solid waste : घनकचरा निर्मितीत महाराष्ट्र आघाडीवर! | पुढारी

solid waste : घनकचरा निर्मितीत महाराष्ट्र आघाडीवर!

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा : देशातील महानगर पालिकेच्या क्षेत्रात निर्माण होणाऱ्या घन कचऱ्याची (solid waste) शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी स्वच्छ भारत नागरी अभियानातून प्रोत्साहन दिले जाते. अशात शास्त्रीय पद्धतीचा अवलंब करीत विविध महानगर पालिकेत घनकचऱ्यावरील शास्त्रीय प्रक्रियेचे प्रमाण १८ वरून ७० टक्क्यांपर्यंत वाढले आहे. विशेष म्हणजे देशातील सर्वाधिक घनकचरा निर्माण होणाऱ्या राज्यांच्या क्रमवारीत महाराष्ट्र आघाडीवर आहे.

राज्यातील शहरी भागांमध्ये दररोज २२ हजार ४०१ मेट्रिक टन (एमटी) घनकचरा निर्माण होतो. यापैकी २० हजार ६०९ मेट्रिक टन घन कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. तर, १ हजार ७९२ एमटी कचरा प्रक्रियेविनाच टाकला जातो.

solid waste : १००% घनकचऱ्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्याची गरज

प्रक्रियेविना टाकण्यात येणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण एकूण निर्माण होणाऱ्या कचऱ्याच्या तुलनेत कमी असले, तरी महारोगराईच्या काळात नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत राज्यात १००% घनकचऱ्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्याची गरज निर्माण झाली आहे.

केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार राज्यमंत्री कौशल किशोर यांनी राज्यसभेत लिखित उत्तराद्वारे दिलेल्या माहितीनुसार, देशात दररोज १ लाख ४० हजार ५५७ एमटी घनकचरा निर्माण होतो.

यातील ९८ हजार ३२४ एमटी घनकचऱ्यावर प्रक्रिया केले जाते तर, ४२ हजार २३३ एमटी कचरा प्रक्रियेविनाच टाकला जातो.

मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रापाठोपाठ उत्तर प्रदेश, तामिळनाडू, दिल्ली, तेलंगणा तसेच गुजरात या राज्यांचा क्रमांक लागतो. स्वच्छ भारत नागरी अभियानाअंतर्गत घन कचरा व्यवस्थापनासाठी देशातील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना आतापर्यंत ६,३७५ कोटींहून अधिकच निधी देण्यात आला आहे.

या निधीचा उपयोग, कचऱ्यापासून खतनिर्मिती प्रकल्प, साहित्य पुनर्प्राप्ती सुविधा, कचऱ्यापासून वीजनिर्मिती, शोष खड्डे इत्यादी सुविधा उभारण्यासाठी केला जात असल्याची माहिती मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

नुकत्याच १ ऑक्टोबर २०२१ पासून सुरु करण्यात आलेल्या ‘स्वच्छ भारत नागरी अभियान २.०’ मध्ये अभियानाच्या काळात मुख्यतः देशातील शहरांना कचरामुक्त करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

घनकचरा निर्मितीत आघाडीवरील राज्य (आकडेवारी एमटी मध्ये)

राज्य घनकचरा प्रक्रिया प्रक्रियाविरहीत

१) उत्तर प्रदेश १४,८६१ ११,५९२ ३,२६९

२) तामिळनाडू १२,४६४ ६,६०६ ५,८५८

३) दिल्ली १०,८२३ ८,८७५ १,९४८

४) तेलंगणा १०,१२६ ८,७०८ १,४१८

५) गुजरात ९,२२८ ८,५८२ ६४६

 

Back to top button