सोलापूर शहरातील निर्बंध आणखी शिथिल | पुढारी

सोलापूर शहरातील निर्बंध आणखी शिथिल

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा

राज्यातील कोरोना लॉकडाऊन अंतर्गतचे निर्बंध शिथिल करणारी नवीन नियमावली राज्य शासनाने शुक्रवारी मध्यरात्री जाहीर केली आहे. सोमवार, (दि. 7) पासून ती लागू होणार आहे. मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी याबाबतचा आदेश काढला. सोलापूर जिल्ह्याचा तिसर्‍या टप्प्यात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे सोमवारपासून शहरात लॉकडाऊनचे निर्बंध आणखी शिथिल होणार आहेत. दरम्यान, याबाबत मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांच्याकडून रविवारी पुन्हा सुधारित आदेश निघण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागातील शिथिलतेबाबत जिल्हाधिकारी निर्णय घेणार आहेत.

राज्याच्या मुख्य सचिवांनी लॉकडाऊन निर्बंध कमी करण्याच्या नियोजनामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी शुक्रवारी मध्यरात्री यासंदर्भातील नियमावली जारी केली आहे. यानुसार अकोला, बीड, कोल्हापूर, उस्मानाबाद, पालघर, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. दुकाने सोमवार ते शुक्रवार 7 ते 4 वाजेपर्यंत सुरू राहतील. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार शनिवार आणि रविवार बंद राहणार आहेत. मॉल्स आणि सिनेमागृहे पूर्णपणे बंद राहतील. हॉटेल्स 50 टक्के क्षमतेने सकाळी 7 ते 4 वाजेपर्यंत खुली राहतील. दुपारी 4 नंतर पार्सल सेवा सुरू राहील. सार्वजनिक उद्याने, मैदाने, वॉकिंग ट्रॅक, सायकलिंग ट्रॅक सकाळी 5 ते 9 यावेळेत सुरू राहतील. खासगी आणि सरकारी कार्यालयात 50 टक्के क्षमतेने उपस्थिती राहील. इनडोअर खेळले जाणारे स्पोर्टस् बंद राहतील. सिनेमा चित्रीकरणाला स्टुडिओमध्ये परवानगी असेल. सामाजिक, सांस्कृतिक, मनोरंजनात्मक कार्यक्रमाला 50 टक्के क्षमतेने दुपारी 2 वाजेपर्यंत परवानगी राहील. लग्नसोहळ्याला  50 जणांची उपस्थिती, अंत्यसंस्काराला 20 जणांची उपस्थिती, इतर बैठकांना 50 टक्के उपस्थित राहील. कृषी क्षेत्रातील कामांना आणि ई-कॉमर्स, बांधकाम क्षेत्रातील कामांना दुपारी 4 वाजेपर्यंत परवानगी राहील. दुपारी 4 वाजल्यानंतर जमावबंदी कायम राहणार आहेत.

दर आठवड्याच्या सरासरीनुसार दवाखान्यात भरलेल्या ऑक्सिजन बेडचे प्रमाण आणि त्या त्या जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी दर याआधारे प्रत्येक जिल्ह्याच्या प्रशासनाने नियमावलीसंदर्भात स्वतंत्र आदेश काढावेत, अशा सूचना शासनाने दिल्या आहेत. या दोन निकषांआधारे नियमावली कशी असेल हे राज्य शासनाने निश्चित केले आहे. त्यानुसार प्रत्येक आठवड्यात या दोन निकषांवर जिल्ह्यांची वर्गवारी करून नियमावलीनुसार निर्बंध शिथिल वा कडक केले जाणार आहेत. याचे शासनाने एकूण पाच स्तर निश्चित केले आहेत. 

सूचना आणि जिल्ह्याची स्थिती पाहून निर्णय

तिसर्‍या टप्प्यात अनेक गोष्टी शिथिल कराव्यात, अशा सूचना राज्य शासनाकडून करण्यात आल्या आहेत. त्यामुळे कोणत्या गोष्टी कोणत्या पद्धतीने सुरू करायच्या, याचे स्पष्ट आदेश आहेत. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील ऑक्सिजन बेडवरील रुग्णांची संख्या आणि पॉझिटिव्हिटी दर तसेच आतापर्यंत करण्यात आलेल्या लसीकरणाची संख्या लक्षात घेऊन जिल्ह्यातील ग्रामीण भागात काही गोष्टींना अशंत: शिथिलता देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली आहे.

ग्रामीण भागाला निर्बंध शिथिलतेची प्रतीक्षा

लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अनेक व्यवसाय ठप्प झाले आहेत. त्यामुळे किरकोळ व्यावसायिकांसह बाराबलुतेदारही अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे अनेकजण आर्थिक अडचणीत सापडले आहेत. अशा परिस्थितीत शासनाने ग्रामीण भागातील निर्बंध कमी करावेत, अशी मागणी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसह व्यापारी आणि व्यावसायिकांनी लाऊन धरली आहे. अनेकांना उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे तत्काळ ग्रामीण भागातील निर्बंध कमी करण्याची मागणी आता जोर धरत आहे.

 

Back to top button