टाटांचे नवे उड्डाण! | पुढारी

टाटांचे नवे उड्डाण!

आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची ओळख निर्माण करणार्‍या एअर इंडियाची टाटा समूहाकडील हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण झाली आणि आपल्या ‘महाराजा’सोबत टाटा समूहाने सात दशकांनी स्वप्नवत उड्डाण केले. एअर इंडियाच्या ‘महाराजा’ने सरकारला टाटा करून स्वगृही प्रवेश केला. ‘टाटा सन्स’चे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि त्यानंतर ‘एअर इंडिया’च्या कार्यालयात जाऊन हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण केली. ही प्रक्रिया म्हणजे एका सरकारी कंपनीचे खासगी कंपनीकडे हस्तांतरण एवढ्यापुरते मर्यादित नाही. सामाजिक उत्तरदायित्वाच्या भूमिकेबरोबरच तिला एक भावनिक किनारसुद्धा आहे. सरकारी कंपन्यांच्या खासगीकरणाविरोधात विरोधी पक्षांपासून अर्थतज्ज्ञांपर्यंत अनेक घटक केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवत असताना एअर इंडियाच्या हस्तांतरणाबाबत मात्र कुणी नकारात्मक सूर लावला नाही, याची इथे मुद्दाम नोंद घ्यायला पाहिजे. कोणतीही कंपनी उत्तम रितीने चालणे म्हणजे उत्तम सेवा देणे, आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची प्रतिमा उन्नत करणे, कंपनी आर्थिकद़ृष्ट्या सक्षम बनवणे आणि कंपनीच्या हजारो कर्मचार्‍यांच्या हिताचे रक्षण करणे अशा अनेक द़ृष्टिकोनातून पाहिले जाते. या सर्व निकषांवर एअर इंडियाची गेल्या काही वर्षांतील अवस्था चिंताजनक होती. एखादा रुग्ण दीर्घकाळ व्हेंटिलेटरवर ठेवल्यामुळे तो जिवंत राहू शकतो; परंतु बरा होण्याची खात्री नसते. एअर इंडियाचा ‘महाराजा’ अनेक वर्षे व्हेंटिलेटरवर होता. त्याच्यात प्राण फुंकून त्याला नव्याने भरारी मारण्यासाठी सिद्ध करायला एखाद्या सिद्धीप्राप्त वैद्याची आवश्यकता होती. त्याद़ृष्टीने विचार केला, तर टाटांइतका खात्रीशीर वैद्य दुसरा कुणीही नव्हता. टाटा हे एकमेव असे वैद्य होते की, ज्यांना रुग्णाचा पूर्वेतिहास माहिती होता आणि त्याला बरे करण्याची क्षमताही होती. सर्व मालमत्ता आणि कंपनीवर असलेल्या सुमारे 15 हजार 300 कोटींच्या कर्जासह ‘टाटा सन्स’ने 18 हजार कोटी रुपयांची बोली लावली. त्यानुसार ऑक्टोबर 2021 मध्ये एअर इंडिया टाटाच्या मालकीची होण्यावर शिक्कामोर्तब झाले होते. गुरुवारी ही प्रक्रिया पूर्ण झाली आणि कंपनी सरकारच्या मालकीतून मुक्त होऊन पूर्णपणे टाटा समूहाच्या मालकीची झाली. टाटा समूह आता तीन विमान कंपन्यांचा मालक झाला असून समूहात यापूर्वी एअर एशिया आणि विस्तारा या दोन विमान कंपन्या आहेत. एअर इंडियाची खरेदी हा टाटा समूहासाठी केवळ एका कंपनीचा व्यवहार नव्हता, तर भूतकाळात आपल्यापासून दुरावलेला वारसा पुन्हा मिळवण्यासाठीची आस आणि तितकीच स्पर्धाही होती. म्हणूनच एअर इंडियाची बोली जिंकल्यानंतर रतन टाटा यांनी जाहीरपणे आनंद व्यक्त करताना जेआरडी टाटा यांचा विमानासोबतचा फोटो ट्विट केला होता.

