शाळा बंदचा छत्री व्यावसायिकांना फटका | पुढारी

शाळा बंदचा छत्री व्यावसायिकांना फटका

मुंबई : गणेश शिंदे

सलग दुसर्‍या वर्षीही कोरोनाचे संकट कायम असल्याने मुंबईतील छत्री व्यावसायिक यंदाही आर्थिक कचाट्यात सापडले आहेत. लॉकडाऊन काळात परराज्यांसह स्थानिक बाजारपेठेत छत्री, रेनकोटची मागणी कमी झाल्याने आणि शाळा बंद असल्याने 50 टक्के व्यवसाय कमी झाला असल्याचे काळबादेवी परिसरातील विक्रेते सांगतात.  

कोरोनामुळे प्राथमिकपासून माध्यमिकपर्यंत शाळा सध्या बंद आहेत. पालक वर्ग दरवर्षी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात छत्री, रेनकोट खरेदी करतो. पण यंदाही शाळा सुरू होण्याची शक्यता कमीच असल्याने पालकांनी याकडे पाठ फिरवली आहे. त्याचा फटका छत्री विक्रेत्यांना बसला आहे. शाळा बंदमुळे छत्री, रेनकोट याची विक्री 20  टक्क्यांनी घटली असल्याचे व्यावसायिक सांगतात.

मुंबई काळबादेवी परिसरातील चिराबझार येथील कोलभाट लेन, बाबू गेनू रोड या मार्गावर सुमारे 50  च्यावर छोटे-मोठे छत्री विक्रेते आहेत. येथील व्यावसायिक व्यापारी चीनमधून कच्चा माल मागवतात. 

छत्रीसाठी लागणारे कापड किंवा अन्य कच्चा मालाची चीन संपूर्ण जगाला निर्यात करतो. गतवर्षी चीनमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव होता. त्याचा फटका येथील व्यावसायिकांना बसला होता. निर्यात ठप्प झाल्याने छत्री उद्योगही ठप्प झाला होता. दरम्यान, भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव जून 2020 मध्ये हळूहळू कमी होऊ लागला. त्यानंतर येथील व्यवहार पूर्वपदावर येऊ लागले. मात्र ग्राहक नसल्याने व शाळा बंद असल्याने व्यावसायिकांना आर्थिक झळ बसली.

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे 15  मार्च ते 17 मे 2021  पर्यंत चिराबजार येथील होलसेल व किरकोळ विक्रेते यांची दुकाने बंद होती; पण छत्री हे उत्पादन अत्यावश्यक सेवेत राज्य सरकारने समावेश केल्याने 18 मे 2021 पासून व्यवसाय सुरू करण्यास परवानगी मिळाली आहे.

मात्र मुंबईतील लोकल रेल्वेसेवा सर्वसामान्यांना बंद असल्याने त्याचाही परिणाम व्यवसायावर होत असल्याचे घाऊक विक्रेत्यांनी सांगितले. दुसरीकडे, स्थानिक बाजारपेठेत छत्री मालाची ने-आण करणार्‍या हमालांनाही याची आर्थिक झळ बसत आहे.

सलग दुसर्‍या वर्षीही कोरोनामुळे छत्री व्यावसायिकांचा धंदा निम्म्यावर म्हणजे 50  टक्क्यांवर आला आहे. दुसरीकडे, कच्चा मालाचे दर वाढले आहेत. स्टील 40 रुपये प्रतिकिलोवरून ते 80 रुपये, प्लास्टिक 80 रुपयांवरून ते 150  रुपयांवर गेले आहे. तसेच छत्रीचे कापड सुमारे 15 टक्के वाढले आहे. अशा दुहेरी संकटात व्यावसायिक सापडले आहेत.

 

Back to top button