नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा
भीमा-कोरेगाव प्रकरणातील आरोपी सुधा भारद्वाज (Sudha Bharadwaj) यांच्या जामिनाला आव्हान देणारी एनआयएची याचिका सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळून लावली. मुंबई उच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात भारद्वाज यांचा जामीन अर्ज मंजूर केला होता मात्र, इतर आठ आरोपींचे जामीनअर्ज फेटाळून लावले होते.
कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात गैरकृत्य प्रतिबंधक कायदा अर्थात यूएपीए लागू करण्यात आल्याने पुणे सत्र न्यायालयात सुनावणी करता येणार नसल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला होता. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने सुधा भारद्वाज यांना जामीन दिला होता. यूएपीए कायद्यानुसार तपासाला मुदतवाढ देण्याचा तसेच आरोपीला ताब्यात ठेवण्याबाबतचा निर्णय नियमित न्यायालय नव्हे तर विशेष न्यायालय घेऊ शकते, अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने एनआयएची याचिका फेटाळताना केली.
पुणे येथे विशेष न्यायालय कार्यरत असताना आपण नियमित न्यायालयासमोर ही याचिका का दाखल केली आहे, अशी विचारणा देखील न्यायमूर्ती यु. यु. ललित, न्यायमूर्ती एस. रवींद्र भट आणि न्यायमूर्ती बेला त्रिवेदी यांच्या खंडपीठाने केली. भायखळा तुरुंगातून सुटका करण्यापूर्वी सुधा भारद्वाज (Sudha Bharadwaj) यांना 8 तारखेला मुंबईस्थित एनआयए कोर्टासमोर हजर करावे, असे निर्देशही मुंबई उच्च न्यायालयाने जामीनअर्ज मंजूर करताना दिले होते.
हेही वाचलं का?