जेआरडी टाटा आणि त्यांचे मित्र नेविल व्हिन्सेंट यांनी टाटा एअरलाइन्सची सुरुवात केली होती. 1929 मध्ये पायलटचे लायसन मिळालेले जेआरडी टाटा भारताचे पहिले पायलट होते, तर व्हिन्सेंट हेवीवेट बॉक्सर आणि ब्रिटिश रॉयल एअरफोर्समध्ये फायटर पायलट होते. दोघांनी दोन लाख रुपयांच्या गुंतवणुकीतून टाटा एअरलाइन्सची स्थापना केली. टाटा ग्रुपचे तत्कालीन अध्यक्ष दोराबजी टाटा यांची त्यासाठी तयारी नव्हती; मात्र अनेक महिने मनधरणी केल्यानंतर ते त्यासाठी तयार झाले होते. 15 ऑक्टोबर 1932 रोजी टाटा एअरलाइन्सच्या पहिल्या विमानाने कराचीहून मुंबईला उड्डाण केले होते. दुसर्‍या महायुद्धाच्या काळात विमानसेवा खंडित झाली होती, ती पुन्हा सुरू झाल्यावर 29 जुलै 1946 रोजी टाटा एअरलाइन्स पब्लिक लिमिटेड कंपनी बनली आणि तिचे नामकरण ‘एअर इंडिया’ असे करण्यात आले. दोन वर्षांनी आंतरराष्ट्रीय सेवा सुरू करण्यासाठी एअर इंडिया इंटरनॅशनल लिमिटेड सुरू करण्यात आली. यामध्ये 49 टक्के भागीदारी सरकारने घेतली आणि तेव्हापासून बोधचिन्हावरील ‘महाराजा’चे एअर इंडिया परिवारात आगमन झाले. वैशिष्ट्यपूर्ण सेवांसह एअर इंडिया लवकरच जगातील सर्वश्रेष्ठ विमान कंपन्यांपैकी एक म्हणून ओळखली जाऊ लागली. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 1953 मध्ये एअर इंडियाच्या राष्ट्रीयीकरणाचा प्रस्ताव मांडला, तेव्हा जेआरडी टाटा यांनी त्याविरोधात जोरदार संघर्ष केला. परंतु, सरकारने सर्व हवाई सेवांच्या राष्ट्रीयीकरणाचा निर्णय घेतला असल्यामुळे टाटा समूहाला काही करता आले नाही. एअर इंडियासाठी सरकारने तेव्हा टाटा समूहाला 2.8 कोटी रुपये दिले होते आणि आज सत्तर वर्षांनी त्याच टाटा समूहाने 18 हजार कोटी रुपये मोजून एअर इंडियाचा पुन्हा ताबा मिळवला. एअर इंडिया टाटा समूहाकडे आल्यामुळे आता सगळ्या अडचणी संपल्या, असे मानण्याचे कारण नाही. कंपनीच्या सेवांचा दर्जा उंचावणे, प्रचंड स्पर्धात्मक युगात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय प्रवाशांना आपल्याकडे आकर्षित करणे आणि त्या माध्यमातून प्रचंड तोट्यातील एका कंपनीला पुन्हा ऊर्जितावस्थेत आणण्याचे आव्हान टाटा समूहापुढे आहे. वाढते इंधन दर, इंडिगो, जेटसारख्या कंपन्यांशी सेवा आणि दराची, तसेच काही आखाती विमान कंपन्यांशीही आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा करताना ‘कायम लेट’ हा शिक्काही पुसावा लागणार आहे. कारण, नव्वदच्या दशकाच्या मध्यावर हवाई क्षेत्र खासगी कंपन्यांसाठी खुले झाल्यानंतर त्यांनी स्वस्त तिकीट दरांच्या आधारे ग्राहकांना आकर्षित करायला सुरुवात केली आणि तिथून एअर इंडियापुढील अडचणी वाढत जाऊन ती कर्जाच्या खाईत लोटली गेली. आजची परिस्थिती पंचवीस वर्षांपूर्वी होती तशीच आहे. टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखर यांनी कर्मचार्‍यांना लिहिलेल्या पत्रात, ‘पुढील काळ हा एअर इंडियाचा सुवर्णकाळ असेल’, असा जो विश्वास व्यक्त केला आहे, तो त्या अर्थाने आश्वासक आहे.

Back to top button