छत्रपती शिवाजी महाराजांचे कृषी धोरण | पुढारी

छत्रपती शिवाजी महाराजांचे कृषी धोरण

शेतकर्‍यांचे हित हेच राज्याचे हित, हे शिवरायांचे धोरण होते. शिवरायांच्या शेती, शेतकरीविषयक असणार्‍या या धोरणामुळे त्या काळात दुष्काळ, पाणीटंचाई, अपुरे सिंचन या समस्या असूनही शेतकर्‍यांनी आत्महत्यांचा मार्ग अवलंबला नाही. आपल्या राज्यातील शेतकर्‍यांना कोणत्याही स्वरुपाची इजा पोहोचणार नाही, याची खबरदारी शिवरायांनी घेतली. त्याची अनेक उदाहरणे शिवचरित्रात आपणास सापडतील. आज तिथीनुसार शिवजयंती. त्यानिमित्त…

छत्रपती शिवाजीराजे अत्यंत शूर, पराक्रमी, बुद्धिमान, नीतिमान, चारित्र्यसंपन्न, निर्व्यसनी होते. त्यांनी अशक्य कार्य शक्य केले. अनेक शत्रूंचा पराभव केला. त्यांनी रयतेचे स्वराज्य निर्माण केेले. त्यांनी खासगी आणि सार्वजनिक जीवनात कधीही भेदभाव बाळगला नाही. आपल्या विरोधकांच्या धर्माचा, धर्मग्रंथांचा, धर्मस्थळांचा आणि महिलांचा नितांत आदर केला. शिवरायांचा इतिहास हा केवळ ढाल तलवार आणि लढाया यांपुरता मर्यादित नाही, तर त्यांनी आपल्या राज्यात सुशासन आणले. लोककल्याणकारी राज्य हे शिवरायांचे धोरण होते. आपल्या राज्यातील प्रत्येक घटकाला न्याय मिळाला पाहिजे, असे धोरण ते कटाक्षाने राबवत असत. आज आपण दुष्काळाच्या झळा अनुभवत आहोत. पाणीटंचाईचा सामना करत आहोत; पण शिवकाळात देखील दुष्काळ होता, गरिबी होती, जलसिंचन अत्यल्प होते; पण उल्लेखनीय बाब म्हणजे असे असूनही शिवकाळात शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या नाहीत. असे का घडले? याचे कारण शिवरायांचे शेती, शेतकरीविषयक असणारे धोरण होय.

शिवाजीराजांचे शेतकरी धोरण हे भांडवलशाही आणि व्यापारशाहीला पूरक नव्हते, तर ते सामान्य शेतकर्‍यांचे हित जोपासणारे होते, आपल्या राज्यातील शेतकर्‍यांना कोणत्याही स्वरुपाची इजा पोहोचणार नाही, याची खबरदारी शिवरायांनी घेतली. त्याची अनेक उदाहरणे शिवचरित्रात आपणास सापडतील.

ज्यावेळेस शाहिस्तेखान पुण्याकडे चालून येतोय, असे शिवरायांना गुप्तहेरांनी सांगितले त्यावेळेस त्यांनी सर्जेराव जेधे यांना कळविले की, शेतकर्‍यांना तत्काळ सुरक्षितस्थळी हलवा, या कामात हयगय केली तर पातक लागेल. म्हणजे शेतकर्‍यांचे हित जोपासणे हे पुण्य आहे, तर शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडणे पाप आहे, अशी शिवरायांची शेतकर्‍यांप्रती भूमिका होती. चिपळूण येथील आपल्या हवालदाराला पाठवलेल्या पत्रात शिवाजीराजे त्यांना सांगतात, ‘संध्याकाळी झोपताना तेलवातीचे दिवे विझवून झोपत जावा, रंधनाळे, आगट्या विझविल्यात का ते स्वत: खात्री करा, अन्यथा आग लागेल. त्यात जनावरांचा चारा, धान्य जळून खाक होईल. मग तुम्ही शेतकर्‍यांचे धान्य, लाकूड, पाला, भाजी, पीक आणाल, मग रयत म्हणेल की, हे तर मोगलच आले. शेतकर्‍यांना त्रास होईल असे वागू नका, विना मोबदला कोणाचे काही घेऊ नका. शेतकर्‍यांच्या गवताच्या काडीला आणि भाजीच्या देठालाही हात लावू नका,’ अशा प्रकारच्या सूचना शिवरायांनी आपल्या अधिकार्‍यांना दिल्या. शेतकर्‍यांचे हित हेच राज्याचे हित, हे शिवरायांचे धोरण होते.

