हन्नूर येथे विजेचा धक्‍का बसून १७ वर्षीय युवकाचा मृत्यू | पुढारी

हन्नूर येथे विजेचा धक्‍का बसून १७ वर्षीय युवकाचा मृत्यू

अक्‍कलकोट : पुढारी वृत्तसेवा

तालुक्यातील हन्नूर येथील प्रसाद धर्मण्णा हाताळे (वय 17) याचा घरात लाईटचे बटण बंद करत असताना विजेचा धक्का बसून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी 8 जून रोजी  सकाळी 7 वाजता घडली.

याबाबत माहिती अशी की, प्रसाद हाताळे हा दयानंद महाविद्यालयात बीएससी प्रथम वर्षात शिक्षण घेत आहे. सध्या लॉकडाऊनमुळे गेल्या अनेक दिवसांपासून तो मुळगावातल्या घरीच राहण्यास आहे. सकाळच्या वेळी प्रसाद लाईटचे बटन बंद करत असताना अचानक विजेचा धक्का बसल्याने जखमी झाला. 

ही माहिती लिंबण्णा सिद्धाराम हाताळे यांना सकाळी शेतात काम करत असताना त्यांचे भाऊ प्रवीण हाताळे यांनी फोनवर सांगितली. त्यानंतर जखमी प्रसादला हन्नूर येथील एका दवाखान्यात दाखवण्यात आले. पण डॉक्टरांनी त्यास अक्कलकोटला घेऊन जाण्यास सांगितले. अक्कलकोट येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणी करून त्यास मृत घोषित केले. 

प्रसादच्या पश्‍चात आई, वडील व एक बहीण असा परिवार आहे. त्याच्या मृत्यमुळे गावावर शोककळा पसरली होती. या घटनेची खबर लिंबण्णा सिद्धाराम हाताळे यांनी अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्यात दिली आहे. अधिक तपास उत्तर पोलिस ठाण्याचे सपोनि करीत आहेत.

 

Back to top button