निर्बंधमुक्‍त होताना… | पुढारी

निर्बंधमुक्‍त होताना...

पारतंत्र्यातून मुक्‍तता होऊन स्वातंत्र्याची नवी पहाट उगवावी, एखादे दुःस्वप्न संपून नव्या जगण्याची सुरुवात व्हावी, बंधनाच्या बेड्या तुटून मुक्‍ततेचा आनंद व्हावा असाच काहीसा अनुभव देशातल्या जनतेला 31 मार्चपासून येणार आहे. गेली दोन वर्षे कोरोनामुळे लादलेले निर्बंध हटवण्याचा निर्णय केंद्र सरकारने जाहीर केल्यामुळे देशवासीयांची दोन वर्षांतील तमाम बंधनांतून मुक्‍तता होणार आहे. नव्या निर्बंधमुक्‍त जगात प्रवेश करताना मुक्‍ततेचा हा आनंद द्विगुणित करायचा असेल, तर मास्कबरोबरच सुरक्षित शारीरिक अंतर ठेवण्याची आवश्यकता असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

रुग्ण निदान, रुग्णशोध, उपचार, लसीकरणावर भर या सगळ्या बाबतीत देशाने चांगले काम केल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे. देशात या घडीला सक्रिय रुग्णांची संख्या वीस हजारांवर, तर कोरोनाचा दैनंदिन संसर्ग दरही 0.28 टक्केइतका खाली आला आहे. या कारणांमुळे आणि लसीकरण मोठ्या प्रमाणावर झाल्याने निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मास्क आणि अंतराची बंधने स्वयंस्फूर्तीने पाळायची असून ती आपल्या भल्यासाठीच असल्यामुळे प्रत्येकाने जबाबदारीने त्यांचे पालन केले, तरच या निर्बंधमुक्‍ततेचा आनंद सर्वांना मोकळेपणाने घेता येऊ शकेल.

कोरोनाच्या साथीची भीषणता लक्षात आल्यानंतर 2020 मध्ये 21 मार्चला देशभरात एक दिवसाचा जनता कर्फ्यू लागू करण्यात आला होता. त्यानंतर तीन दिवसांनी म्हणजे 24 मार्च 2020 ला देशभरात लॉकडाऊन आणि त्यासोबतच अनेक कठोर निर्बंध जारी करण्यात आलेे. चीनमधून सुरू झालेली ही महामारीची साथ भारताबरोबर जगालाही नवी होती. संपूर्ण जग त्या दहशतीखाली आले. अशा काळात लॉकडाऊनशिवाय पर्याय नसल्याचे समोर आल्यानंतर जगभरातील देशांनी तो लागू केला. भारतातही तो लागू झाला आणि अनेक पिढ्यांनी अनुभवले नव्हते असे निर्बंध अनुभवायला मिळाले.

या निर्बंधांमुळे लोकांना पारतंत्र्याचा अनुभव कशा प्रकारचा असू शकतो, हे कळून चुकले. सगळी सूत्रे सरकारने म्हणजेच प्रशासन आणि पोलिसांनी हाती घेतली आणि सामान्य माणसांचे जगणे मुश्कील झाले. व्यवसाय, उद्योग-धंदे बंद पडले. हातावर पोट असलेल्या लोकांची उपासमार सुरू झाली. अनेक उद्योगांनी नोकर कपात केल्यामुळे लाखो लोकांवर बेरोजगारीची कुर्‍हाड कोसळली. लॉकडाऊन लागू केल्यानंतरही कोरोनाचा प्रसार व्हायचा तसा होत राहिला. त्यामुळे जे मृत्यूचे तांडव अनुभवायला मिळाले, त्याने अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त केले. जीवाभावाच्या माणसाचा मृत्यू झाल्यानंतर त्याचे अंत्यदर्शन आणि अंतिम संस्कारही दुर्लभ झाले. एकूण मानवतेवर आघात करणारे, मानवी अस्तित्वाला अत्यंत क्षूद्रतेच्या पातळीवर आणणारे अनेक अनुभव कोरोनाच्या काळात अनुभवायला मिळाले.  निर्बंधांतून मुक्‍ततेचा निर्णय त्याचमुळे अत्यंत महत्त्वाचा आहे. कोरोना काळातील स्थित्यंतरांचा एक महत्त्वाचा टप्पा म्हणून त्याकडे पाहावे लागेल.

