लॉकडाऊनमुळे वाढले भावकीचे वाद | पुढारी | पुढारी

लॉकडाऊनमुळे वाढले भावकीचे वाद | पुढारी

आजरा : ज्योतिप्रसाद सावंत

शेतीमध्ये राबावे लागणार असा ग्रह करून मुंबई, पुण्यासारख्या शहरामध्ये नोकरीसाठी गावातून गेलेल्या चाकरमान्यांना लॉकडाऊनमुळे गावी परतावे लागले आहे. गावाकडे असणार्‍या शेतीसह घरादाराचे महत्त्व प्रथमच समजल्याने घराघरांमध्ये भावकीचे वाद वाढले आहेत. दिवसभर शेतात कामानिमित्त जावे लागत असल्याने बांधांसह हद्दीचे वादही उफाळले आहेत. 

सलग दोन वर्षे कोरोनाचे संकट कायम असल्याने मुंबई, पुण्यातील खासगी कंपन्या, संस्था येथे कामाला असणारा ग्रामीण भागातील चाकरमानी गावीच अडकून पडला आहे. शेतीमध्ये करावे लागणारे कष्ट टाळण्यासाठी नोकरीला प्राधान्य देणार्‍या या चाकरमान्यांना नोकर्‍या गमावल्यानंतर शेती व गावाकडील घरादाराचे महत्त्व कळू लागले आहे. दोन-चार दिवसाकरिता जत्रा, यात्रा, विवाह, सण, धार्मिक समारंभ, उन्हाळी सुट्टी याकरिता एकत्र येणारी भावकी आता वर्षभर एकत्र असल्याने जमिनींचे वाद होऊ लागले आहेत. बहुतांशी चाकरमान्यांनी गावीच स्थायिक होण्याचा विचार पक्का केल्याने गावी असणार्‍या घराघरांमध्ये भिंती उभ्या राहू लागल्या आहेत. स्थानिक तंटामुक्त कमिट्यांच्याकडेही असे वाद न्यायासाठी येऊ लागले आहेत.

घरोघरी असणारा मुंबई, पुण्यातील चाकरमानी तेथेच स्थायिक होणार असे गृहीत धरून वडिलोपार्जित जमिनी कसणारा स्थानिक शेतकरीवर्ग मात्र या भाऊबंदकीच्या वादामुळे चांगलाच अडचणीत येऊ लागला आहे. मोठ्या कष्टाने सांभाळलेल्या जमिनींचे तुकडे होऊ लागल्याने असे शेतकरी हतबल होताना दिसत आहेत. कमी प्रमाणात जमिनी असणार्‍या शेतकर्‍यांची यामुळे चांगलीच अडचण होऊ लागली आहे. इतरत्र कोठेही रोजगार नाही, पोटापुरते मिळणारे धान्यही या वादामुळे मिळेल की नाही, याची शाश्वती नाही, अशीच काहीशी परिस्थिती आहे.  एकंदर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर झालेला लॉकडाऊन घरोघरी व एकत्र कुटुंबांमध्ये भिंती उभारण्यास कारणीभूत ठरू लागला आहे. 

लॉकडाऊन कालावधीत कामधंद्यानिमित्त बाहेर असणारी मंडळी गावी परतली आहेत. पुन्हा काम मिळेल याची शाश्वती नसल्याने गावातील शेतीवाडीसह स्थावर मालमत्तेवरील अधिकाराची जाणीव प्रथमच झाल्याचे दिसत आहे. सध्या न्यायालय बंद असल्याने या शेतीवाडीतील आपला हिस्सा कायदेशीर मार्गाने कसा पदरात पाडून घेता येईल याची अनेक मंडळी चाचपणी करू लागली आहेत. न्यायालय सुरू होताच असे खटले मोठ्या प्रमाणावर दाखल होण्याची चिन्हे आहेत.
– अ‍ॅड. डी. डी. आजगेकर 

Back to top button