प्रा. डॉ. एन. डी. पाटील : लढाऊ, पुरोगामी नेतृत्व | पुढारी

प्रा. डॉ. एन. डी. पाटील : लढाऊ, पुरोगामी नेतृत्व

महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात गेल्या 50-60 वर्षांपासून दीर्घकाळ आपला अमीट ठसा उमटवणारे प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्या निधनाने लढाऊ, संघर्षशील, पुरोगामी विचारवंत आणि वंचित, शोषित यांचा पाठीराखा हरपला आहे. सार्वजनिक आणि राजकीय जीवनात उथळपणा वाढत चाललेला असताना त्यांच्यासारख्या अभ्यासू आणि सुसंस्कृत व्यक्‍तिमत्त्वाची उणीव नेहमीच जाणवणारी आहे. सामाजिक आंदोलनांसह सीमा प्रश्‍नाच्या लढ्यातील त्यांची कामगिरी नोंद करावी अशीच आहे.

शेतकरी, कष्टकरी, कामकरी अशा शोषित आणि वंचितांसाठी त्यांनी नेहमीच आवाज उठवला. कोणत्याही प्रश्‍नाचा ते सखोल अभ्यास करीत आणि त्यांनी मांडलेले मुद्दे खोडता येणे कठीण होत असे. अशी अभ्यासू, लढाऊ व्यक्‍तिमत्त्वे दुर्मीळ होत आहेत. त्यामुळेच त्यांचे निधन हे चटका लावणारे आहे. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील ढवळी हे त्यांचे मूळ गाव.

घरची परिस्थिती जेमतेम. उच्च शिक्षण घेण्याची कसलीही परिस्थिती नसताना त्यांनी जिद्दीने उच्च शिक्षण घेतले. कर्मवीर भाऊराव पाटील यांचे ते लाडके विद्यार्थी होते. तेव्हा केशवराव जेधे, शंकरराव मोरे, दत्ता देशमुख अशा पुरोगामी नेत्यांनी शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांवर रान उठवले होते. याच पुरोगामी विचारांकडे ते ओढले गेले आणि त्यांनी शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला. त्यांनी ही वीणा शेवटपर्यंत सांभाळली.

शेतकरी, कष्टकर्‍यांच्या अनेक लढ्यांत ते अग्रभागी राहिले. पन्‍नासच्या दशकात संयुक्‍त महाराष्ट्र चळवळीने उग्र स्वरूप धारण केले होते. इतर पुरोगामी नेत्यांसमवेत त्यांनीही या लढ्यात उडी घेतली. सभांचे फड गाजविले. संयुक्‍त महाराष्ट्राचा मंगल कलश आला; पण बेळगाव, कारवार, बिदर, भालकी, निपाणीसह मराठी भाषिक प्रदेश कर्नाटकच्या घशात अडकला. 1970 च्या दशकात आम्ही कोल्हापुरात सर्वपक्षीय सीमा कृती समिती स्थापन केली.

समितीच्या अध्यक्षपदी आमची एकमताने निवड झाली. या माध्यमातून आम्ही सीमा प्रश्‍नावर वारंवार आवाज उठवला. सभा-परिषदा घेतल्या. 5 मे 1986 रोजी कोल्हापुरात आम्ही वरुणतीर्थ वेश मैदानावर भव्य सीमा परिषद घेतली. त्याचे स्वागताध्यक्ष एन. डी. पाटील होते. ज्येष्ठ नेते एस. एम. जोशी, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, शरद पवार यांच्यासह राज्यातील प्रमुख नेते, सीमाभागातील जनसमुदायासह सीमालढ्याचे नेते यावेळी उपस्थित होते. या परिषदेने सीमालढ्याला नवे चैतन्य आले. 1978 मध्ये शरद पवार यांनी महाराष्ट्रात पुरोगामी लोकशाही दल-पुलोद अशी आघाडी स्थापन केली.

त्या मंत्रिमंडळात प्रा. एन. डी. पाटील यांच्याकडे सहकार हे महत्त्वाचे खाते देण्यात आले. त्यांनी अतिशय अभ्यासपूर्वक कापूस एकाधिकार योजना अमलात आणली. कापूस उत्पादकांची व्यापार्‍यांकडून होणारी लूट थांबावी, हा त्यांचा हेतू होता. सहकार सम्राटांच्या गैरकारभाराला आळा घालायचा प्रयत्न त्यांनी केला. कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन व्हावे, यासाठी आम्ही लढा उभारला. त्यात ते आमच्या समवेत सहभागी होते.

