वीज कडाडली तर? | पुढारी

वीज कडाडली तर?

राजू, राणी, खोलीत पंखा चालू ठेवून तुम्ही कुठे हिंडताय रे?
मी नाही ग, हीच!
नाही ग! हाच असेल. हा नेहमी बाथरूममधला गीझर चालू ठेवतो ग आई!
माहितीये. तू इस्त्री चालू ठेवून फोनवर अर्धा अर्धा तास बोलत असतेस.
समजलं सोन्यांनो. आपल्याकडे वीज फुकट येते. आपल्या घरात पंखे, दिवे कोणीच लावत नाही. चालू ठेवत नाही. सगळे आपले आपण सुरू होतात. बंद व्हायचं विसरतात. शिवाय दिवसभर घरभर फिरून बटणं बंद करायला मी तर रिकामीच आहे ना! मी बटणं बंद करत्येय. बाबा अवाच्या सवा वीज बिल भरताहेत दरमहा. तुम्ही का फिकीर करावी, नाही का?
बाबांना तर एअरकंडिशनर लावून खोली सताड उघडी ठेवायची सवय आहे आई.
त्यांना येता-जाता गारवा हवा असणार रे! ए.सी. म्हणा, पंखा म्हणा, चालू राहिला, तर रिकामी खोली उलट जास्तच गार नाही का होणार?
हो तर. गीझर चालू राहिला, तर पाणीही पुन्हा पुन्हा उकळून शुद्धच होईल की! किती फायदे आहेत ना वीज वाया घालवण्याचे? चिल आई.
मेल्यांनो, चिल व्हायला म्हणजे गारठायलाही वीजच लागते ना? पुढे तीही कडाडली की, काय दिवे लावणार आहात? विजेशिवाय म्हणजे तेलाचेच दिवे लावावे लागतील नाही का आई?
तुझीच रे, तुझीच एवढी तैलबुद्धी असणार बरं. पोरांनो, लक्षात घ्या, पुढे तुम्हालाच विजेशिवाय अंधारात बसावं लागणार आहे. उजेडात आहात तोवर डोळे उघडा.
तू म्हणजे अगदी संकटच आल्यासारखं सांगतेस आई.
नुसतं संकट नाही, बाबांनो, महासंकट! महावितरणवर आलेलं. दिवसादिवसाने अंधार गडद होत चाललाय त्याच्यापुढचा.
काय सांगतेस? आख्खं वीजबोर्ड अंधारात? मग, आपण लोकांनी काय करावं?
तसंही गेली पंधरा-वीस वर्षं त्यांचं गणित चुकत चाललंच आहे. बिल वसुली धड होत नाही. वीजमाफीचा घोळ निस्तरत नाही. सौरऊर्जा हवी तेवढी स्वस्तात मिळवता येत नाही. त्यात आता कोळसा साठा संपायला आलाय, असं म्हणतात.
पण, तोतर उगाळावा तेवढा काळाच होतो ना? तूच शिकवली आहेस म्हण.
टवळे, मी तुम्हाला बटणं बंद करायलाही शिकवलंय. ते नाही लक्षात ठेवत इथे कोणी. बाबांनो, वीज संकट वाढत चाललंय. आताच केव्हाही कुठेही भारनियमन व्हायला लागलंय. इकडे तुमचा यंत्रांचा वापर वाढत चाललाय. या सगळ्यात वीज कडाडली, तर तुमचे हाल कुत्रा खाणार नाही. घरात यंत्रं असतील; पण ती चालवायला वीजच मिळणार नसेल, तर काय कराल?
तुला नेहमीच जरा भडक चित्र रंगवायला आवडतं का आई? साधा नळ उघडा राहिला, तरी लगेच ‘तिसरं महायुद्ध पाण्यावरून होणार आहे’ वगैरे सुरू करतेस तू. कशाकशावरून नक्की जगबुडी होणार आहे तुझ्या मते?
हा नुसता माझ्या मताचा प्रश्न नाहीये सोन्यांनो! अजून भानावर या. वीज वाचवाल तर स्वतः वाचाल. नाही तर भविष्य अंधारातच राहणार तुमचं!

– झटका

Back to top button