पाक पंतप्रधानपदी पुन्हा नवाज शरीफ? | पुढारी

पाक पंतप्रधानपदी पुन्हा नवाज शरीफ?

इस्लामाबाद; वृत्तसंस्था : नवीन वर्षात पाकिस्तानच्या राजकारणात मोठ्या उलथापालथी होण्याचे संकेत आहेत. पंतप्रधान इम्रान सरकारच्या कारभारावर पाकिस्तानी लष्कर नाराज असल्याने त्यांची गच्छंती निश्चित मानली जात आहे. ( नवाज शरीफ )

नोव्हेंबर 2019 पासून लंडनमध्ये राहत असलेले माजी पंतप्रधान नवाज शरीफ लवकरच मायदेशात पोहोचणार आहेत. पाकिस्तानात लष्कराच्या पाठिंब्याशिवाय कोणतेही सरकार सत्तेवर येऊ शकत नाही. त्याच लष्कराशी शरीफ यांची गुप्त खलबते सुरू असून, विद्यमान इम्रान खान सरकार उलथवून शरीफ यांना पंतप्रधान केले जाण्याच्या शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. देशात इम्रान खान सरकारविरोधात प्रचंड नाराजी असून इम्रान खान यांची हकालपट्टी निश्चित असल्याचे मानले जात आहे.

नवाज शरीफ जानेवारी 2022 मध्ये मायदेशी परतणार आहेत. त्यामुळे आता पाकिस्तानात सत्ता बदलाचे वारे वाहू लागले आहे, असे ट्विट पाकिस्तानचे प्रसिद्ध पत्रकार सलीम साफी यांनी तीन दिवसांपूर्वी केले होते. त्यांचे हे ट्विट गांभीर्याने घेतले जात आहे.

इम्रान खान यांना धोक्याची जाणीव

गेल्या आठवड्यात पंतप्रधान इम्रान खान यांनी मंत्रिमंडळाची बैठक घेतली होती. त्यातील बरीच माहिती लीक झाली होती. पुन्हा एकदा एका भ्रष्टाचारी नेत्याला पाकिस्तानचा पंतप्रधान (चौथ्यांदा) करण्याची जोरदार तयारी केली जात असल्याचे इम्रान खान यांनी या बैठकीत म्हटले होते. त्यामुळे आपल्या सरकारला धोका असल्याची जाणीव इम्रान खान यांना यापूर्वी झाली असल्याचे सांगण्यात येते.

Back to top button