कोल्हापूरवर टोल लादण्यात आला, तेव्हा ‘पुढारी’ने त्या विरोधात आवाज उठवला. लोकलढा उभा राहिला. तीन महामोर्चे निघाले. त्यात आमच्यासह ते अग्रभागी होते. टोल अखेर गाडला गेला. या सार्‍या लढ्यातून कोल्हापूरशी त्यांचे असलेले नाते दृढ झाले. ते मूळचे सांगली जिल्ह्यातील असले तरी त्यांनी कोल्हापूर ही कर्मभूमी मानली. इथूनच त्यांनी अनेक लढ्यांचे रणशिंग फुंकले.

त्यांच्या या सार्वजनिक कार्याला कोल्हापूरकरांनी पोचपावती दिली आणि 1985 च्या विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर मतदारसंघातून त्यांना विजयी केले. ते पाच वर्षे विधानसभा सदस्य आणि अठरा वर्षे विधान परिषदेचे सदस्य होते. या काळात त्यांच्या इतका सरकारवर घणाघाती टीका करणारा अन्य कोणी नसेल.

आपले मेहुणे शरद पवार हे सत्ताधारी बाकावर आहेत, म्हणून त्यांनी कधी आपला सडेतोड बाणा सोडला नाही. महाराष्ट्र सरकारच्या शिक्षण खात्याने एक शैक्षणिक श्‍वेतपत्रिका काढली होती. ज्यांची कुवत आहे, त्यांनाच या व्यवस्थेत शिक्षण मिळण्याची सोय होती. गरीब, वंचित आणि शोषित मुलांना त्याचा लाभ होण्याची शक्यता धूसर होती. अशावेळी एन. डी. पाटील यांनी ‘शैक्षणिक कृष्ण पत्रिका’ प्रसिद्ध करून या श्‍वेतपत्रिकेची चिरफाड केली. अखेर सरकारला तडजोड करावी लागली. शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांवर त्यांनी दिलेले आक्रमक लढे नोंद घ्यावी असे आहेत.

रायगड जिल्ह्यात ‘एसईझेड’ उभारण्यात येणार होता. त्यासाठी हजारो शेतकर्‍यांची 35 हजार एकर जमीन या प्रकल्पात जाणार होती. शेतकरी भूमिहीन होणार होते. एन. डी. पाटील यांनी प्रश्‍न हाती घेतला. धसास लावला आणि शेवटी सरकारला माघार घ्यायला लावली. कोल्हापुरातील कृषी पंपाच्या वीज बिलांबाबत त्यांनी दिलेला लढा सदैव स्मरणात राहणारा आहे. मराठा आरक्षण लढ्यातही वंचितांना न्याय देण्यासाठी ते उतरले होते. लढाऊ, झुंजार नेत्याबरोबरच पुरोगामी विचारवंत ही त्यांची ओळख समाजमनात रुजली आहे.

डॉ. आंबेडकर प्रबोधिनी, समाजवादी प्रबोधिनी, अंधश्रद्धा निर्मूलन समिती या संस्थांतून त्यांनी पुरोगामी परिवर्तनशील चळवळीचा मार्ग प्रशस्त केला. कर्मवीर विद्या प्रबोधिनीतून शैक्षणिक प्रकाशने सुरू केली. मुलींसाठी सावित्रीबाई फुले दत्तक योजना राबविली. ऊसतोडणी कामगारांच्या मुलांसाठी साखर शाळा, बहुजन समाजातील विद्यार्थ्यांसाठी संगणक प्रशिक्षण केंद्र असे अनेक उपक्रम त्यांनी राबविले. शोषित आणि वंचित समाज स्वबळावर उभारावा यासाठी ते अथकपणे राबले.

शिवाजी विद्यापीठासह चार विद्यापीठांनी त्यांना सन्माननीय डॉक्टरेट दिली. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे अध्यासन उभारून त्यांनी पूर्वसुरींच्या ऋणाची आठवण ठेवली. एवढे चतुरस्त्र आणि चौफेर काम करूनही त्यांनी स्वतःचा कधी बडेजाव, अवडंबर माजवले नाही. सामान्यांपासून बड्या नेत्यांपर्यंत ते सर्वांशी आपुलकीने वागत. अलीकडील काळात असा अष्टपैलू, दूरदृष्टीचा नेता क्‍वचितच दिसून येतो. त्यांचे पुरोगामी, सार्वजनिक कार्य पुढे चालविणे, वंचित आणि शोषितांना न्याय देण्याची भूमिका प्रामाणिकपणे बजावणे, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल!

Back to top button