Lok Sabha Election 2024 : तळकोकणचा कल नेहमी काँग्रेस आणि राष्ट्रीय पक्षांच्या विरोधात! | पुढारी

Lok Sabha Election 2024 : तळकोकणचा कल नेहमी काँग्रेस आणि राष्ट्रीय पक्षांच्या विरोधात!

गणेश जेठे

निवडणूक आयोगाने रणशिंग फुंकताच आचारसंहिता सुरू झाली आणि रणवाद्ये जोरात वाजायला लागलीत. निवडणुकांच्या गप्पाही रंगू लागल्यात. तळकोकणचा आजवर कल नाका-चौकातील गजालींमधून ऐकायला येतोय. 1952 सालच्या पहिल्या लोकसभा निवडणुकांपासून आजपर्यंतचा निवडणूक इतिहास पाहिला तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा समावेश असलेलं तळकोकण अपवाद वगळता विशेषतः काँग्रेस आणि राष्ट्रीय पक्षांच्या विरोधात राहिलेले दिसते. सह्याद्री पर्वतरांगा आणि अरबी समुद्रामध्ये वसलेल्या तळकोकणाने नेहमी स्थानिक अस्मिता महत्त्वाची मानली. त्यातूनच प्रादेशिक पक्षांना कोकणी माणसाने जवळ केल्याचा इतिहास आहे. (Lok Sabha Election 2024)

1952 सालच्या लोकसभा निवडणुकीत तळकोकणातून काँग्रेसचे मोरेश्वर जोशी निवडून आले ते केवळ स्वातंत्र्य चळवळीतील काँग्रेसच्या योगदानामुळे. तद्नंतर मात्र समाजवादी विचारांची कास कोकणी जनतेने धरली. 1957 सालच्या निवडणुकीत प्रजा समाजवादी पक्षातून बॅरिस्टर नाथ पै जे विजयी झाले तिथपासून 1962, 1967 या तीन निवडणुकांमध्ये नाथ पै यांनाच कोकणी माणसाने विजयी केले. त्यांचाच वारसा प्रा. मधु दंडवते यांनी पुढे चालविला. 1971 सालच्या निवडणुकीत प्रजा समाजवादी पक्ष, 1977 मध्ये भारतीय लोकदल आणि 1984 च्या निवडणुकीत जनता पक्षातून दंडवते काँग्रेसला हरवून विजयी झाले. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर काँग्रेसच्या बाजूने जी लाट आली त्याचा परिणाम तळकोकणात मात्र झाला नाही. 1989 च्या निवडणुकीतही प्रा. दंडवते यांनी जनता पक्षातून काँग्रेसचे उमेदवार शिवरामराजे भोसले यांचा पराभव केला. 1991 च्या निवडणुकीत मात्र काँग्रेस विजयी झाली. राजीव ब्रिगेडमधील त्यावेळच्या कर्नल सुधीर सावंत यांनी काँग्रेसच्या हात या निशाणीवर विजय मिळविला. तळकोकणात शिवसेनेने जनता दलाला साथ न देता वामनराव महाडिक यांच्या रूपाने उमेदवार रिंगणात उतरविला. त्यामुळे तिरंगी लढत झाली. मतांची विभागणी झाली. त्यात पुन्हा राजीव गांधी यांच्या हत्येमुळे थोडी अधिकची मते काँग्रेस उमेदवाराला मिळाली, त्यामुळे त्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवार विजयी झाला. पुन्हा मात्र पुढची 20-25 वर्षे तळकोकणने प्रादेशिक स्तरावर प्रभाव असलेल्या शिवसेनेलाच विजयी केले. अपवाद होता तो 2009 सालच्या निवडणुकीचा. विद्यमान केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी तेव्हा शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. तळकोकणातील शिवसेना संघटन विस्कळीत झाले. राणे यांनी सर्व ताकद पणाला लावली, त्यामुळे तो विजय झाला होता. अन्यथा 1991 सालच्या निवडणुकीत शिवसेनेचे सुरेश प्रभू निवडून आले ते 1996, 1998, 1999 आणि 2004 अशा सलग पाच निवडणुकांमध्ये प्रभू तळकोकण जिंकत राहिले. 2009 मध्ये जरी काँग्रेसने विजय मिळवला तरी 2014 आणि 2019 या गेल्या दोन निवडणुकांमध्ये शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी शिवसेनेचा हा बालेकिल्ला शाबूत ठेवला. शिवसेने सोबतच्या भाजपचा या यशात वाटा जरूर होता, परंतु तळकोकणात दावा करण्याइतपत भाजप आपला प्रभाव वाढवू शकला नव्हता. आता मात्र तळकोकणात भाजपची ताकद वाढली आहे. म्हणूनच भाजप या मतदारसंघावर ठामपणे दावा करते आहे. (Lok Sabha Election 2024)

…म्हणून भाजपचा आता दावा

राणे यांचा भाजपमध्ये प्रवेश झाल्यानंतर भाजपची तळकोकणातली ताकद वाढली. त्यात पुन्हा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून भाजप नेते रवींद्र चव्हाण यांना संधी मिळाली. भाजपला अशी संधी पहिल्यांदा मिळाली. त्यामुळे भाजपचा आत्मविश्वास वाढला आहे. म्हणून भाजप या जागेवर दावा करत आहे. ही जागा मिळाली तर आताच, असेही भाजपचे काही कार्यकर्ते मत व्यक्त करताना दिसतात. (Lok Sabha Election 2024)

हेही वाचा : 

Back to top button