मास्कची पाठशाळा | पुढारी

मास्कची पाठशाळा

अग ए, बाहेर निघालीस वाटतं? पण, तोंडावर मास्क कशाला लावलायस? आता काही मास्कची सक्ती नाहीये.
माहितीये. मीपण पेपर वाचत असते बरं का! मास्क गेलेत आता. पण, घरात एवढे ढिगाने गोळा केल्येत त्यांचं करायचं काय म्हणते मी?
चहा गाळायला वापरायचे का? रोजच्याला साधे वापरू, पाहुण्यांसमोर जरा रेशमी वगैरे वापरू.
बोल्ले. खरोखरीची गाळीव बुद्धिमत्ता लाभलेले आमचे नाथ! अहो, आमच्या मंडळाच्या त्याच क्लासला चाललेय मी. मास्कचे उपयोग कसे करावेत, हे डिटेलमध्ये शिकवणार आहेत त्या ठिकाणी.
असापण क्लास असतो? कसल्या क्लासिक जगता ग तुम्ही मंडळवाल्या?
मग काय, कचर्‍यात फेकून द्यायचे सगळे मास्क?
दोन वर्षं कंपल्सरी केले होते तेव्हा किती रागराग करायचीस. सारखं तोंड गुंडाळल्याने उकडतंय, श्वास लागतोय, जीव घाबरतोय वगैरे तक्रारी चालायच्या तुझ्या!
होच मुळी. म्हणून तर पोलिस नसेल तिथे मी सरळ वर कपाळावर नाही, तर हनुवटीवर ओढून घ्यायची मास्क.
असं फसवायचीस होय तू कोरोनाला?
तरी मला नाहीच ना झाला कोरोना? खरंय की, सुरुवातीला मला फार खटकायचं. जळ्ळं एवढं नटूनथटून बाहेर पडायचं ते काय सगळं सौंदर्य मास्कमध्ये लपवायला? म्हणून मी रागराग करायची मास्कचा.
पण, त्यातूनच तू आयडिया काढलीस. एकेका मास्कवर छानपैकी ओठ रंगवायला लागलीस. अनेक मास्कांवर कमानदार गुलाबी किंवा लालचुटूक ओठ वगैरे!
छान दिसायचं ना ते? नुसते रटाळ काळे-पांढरे मास्क का चालवावेत नेहमी-नेहमी? आता लिपस्टिकच्या सगळ्या शेडस् त्यात दाखवू नाही शकले मी! पण, डोकं लढवून मार्ग शोधणं महत्त्वाचं.
प्रश्नच नाही. तसंच ते मॅचिंग मास्कांचं खूळही काढलंस नंतर. प्रत्येक वेळेला ड्रेसचं, ब्लाऊजचं जादा कापड घेऊन शिंप्याकडून मॅचिंग मास्क शिवून घ्यायला लागलीस.
करता करता पैठणी मास्क, इरकली मास्क, पतियाळा मास्क असे सगळे आले बाई माझ्याकडे. आता त्यांचंच काय करायचं, ही मोठी समस्या वाटतेय मला.
मला एक सुचतंय! केसात माळायचे रंगीबेरंगी गजरे, वेण्या बनवतेस का त्यांच्या?
त्यापेक्षा दरवाजाची तोरणं करावीत, असं चाललंय आमच्यात. मोबाईलची कव्हरं, मुलींच्या फ्रॉकांच्या कॉलरी यांचेही प्रयोग करणार आहोत आम्ही.
इतकी वर्षं स्वयंपाकाचे प्रयोग करून झाले, तरी आम्ही वाचलोय. आता मास्कचे कर. निदान मास्क तरी वाचतील.
आम्ही बायका नेहमी संकटाची संधी करत असतो. कोरोनाच्या पाठशाळेत तर कित्ती काय काय शिकलो ना? अडून, रडत, थांबत बसलो का?
मग, आता का थांबली आहेस?
राजू गेलाय ना, रिक्षा आणून द्यायला? कोरोनाच्या दिवसात दिवस दिवस घरात बसून उबली बिचारी पोरं. त्यामुळे आता कोणतंही काम करायला आधी पुढे पळतो तो. हसताय का? हसायला काय झालं?
अगं बये, रस्त्यावर पोरीटोरी विनामास्क भटकताहेत. सगळ्यांचे नट्टेपट्टे कसे सहज दिसतात. न्याहळता येतात. म्हणून तरणे उत्सुक झाल्येत बाहेर उंडारायला. त्या मुखपट्ट्या बांधलेल्या पोरी कुठे घडवत होत्या मुखचंद्रदर्शन?
असंय हो? थांबा धरतेच त्याचा कान. नाही तरी सारखे मास्कच्या इलॅस्टिकने ताणूनताणून कान पुढेच आल्येत कार्ट्याचे. आता भोग म्हणावं आपल्या कोरोनाची, सॉरी, कर्माची फळं!

– झटका

Back to top button