कोरोनाच्या एकामागोमाग तीन लाटा आल्या. पहिल्या लाटेवेळी एकूण कोरोना, त्यासोबत आलेली जीवनशैली या सगळ्या गोष्टी नव्या होत्या. अनेक पिढ्यांनी न अनुभवलेल्या गोष्टी समोर आल्यामुळे एकूणच समाजजीवन हादरून गेलेे. पहिली लाट सुरू असतानाच वैद्यकशास्त्राचे अभ्यासक दुसर्‍या व तिसर्‍या लाटेचे भाकित करीत होते; परंतु पहिली लाट ओसरू लागल्यानंतर निर्बंध काहीसे शिथिल होऊ लागले तेव्हा लोकांनी सगळी बंधने झुगारून दिली आणि त्यानंतर आलेल्या दुसर्‍या लाटेने त्याहून मोठा कहर माजवला. रुग्णालये भरून वाहू लागली. ऑक्सिजनअभावी लोक रुग्णालयांच्या दारात टाचा घासून प्राण सोडू लागले.

.स्मशाने धडधडू लागली. तिथली जागा कमी पडू लागली तेव्हा गंगेच्या पात्रातून प्रेते वाहू लागली. गंगेच्या किनार्‍यावर शेकडो मृतदेह दफन केल्याचे भीषण चित्र बघायला मिळाले. ज्याने आपला आप्‍त गमावला नाही, असा माणूस शिल्लक राहिला नाही. प्रत्येक कुटुंबाने कोरोनाच्या भीषणतेचा अनुभव घेतला. माणसाचे जगणे थांबवता येत नसल्यामुळे सरकारने काही निर्बंध शिथिल केलेे; मात्र लोकवर्तनातला बेजबाबदारपणा वारंवार समोर आला. त्यामुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत वारंवार चढ-उतार झाली. या काळात जशी सामाजिक परिस्थिती एका अस्थिरतेच्या अवस्थेतून जात होती, त्याचप्रमाणे त्यावर राजकीय पोळ्या भाजून घेण्याचे प्रयत्नही दोन्ही बाजूंनी सुरू होते.

कोव्हिड काळात समर्पणाच्या भावनेतून काम करणारे लाखो सेवाभावी सामान्य लोक एका बाजूला आणि मृतांच्या टाळूवरचे लोणी खाणारे काही राजकीय नेते, तितकेच प्रशासकीय अधिकारी, काही डॉक्टर दुसर्‍या बाजूला असेही चित्र होते. अलीकडच्या काळात निर्बंधांचा जाच कमी झाला असला, तरी अनेक निर्बंध कागदोपत्री होते आणि त्या निर्बंधांच्या आडून गैरफायदा घेणार्‍या प्रवृत्तीही होत्या. केंद्र सरकारने हे निर्बंध हटवल्यामुळे अशा प्रवृत्तींचा परस्पर निकाल लागेल. शिवाय लोकांना किरकोळ व्यवहारांमध्ये जे अडथळे येत होते, ते टळतील. माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे आणि कोरोनाच्या निर्बंधांमुळे त्याच्या या सामाजिकतेवरच निर्बंध आल्यामुळे अनेक टप्प्यांवर लोकांची कुचंबणा होत होती.

चित्रपट, नाटकांसाठीच्या निर्बंधांमुळे कलाक्षेत्राला मोठा फटका बसत होता. तमाशासारख्या कला आणि कलावंतांवर त्याचा विपरित परिणाम होऊन अनेकांवर उपासमारीची वेळ आली होती. विवाह समारंभांवरील निर्बंधांमुळे माणसांच्या आयुष्यातील आनंदाच्या प्रसंगांवरही संक्रांत आली होती. येत्या 31 तारखेपासून हे निर्बंध काढून टाकण्यात येत असले, तरी कोरोना हद्दपार झाला आहे आणि आता कसेही वागले तरी चालेल, असे समजण्याचे कारण नाही. चीनसह जगभरातील काही देशांमध्ये काही भागांत आजही परिस्थिती गंभीर असून आपण बेबंदपणे वागल्यास आपणही संकट ओढवून घेऊ शकतो. म्हणूनच निर्बंध शिथिल झाले असले, तरी मास्क आणि शारीरिक अंतराचे निर्बंध ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, हे लक्षात घ्यायला हवे!

Back to top button