पत्‍नीला ‘भूत-पिशाच’ म्‍हणणे क्रूरता ठरत नाही : उच्‍च न्‍यायालय | पुढारी

पत्‍नीला 'भूत-पिशाच' म्‍हणणे क्रूरता ठरत नाही : उच्‍च न्‍यायालय

पुढारी ऑनलाईन : पत्‍नीला भूत किंवा पिशाच म्‍हणणे क्रूरता ठरत नाही, असे निरीक्षण नुकतेच पाटणा उच्‍च न्‍यायालयाने नोंदवले. तसेच भारतीय दंड विधान कलम 498A आणि हुंडा प्रतिबंधक कायदा 1961 च्या कलम 4 अंतर्गत कनिष्ठ न्यायालयाने पतीला सुनावलेली शिक्षाही न्यायमूर्ती विवेक चौधरी यांच्या एकल खंडपीठाने रद्द केली. यासंदर्भातील वृत्त ‘बार अँड बेंच’ने दिले आहे.

आयपीसीच्या कलम 498A आणि हुंडा प्रतिबंधक कायदा 1961 च्या कलम 4 नालंदा जिल्हा न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायाधीशांनी आरोपी पतीला दोषी घोषित केले होते. नालंदाच्या सीजेएम न्यायालयानेही हा निर्णय कायम ठेवला होता. या निकालास पतीने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

 शिव्‍या दिल्‍याच्‍या आरोपांना क्रूरता म्‍हणता येणार नाही

पतीच्‍या याचिकेवर न्यायमूर्ती विवेक चौधरी यांच्‍या एकल खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी न्‍यायालयाने स्‍पष्‍ट केले की, पत्नीला भूत म्हणणारा पती क्रूरतेच्या श्रेणीत येत नाही. वैवाहिक संबंधांमध्ये, विशेषत: अयशस्वी वैवाहिक संबंधांमध्ये, पती-पत्नी दोघेही एकमेकांसोबत घाणेरडे कृत्य करतात. ते एकमेकांना शिव्या देतात. त्यामुळे अशा आरोपांना क्रूरता म्हणता येणार नाही.

पतीला सुनावलेली शिक्षा रद्द

यावेळी पत्‍नीने वडिलांना अनेक पत्रे लिहून पतीच्या छळाची तक्रार केली होती. याबाबत न्यायालयाने पुरावे मागितले असता, ते सादर करता आले नाही. हुंडा प्रकरणातही पतीने हुंड्यात कार मागितल्याचा महिलेचा आरोप न्यायालयाने फेटाळून लावला.
न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले आहे की, भारतीय दंड संहितेच्या कलम 498A अंतर्गत दाखल करण्यात आलेला खटला हा वैयक्तिक कलह, द्वेष आणि दोन पक्षांमधील मतभेदांचा परिणाम असे स्‍पष्‍ट करत न्‍या. चौधरी यांनी आयपीसीच्या कलम 498A आणि हुंडा प्रतिबंधक कायदा 1961 च्या कलम 4 अंतर्गत कनिष्ठ न्यायालयाने पतीला सुनावलेली शिक्षा रद्द केली.

हेही वाचा : 

 

Back to top button