बेळगाव लॉक, राज्य अनलॉक | पुढारी | पुढारी

बेळगाव लॉक, राज्य अनलॉक | पुढारी

बंगळूर : पुढारी वृत्तसेवा

सोमवारपासून बेळगावसह 11 जिल्हे वगळून राज्यातील 19 जिल्ह्यांत अनलॉक प्रक्रिया सुरू होणार आहे. बेळगावकरांना मात्र आणखी  आठवडाभर, 21 तारखेपर्यंत घरातच राहावे लागणार आहे. काही कोरोना नियम शिथिल करण्यात येत असून जनजीवन पूर्वपदावर येणार आहे. पहिल्या टप्प्यातील अनलॉकमध्ये अत्यावश्यक वस्तू खरेदीसाठी वेळेत वाढ व इतर सवलती देण्यात येणार आहेत. सोमवारपासून रोज सायंकाळी सात ते दुसर्‍या दिवशी पहाटे पाचपर्यंत रात्रीचा कर्फ्यू लागू असेल. संपूर्ण राज्यासाठी हा नियम असणार आहे. शिवाय शुक्रवारी सायंकाळी सात ते सोमवारी पहाटे पाचपर्यंत वीकेंड कर्फ्यू असणार आहे. 

सोमवारपासून अनलॉक प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात सकाळी दहा ते दुपारी दोनपर्यंत अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी मुभा देण्यात येणार आहे. पहाटे पाच ते सकाळी दहापर्यंत उद्याने सुरू राहतील. रस्त्यावर बसून किंवा फिरून व्यापार करणार्‍यांनाही दुपारी दोनपर्यंत मुभा असेल. ऑटोरीक्षा, टॅक्सीतून केवळ दोन प्रवाशांना प्रवास करता येईल. गारमेंट फॅक्टरी 30 टक्के कामगारांसह सुरू करता येईल. इतर उत्पादन घटकाांना 50 टक्के कामगारांसह काम सुरू करता येणार आहे. 

राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस रस्त्यावर उतरणार नाहीत. मेट्रो सेवाही बंद राहील. बांधकाम कामे सुरू करता येतील. बांधकामासाठी आवश्यक साहित्याची विक्री करणारी सिमेंट, वाळू, पाईप आदी दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्यात येणार आहे. मॉल, चित्रपटगृह, जिम, जलतरण तलाव यांना परवानगी नसेल. लग्‍न व इतर समारंभ अंत्यसंस्कार सार्वजनिक कार्यक्रमांसाठी याआधी असणारे निर्बंध कायम राहतील.

संभाव्य तिसर्‍या लाटेची भीती कायम आहे. सरकारने यासाठी कोणती खबरदारी घेतली आहे याची संपूर्ण माहिती अद्याप जाहीर झालेली नाही. गेल्या चार दिवसांपासून कोरोना लस मोठ्या प्रमाणात उपलब्ध करण्यात आली आहे. राज्यात सर्वच ठिकाणी लसीकरण मोहीम वेगाने सुरू आहे. पण, अजूनही आवश्यक उद्दिष्ट  गाठलेले नाही. त्यामुळे कोरोना संसर्ग पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या 

पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसरी लाट भयानक होती. अशावेळी अनलॉक प्रक्रिया पूर्ण प्रमाणात लागू करणे आव्हानात्मक ठरणारे आहे. 

गतवर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी 7 ऑक्टोबर रोजी 10,947 सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. दुसर्‍या लाटेवेळी गेल्या 5 मे रोजी सर्वाधिक 50,112 रुग्णांची नोंद झाली.  शनिवारी 9785 रुग्ण आढळले असून पहिल्या लाटेतील सर्वाधिक रुग्णसंख्येजवळ ही संख्या आहे. कोरोना मृत्यूचा विचार केल्यास गतवर्षी 18 सप्टेंबर रोजी सर्वाधिक 179 रुग्ण मृत्यू झाले. दुसर्‍या लाटेत गेल्या 23 मे रोजी सर्वाधिक 626 जणांचा मृत्यू झाला. शनिवारी मृतांची संख्या 144 होती. 

राज्याच्या आरोग्य क्षेत्रातील 16 लाख लोकांपैकी 3.04  कार्यकर्त्यांना लसीकरण झाले आहे. दोन कोटी कामगारांपैकी केवळ 1.12 टक्के,  45 वर्षांपेक्षा अधिक वयोमानाच्या लोकांना 13.73 टक्के, 18 ते 44 वियोमानाच्या सव्वातीन कोटी लोकांपैकी केवळ 0.2 टक्के जणांना लस दिली आहे. राज्याच्या लोकसंख्येच्या तुलनेत केवळ चार 4.23 टक्के जणांना लस देण्यात आली आहे.

लसीकरण वाढवण्याची गरज

कोरोनाच्या बाबतीत सध्या खबरदारी हाच उपाय आहे. 18 ते 25 वयोगटातील लोकांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होणे आवश्यक आहे. कोरोनावर औषध नसल्याने लसीकरण गतीने करण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. पुढील काही आठवड्यांत जास्तीत जास्त जणांना लस देण्यात यावी अशी शिफारस तज्ज्ञांनी केली आहे. अनलॉक सुरू केल्यानंतर आंतरजिल्हा आंतरराज्य प्रवाशांमुळे पुन्हा संसर्ग वाढण्याची भीती आहे.

सरकारकडून उपाययोजना हवी

कोरोनाची संभाव्य तिसरी लाट भयानक असेल अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. ही लाट लहान मुलांना लक्ष्य बनविण्याची शक्यता आहे. यासाठी सरकारी पातळीवर वेगाने खबरदारी आवश्यक आहे. सरकारी रुग्णालयांत बालरोगतज्ज्ञ नियुक्त करणे, डॉक्टरांची अतिरिक्त फौज सज्ज ठेवणे, लहान मुलांच्या विलगीकरणाची व्यवस्था, तात्पुरती रुग्णालये सुरु करण्याची गरज आहे, आवश्यक प्रमाणात औषधांचा साठा करणेही गरजेचे आहे.

 

Back to top button