प्लास्टिकमुक्त वारी | पुढारी

प्लास्टिकमुक्त वारी

नमस्कार अण्णासाहेब. आम्हाला निरोप द्या.
का हो नानासाहेब? एकदम आमुचा रामराम घ्यावा पर्यंत आलात?
तसं नाही अण्णासाहेब. यंदा वारीला जातोय. दोन वर्षं झाली, विठुराया भेटला नाही. आता केव्हा गळामिठी पडेल, असं झालंय बघा!
जपून बरं नानासाहेब!
अहो, वर्षानुवर्षे जातोय वारीला, विठूची कृपा आहे. साधा शिंकखोकलाही होत नाही तेवढ्या दिवसांत.
भाग्यवान आहात.
तशी आमचीही खूप तयारी करून देते म्हणा! सोबत शिधा असतो. टिकाऊ पदार्थ, औषधं, वार्‍यापावसाची सोय, आठवणीने सगळं देते बांधून.
रखुमाईची साथ हवीच ना प्रत्येकाला?
शिवाय सरकारही खूप सुविधा पुरवत असतंच. यंदाची पुणे मनपाची वारीच्या नियोजनाची बैठक झालीपण. मार्गावर नीट अन्न, पाणी, स्वच्छतागृहं, सावल्या, आडोसे यांची योजना त्यांना करावीच लागते.
पण, त्या सोयी नीट वापरणं हे वारकर्‍यांनी पाळायचं पथ्य असणार ना?
तिथेच जरा वांधा येतो.
तो कसा काय?
अहो, आता काय सांगायचं? पाणपोई असो, स्वच्छतागृहं असोत, कचराकुंड्या असोत, प्रत्येक गोष्ट आपण वापरली की झालं असं करतात लोक.
त्यावरूनच वाटतंय. घरून नेलेल्या जिन्नसांची रिकामी डबडी, खोकडी, कागदं, प्लास्टिक, दोरे, नाड्या सगळं जिथेतिथेच तर टाकतात माणसं.
यंदाची वारी तर प्लास्टिकमुक्त निर्मलवारी करायचीये म्हणताहेत आपले आयुक्त.
बरोबर आहे. प्लास्टिकयुक्त तर सगळ्याच वार्‍या असतात आताशा.
युक्त नव्हे, मुक्त. प्लास्टिकमुक्त!
आयुक्त आणि मुक्त यात गल्लत झाली बहुतेक आमची.
होऊ दे. तेवढी माफ आहे; पण वारकर्‍यांनी गल्लत करू नये म्हणजे झालं.
त्यात अजून आपण कोरोनाच्या काळ्या सावलीच्या पुरते बाहेर आलो नाही. एवढी माणसं एकत्र जमणार, एकत्र खाणं, पिणं, ऊठबस चालणार, स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणार म्हटल्यावर काळजीच वाटते हो.
विठुरायाला आहेच की भक्तांची काळजी. देव नेहमी दीनाघरी धावतोच!
हो तर! पण, म्हणून त्याला किती धावाधाव करायला लावावी माणसांनी, याला काही सीमा?
तुमच्यासारखी माणसं ना अण्णासाहेब, जिथे तिथे खोडा घालतात बहुतेक. आमचा वारीचा आनंदपण तुमच्या डोळ्यावर येतोय का?
नाही नानासाहेब. वारी करावी ना! जरुर करावी; पण तिच्या रस्त्यावर अतिक्रमणं करणं, दूषित पदार्थ विकणं किंवा खाणं, तिथेच केर, कचरा, दलदल माजवणं, पाण्याचे नळ उघडे सोडून जाणं हे आता थांबायला हवं.
खरंय. प्लास्टिकमुक्ती हवीये, तशी असल्या गबाळ कारभारापासूनपण मुक्ती हवीये.
म्हणून तर सांगतोय, ज्यांना यंदाची वारी करायचीये त्यांनी करावी, खुशाल करावी; पण आपली वारी विठुरायाची होतेय, दवाखान्याची नाही, हे आपणच काळजीपूर्वक बघावं!
विठ्ठलानेच द्यावी तशी बुद्धी सर्वांना! त्याला सहज जमेल ते. हरिनामाचा गजर तोच सार्थ करेल.

– झटका

संबंधित बातम्या
Back to top button