चीन चे सीमेवर ६० हजारांवर सैनिक तैनात | पुढारी

चीन चे सीमेवर ६० हजारांवर सैनिक तैनात

लेह (लडाख) ; वृत्तसंस्था : फेब्रुवारी 2021 मध्ये पूर्व लडाखमधील पँगाँग सरोवर भागातून भारत-चीन दोन्ही देशांनी मिळून सैन्य माघारीच्या योजनेची अंमलबजावणी सुरू केली होती. नंतर या योजनेबाबत दोन्ही देशांदरम्यान चर्चेच्या अनेक फेर्‍या झाल्या; पण अपेक्षित परिणाम झाला नाही. चीन ने आपले विस्तारवादी धोरण कायम ठेवले असून, कडाक्याच्या थंडीतही वास्तविक नियंत्रण रेषेवर (एलएसी) चीनने आपले 60 हजार सैनिक तैनात ठेवलेले आहेत.

उन्हाळी शिबिरांतील सैनिक माघारी परतल्यानंतरही ‘एलएसी’वरील चीनच्या सैनिकांची ही कमाल संख्या कमी झालेली नाही. गोठवून टाकणारे किमान तापमानही ही संख्या किमान करू शकलेले नाही. भारतीय लष्करानेही उत्तरादाखल लडाखमध्ये ‘राष्ट्रीय रायफल्स युनिफॉर्म फोर्स’च्या 14 तुकड्या दाखल केल्या आहेत. मोक्याच्या क्षणी क्षणात अपेक्षित ठिकाणांवर हल्लाबोल करू शकतील, अशा बेताने या तुकड्यांच्या तैनातीची ठिकाणे निवडण्यात, ठरविण्यात आली आहेत.

संरक्षण मंत्रालयाने सरत्या वर्षाचा आढावा घेताना ‘एलएसी’वरील ‘जैसे थे’ स्थिती (स्टेटस् को) बदलण्यासाठी आगळीक करण्याचा एकाहून अधिक ठिकाणांवर (‘एलएसी’वरील) प्रकार चीनकडून झाला होता. त्याला भारतीय लष्कराने जशास तसे उत्तर दिले. पुढे वाद मिटविण्यासाठी दोन्ही देशांदरम्यान सातत्याने लष्करस्तरीय चर्चा चाललेली आहे. अनेक ठिकाणांवरून दोन्ही देशांनी यानंतर सैन्य माघारीची प्रक्रिया पारही पाडली. माघारीची प्रक्रिया सीमेवरील ज्या भागांतून चीनने पार पाडली नाही, त्या-त्या भागांत भारतीय लष्करानेही चोख व्यवस्था ठेवलेली आहे.

चीनचे एवढ्या संख्येने सैनिक शांतिदूत म्हणून आहेत काय?

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी चीनवर गैरवर्तणुकीचा ठपका ठेवला आहे. चीनने भारताच्या उत्तरेकडील सीमेवर 60 हजार सैनिकांची कुमक काही शांतता करारासाठी ठेवलेली नाही. चीनचा विस्तारवादी मनसुबाच यातून उघड होतो, अशी टीका पॉम्पिओ यांनी केला आहे.

Back to top button