पीएमपीचे स्पष्टीकरण; कैलास त्रिवेदी व राहुल ताथवडे यांनी केली छेडछाड | पुढारी

पीएमपीचे स्पष्टीकरण; कैलास त्रिवेदी व राहुल ताथवडे यांनी केली छेडछाड

पुणे : पुढारी वृत्तसेवा

पीएमपी अध्यक्ष कार्यालयात नसताना महापौरांच्या सांगण्यानुसार कैलास त्रिवेदी व राहुल ताथवडे यांनी पीएमपीच्या अध्यक्षांच्या संगणकाशी छेडछाड केली असल्याचे स्पष्टीकरण पीएमपी प्रशासनाकडून दिले आहे. याप्रकरणी महापालिकेचे कर्मचारी असलेल्या त्रिवेदी आणि ताथवडे यांची स्वारगेट पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली असून, हे दोघे महापालिका कर्मचारी असल्याने आयुक्तांना देखील पीएमपीने याबाबत सांगितले आहे.

पीएमपीएमएलचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक घरगुती कारणास्तव एक दिवसाच्या किरकोळ रजेवर होते. त्यावेळी महापौरांनी पीएमपी मुख्यालयात जाऊन सहव्यवस्थापकीय संचालक व कंपनी सेक्रेटरी तथा विधी अधिकारी यांना संचालकांच्या दालनात बोलावून घेवून संचालक मंडळाच्या बैठकीतील वृत्तांताची प्रत व रेकॉर्डिंग मिळण्याची मागणी केली. सहव्यवस्थापकीय संचालकांनी इतिवृत्तांत अंतिम करण्याचे कामकाज चालू असुन तो अंतिम झाल्यानंतर आपणास त्वरित देण्यात येईल, असे सांगितले.

परंतु, महापौर मुरलीधर मोहोळ संचालक शंकर पवार व त्यांच्या समवेत आलेल्या कैलास त्रिवेदी व राहुल ताथवडे यांना घेऊन पीएमपी अध्यक्षांच्या दालनात अध्यक्ष नसताना गेले. तसेच, संगणकावरील झूमचे रेकॉर्डींग कसे काढता येईल, याची विचारणा त्यांनी बरोबर आलेल्या व्यक्तिंना केली व रेकॉर्डींग सोबत घेवून येण्याच्या सुचना करून महापौर दालनातून निघुन गेले. त्यानंतर त्रिवेदी व ताथवडे या दोघांनी अध्यक्षांच्या परवानगीविना व ते गैरहजर असताना अध्यक्षांच्या दालनातील संगणक चालू करण्याचा प्रयत्न केला. यावेळी सहव्यवस्थापकीय संचालक यांनी सदरचे रेकॉर्डींग या संगणकावर उपलब्ध नसुन संगणकावर छेडछाड न करण्यास सांगितले. मात्र, तरीही त्यांनी ऐकले नाही. ही बाब गंभीर असल्यामुळे या घटनेचा वृत्तांत पीएमपी अध्यक्षांना दुरध्वनीवरून देण्यात आला. अध्यक्षांनी सुरक्षा अधिकारी यांना पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्याच्या सुचना दिल्या. त्यावेळी पीएमपीचे रखवालदार अरीफ हुसेन तांबोळी यांनी स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये त्रिवेदी व ताथवडे यांच्या विरोधात तक्रार नोंदविली. 

Back to top button