चिनी सायबर टोळीकडून दीडशे कोटी रुपयांचा चुना! | पुढारी

चिनी सायबर टोळीकडून दीडशे कोटी रुपयांचा चुना!

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने लोकांची फसवणूक करणार्‍या एका चिनी टोळीचा पर्दाफाश केला आहे. जवळपास 5 लाख भारतीय या टोळीचे बळी ठरले आहेत. दोन महिन्यांत चिनी टोळीने तब्बल 150 कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. लोकांचा डेटाही लांबविला आहे.

पैसे दुप्पट करण्याचे आमिष देऊन ही टोळी लोकांना फसवत होती, असे वरिष्ठ पोलिस अधिकारी अन्येश रॉय यांनी सांगितले. या प्रकरणात दोन चार्टर्ड अकाऊंटंटस्, एक तिबेटियन महिलेसह अकरा जणांना अटक करण्यात आली आहे. मल्टी लेव्हल मार्केटिंगमध्ये गुंतवणुकीच्या माध्यमातून मोठा परतावा देण्याचे आमिष या सर्वांनी लोकांना दिले होते. बँकेत जमा असलेली 11 कोटींची रक्‍कम पोलसांनी गोठविली असून, 97 लाखांची रोकड जप्‍त केली आहे.  

गुरुग्राममधील ज्या चार्टर्ड अकाऊंटंटच्या घरून 97 लाख रुपये जप्‍त करण्यात आले आहेत, त्याने चिन्यांसाठी तब्बल 110 बनावट (शेल) कंपन्या स्थापन करून ठेवलेल्या होत्या. चिनी ठगांकडून इझी प्लॅन, सन फॅक्टरी, पॉवर बँक आदींसारखे बनावट अ‍ॅप भारतीय बाजारात चालविले जात होते. पैकी पॉवर बँक हे अ‍ॅप गुगल प्ले स्टोअरवर डाऊनलोडिंग ट्रेन्डमध्ये चौथ्या क्रमांकावर आलेला होता.  घोटाळ्यात काही मोबाईल नंबर चीनमधून संचलित होत होते. हे नंबर बँक खात्यांना जोडलेले होते, अशी धक्‍कादायक माहितीही पोलिसांनी दिली.

व्हॉटस्अ‍ॅप, टेलिग्राम आदी अ‍ॅप्सच्या माध्यमातून लोकांशी संपर्क साधत. इच्छुक व्यक्‍तींसाठी बनावट बँक खात्यांची खरेदी, बनावट कंपन्यांची नोंदणी करणे, अ‍ॅप्सचा प्रचार आदी कामे या चिनी ठगांकडून केली जात होती. सूरत, बंगळूर, ओडिशा, पश्‍चिम बंगाल, दिल्ली एनसीआर आदी ठिकाणी हे सायबर ठग कार्यरत असल्याची खबर पोलिसांना प्राप्‍त झाली आहे. 

 

Back to top button