देशाची प्रगती हा कॉंग्रेसचा अजेंडा नव्हता : पंतप्रधान मोदी | पुढारी

देशाची प्रगती हा कॉंग्रेसचा अजेंडा नव्हता : पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : काँग्रेसने पुन्हा-पुन्हा सरकारे स्थापन केली पण भविष्यातील भारत घडवायला विसरले कारण त्यांना फक्त त्यांच्या मनात सरकार बनवायचे होते, देशाला पुढे नेणे हा त्यांचा अजेंडा नव्हता, असा घणाघाती आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ‘विकसित भारत, विकसित छत्तीसगड’ अंतर्गत छत्तीसगडमध्ये ३४,४२७ कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. त्यावेळी राज्याच्या प्रगतीबद्दल बोलताना पंतप्रधान मोदींनी प्रमुख विरोधी पक्ष कॉंग्रेसला लक्ष्य केले. तसेच छत्तीसगडमध्ये डबल इंजिनचे सरकार चांगले काम करत असल्याचा दावा केला. छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय आणि मंत्रीमंडळ सहकारी यावेळी उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, की विकसित छत्तीसगड गरीब, शेतकरी, युवक आणि महिला शक्तीच्या सक्षमीकरणाद्वारे उभारला जाईल. विकसित छत्तीसगडचा पाया आधुनिक पायाभूत सुविधांमुळे मजबूत होईल.”

कॉंग्रेसचा उद्देश देशाच्या प्रगतीचा नव्हता असा आरोप करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, की आजच्या परिस्थितीत काँग्रेसचे राजकारणही अशाच स्वरुपाचे आहे. काँग्रेसला घराणेशाही, भ्रष्टाचार आणि तुष्टीकरणाच्या पलीकडे विचार करता येत नाही. फक्त कुटुंबाचा किंवा आपल्याच मुलाबाळांचा विचार केला जात असेल तर लोकांच्या भवितव्याची काळजी केली जाऊ शकत नाही, असा टोला मोदींनी लगावला.

छत्तीसगडमध्ये डबल इंजिनचे सरकारचा गॅरंटी पूर्ण करण्याचा प्रयत्न प्रशंसनीय आहे, असे प्रशस्तीपत्रक पंतप्रधान मोदींनी दिले. तसेच मोदींची गॅरंटी म्हणजे गॅरंटी पूर्ण होण्याची गॅरंटी, असेही उद्गार काढले.

..

Back to top button