंतर कोण कशाला बघतोय तिच्या देखभालीकडे?

अरे, पण तिथे तुमची-आमची वाढती मुलं येणार, वावरणार, महत्त्वाची वर्षं घालवणार. त्यांना सगळं चोख मिळायला नको?
म्हणून तर म्हटलं, शाळाही पास व्हायला हव्यात. कोरोना काळात तर भयंकर आबाळ झालीये शाळांची. नव्या शिक्षण वर्षात त्यांचं गाडं रुळावर येऊ दे, अशी प्रार्थना करूया!
– झटका

Back to top button