इ.स. 1676 साली जेव्हा मोठा दुष्काळ पडला तेव्हा शिवाजीराजेे आपल्या अधिकार्‍यांना म्हणाले, ‘गावोगावी जावा, दुष्काळामुळे ज्या शेतकर्‍यांची बैलजोडी दगावली असेल त्यांना बैलजोडी द्या. एखाद्याला खायला अन्न नसेल तर त्याला खंडी-दोन खंडी धान्य द्या. त्यासाठी आपल्या तिजोरीवर लाख-दोन लाख बोजा पडला तरी चालेल; पण वसुलीसाठी तगादा लावू नका. ऐपत आल्यानंतर वाढीदिडीने वसूल न करता, मुद्दलच तेवढी घ्या. या कामात हयगय किंवा विलंब केला तर मी तुमच्यावर नाराज आहे, असे समजा,’ अशा सक्त सूचना शिवरायांनी आपल्या अधिकार्‍यांना दिल्या. या सूचनांवरून स्पष्ट होते की, शिवाजीराजांनी आपल्या राज्यातील कोणीही उपाशीपोटी झोपणार नाही, याची काळजी घेतली. जनावरांची काळजी घेतली. शेतकर्‍यांना शून्य टक्के व्याजदराने कर्ज दिले.

संकटकाळी विलंब न करता, अभ्यास करण्याचे नाटक न करता मदत केली. त्यामुळे दुष्काळ पडला तरी शेतकरी खचला नाही, हतबल झाला नाही. शिवरायांचे व्यापारी धोरण शेतकरीप्रधान होते. शेतीमालाला भाव मिळाला तर शेतकर्‍यांच्या श्रमाला मूल्य मिळणार आहे, हे शिवरायांनी ओळखले होते. त्यामुळेच शिवाजीराजे आपल्या अधिकार्‍यांना सांगतात, ‘अतिरिक्त उत्पादित झालेला माल शेतकर्‍यांना योग्य मोबदला देऊन खरेदी करा. त्याची साठवणूक करा. साठवणूक केलेला माल परमुलूखात (डच, फ्रेंच, ब्रिटिश, मोगल, पोर्तुगीज, आदिलशाही) नेऊन विका, योग्य भाव मिळत नाही, तोपर्यंत चार-पाच बाजार करून विका,’ अशा सूचना शिवरायांनी आपल्या अधिकार्‍यांना दिलेल्या आहेत. यावरून स्पष्ट होते की, शिवरायांनी आपल्या राज्यात उत्पादित झालेल्या अतिरिक्त मालाची शेतकर्‍यांना योग्य मोबदला देऊन खरेदी केली. अतिरिक्त माल हे संकट नसून निर्यात करण्याची मोठी संधी शिवरायांनी शोधली. तो साठवून ठेवला आणि जेव्हा परमुलूखात मंदी असते, तेव्हा तो निर्यात केला. स्वाभाविकच याचा लाभ स्वराज्याला म्हणजे शेतकर्‍यांना झाला. आपल्या राज्यात अतिरिक्त शेतीमाल असताना परमुलूखातून शेतीमाल आयात करून शेतकर्‍यांचे कंबरडे मोडणारे शेतीधोरण शिवरायांचे नव्हते. त्यामुळेच शिवकाळातील शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या नाहीत.

शिवकाळातदेखील दुष्काळ होता, गरीबी होती. जलसिंचन तर अत्यल्प होते. परंतु; शिवाजीराजांचे शेतकरी धोरण हे शेतकरीप्रधान होते. म्हणून शिवकाळात शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या नाहीत.

आज आपल्या देशातील शेतकरी नियमित आत्महत्या करत आहे. शिवकाळाच्या तुलनेत आज जलसिंचनाचे प्रमाण अधिक आहे. आधुनिकता आली. तरी आत्महत्या का होत आहेत? त्याचे कारण आजचे धोरण हे शेतीप्रधान नाही. शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव नाही. शिवकाळातल्याप्रमाणे शेतकर्‍यांना शून्य टक्के व्याजदराने कर्ज नाही. अतिरिक्त शेतीमाल असताना परदेशातला शेतीमाल आयात करून येथील शेतकरी मारण्याचे धोरण आखले जात आहे. शेती आणि शेतकरी वाचविण्यासाठी छत्रपती शिवाजी राजांच्या शेतीधोरणाची आज आपल्या देशाला गरज आहे.

– डॉ. श्रीमंत कोकाटे, इतिहास संशोधक 

Back to top button