वैद्यकीय अधिकार्‍यांची सेवा एक वर्षाने वाढली | पुढारी

वैद्यकीय अधिकार्‍यांची सेवा एक वर्षाने वाढली

पिंपळनेर:पुढारी वृत्तसेवा; सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिपत्याखालील आरोग्य सेवा आयुक्तलयातर्गंत महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट-अ व राज्य कामगार विमा योजनेतील महाराष्ट्र वैद्यकीय विमा सेवा गट अ मधील वैद्यकीय अधिकारी तसेच वरिष्ठ पदावरील सर्व कार्यरत अधिकार्‍यांचे सेवानिवृत्तीचे (वय ६२) वर्षापर्यंत वाढविण्याचा राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने नुकताच निर्णय घेतला आहे.

कोरोनाच्‍या वाढत्‍या प्रादुर्भाव  नियंत्रण मिळवण्याच्या दृष्टीने उपाययोजना करणे व त्याची अंमलबजावणी करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी तसेच वरिष्ठ अधिकायांची विभागास नितांत आवश्यकता आहे. त्यातच ३१ मे २०२१ अखेर गट अ मधील विविध संवर्गातील १९३ अधिकारी सेवानिवृत्त होत आहेत. कोरोनाच्‍या वाढता प्रादुर्भाव बघता अधिकार्‍यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. ३१ मे २०२१ पासून ३१ मे २०२२ पर्यंत शासन निर्णय अमलात राहणार आहे. महाराष्ट्र शासनाचे अवर सचिव वि.पु.घोडके यांनी राज्यपाल यांच्या आदेशानुसार ३१ मे रोजी यासंदर्भातील  आदेश काढला आहे.

आरोग्य सेवेतील रिक्त पदे

वैद्यकीय अधिकारी तसेच विशेषज्ञ पदासाठी प्रयत्न करूनदेखील पुरेशा प्रमाणात वैद्यकीय अधिकारी उपलब्ध होत नाहीत. उपलब्ध झाल्यावर देखील पसंतीच्या ठिकाणी पदस्थापना न मिळाल्यास सेवेत रुजू न होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. परिणामी आरोग्य सेवेतील पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त राहत असल्यामुळे त्याचा राज्यातील आरोग्यसेवेवर परिणाम होत आहे. 

सार्वजनिक आरोग्य विभागाने वेळोवेळी काढलेले शासन निर्णय २९ ऑगस्ट २०१८, १जुलै २०१९, २६ नोव्हेंबर २०१९ यात निवृत्तीसंदर्भात वेळोवेळी निर्णय घेतले आहेत. ३१ मेच्या निर्णयानुसार वैद्यकीय अधिकारी, वरिष्ठ पदावरील सर्व कार्यरत अधिकारी यांचे सेवानिवृत्तीचे वय ६२ वर्षापर्यंत वाढविण्यात आले आहे.

Back to top button