‘जैश-ए-मोहम्मद’ च्या ६ दहशतवाद्यांना कंठस्नान | पुढारी

‘जैश-ए-मोहम्मद’ च्या ६ दहशतवाद्यांना कंठस्नान

जम्मू ; पुढारी वृत्तसेवा : भारतीय सुरक्षा दलाने जम्मू-काश्मिरात दहशतवाद्यांविरोधात मोहीम तीव्र केली असताना गुरुवारी सकाळपर्यंत ‘जैश-ए-मोहम्मद’च्या दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांसह सहा दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. त्यांच्याकडून अमेरिकन बनावटीची एक स्नायपर रायफल एम-4 सह मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.

चकमकीत दोन जवान जखमी झाले. एक जवान शहीद झाला. जसबीर सिंग असे त्याचे नाव आहे. तो पंजाबमधील तरणतारण जिल्ह्यातील रहिवासी आहे.

मृत 4 दहशतवाद्यांची ओळख पटवण्यात आली आहे. यामध्ये दोन पाकिस्तानी आणि दोन स्थानिक दहशतवाद्यांचा समावेश आहे.
दक्षिण काश्मिरातील अनंतनाग आणि कुलगाममध्ये बुधवारी रात्रीपासून गुरुवारी सकाळपर्यंत ही चकमक झाली.

बुधवारी रात्री 9 वाजता भारतीय सुरक्षा दलाला कुलगाममधील मिरहामामध्ये दहशतवादी लपून बसले असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर सर्च ऑपरेशन राबविण्यात आले. यादरम्यान दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. त्यानंतर भारतीय सुरक्षा दलाने दहशतवाद्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. रात्री उशिरा भारतीय सुरक्षा दलाने तीन दहशतवाद्यांना ठार केले.

यामध्ये दोन पाकिस्तानी आणि एका स्थानिक दहशतवाद्याचा समावेश आहे. त्यांच्याकडून एक एम-4 कार्बाईन आणि दोन एके-47 रायफली हस्तगत करण्यात आल्या. दरम्यान, अनंतनाग सेक्टरमधील शाहबाद भागात तीन दहशतवादी लपून बसले असल्याची माहिती भारतीय सुरक्षा दलाला मिळाली. यावेळी झालेल्या चकममकीत तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले.

याच वेळी दहशतवाद्यांनी भारतीय सुरक्षा दलावर ग्रेनेड हल्ला आणि स्वंयचलित शस्त्रांनी गोळीबार केला. मृत दहशतवाद्यांकडून एक एम-4 ही अमेरिकन बनावटीची रायफल जप्त करण्यात आली. दरम्यान, खोर्‍यात वर्षभरात 192 दहशतवाद्यांना ठार करण्यात आले आहे.

जैश-ए-मोहम्मद संघटना सर्वाधिक सक्रिय

डिसेंबर महिन्यात आतापर्यंत 24 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात भारतीय सुरक्षा दलांना यश आले आहे. यामध्ये जैश-ए-मोहम्मद या संघटनेच्या सर्वाधिक दहशतवाद्यांचा समावेश आहे. खोर्‍यात पाकिस्तान पुरस्कृत जैश-ए-मोहम्मद ही संघटना सर्वाधिक सक्रिय असल्याचे समोर आले आहे.

Back to top button