PM Modi पोहोचले समुद्रात बुडालेल्या द्वारका शहरात! पूजा केली आणि म्हणाले… | पुढारी

PM Modi पोहोचले समुद्रात बुडालेल्या द्वारका शहरात! पूजा केली आणि म्हणाले...

पुढारी ऑनलाईन डेस्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) गुजरातच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या दौ-यातील एक भाग म्हणून पंतप्रधानांनी द्वारकाधीश मंदिरात पूजा केली. तसेच समुद्रात बुडालेल्या प्राचीन द्वारका शहराला भेट दिली. द्वारका शहराला भेट दिल्यानंतर पीएम मोदी म्हणाले की, ‘हा केवळ समुद्रात डुबकी मारण्याचा नाही तर काळाचा प्रवास होता. द्वारका या जलमग्न शहरात प्रार्थना करणे हा एक अलौकिक अनुभव होता. याद्वारे मी अध्यात्मिक वैभव आणि शाश्वत भक्तीच्या प्राचीन युगाशी जोडलो गेलो. भगवान श्रीकृष्ण आपल्या सर्वांचे कल्याण करोत.’ पीएम मोदी यांनी भगवान श्रीकृष्णाला अर्पण करण्यासाठी मोराची पिसे सोबत समुद्रात नेली होती.

आज सकाळी पंतप्रधान मोदींनी (PM Modi) बेट द्वारका येथील मंदिराला भेट दिली. येथे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी ओखा ते बेट द्वारका बेटाला जोडणाऱ्या २.३२ किमी लांबीच्या सागरी सेतू सुदर्शन सेतूचे उद्घाटन केले. हा देशातील सर्वात लांब केबल पूल आहे, ज्याची पायाभरणी पंतप्रधान मोदींनी २०१७ मध्ये केली होती. ९०० कोटींहून अधिक खर्च करून हा पूल पूर्ण झाला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी तीर्थक्षेत्र द्वारका येथील द्वारकाधीश मंदिरालाही भेट दिली. त्यांनी येथे प्रार्थना केली आणि भगवान द्वारकाधीशचे दर्शन घेतले. पंतप्रधानांनीही देणगी दिली. द्वारका पीठाच्या शंकराचार्यांचीही भेट घेऊन त्यांना पुष्पहार अर्पण केला. शंकराचार्यांनी पंतप्रधानांना अंगवस्त्र आणि रुद्राक्षाची माळ अर्पण केली. यानंतर पीएम बोटीमध्ये बसले आणि समुद्राच्या मध्यभागी जाऊन खोल समुद्रात उतरले.

Back to top button