काँग्रेस विचाराने आऊटडेटेड झालीय; पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल | पुढारी

काँग्रेस विचाराने आऊटडेटेड झालीय; पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल

पुढारी ऑनलाईन डेस्क : काँग्रेस विचाराने आऊटडेटेड झालीय. काँग्रेसच्या स्थितीबाबत मला वाईट वाटतंय, काँग्रेसने कामही आऊट सोर्स करायला सुरूवात केली आहे. २० व्या शतकातील विचारांनी देशाचा विकास होणार नाही. काँग्रेसच्या नेत्यांची कोणतीही गॅरंटी नसल्याने त्यांनी आमच्या गॅरंटीवर प्रश्न उपस्थित करू नये, असा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर केला. राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावाला पंतप्रधान मोदींनी उत्तर दिले. यावेळी ते बोलत होते. (PM Modi Speech)

‘माझ्या आवाजाला जनतेचे बळ’

“मी काँग्रेस अध्यक्ष खरगे यांचे विशेष आभार व्यक्त करतो. त्यादिवशी मी त्यांचं भाषण ऐकत होतो. लोकसभेत ज्या मनोरंजनाची उणीव भासत होती ती त्यांनी भरून काढली. आम्ही तुमचे प्रत्येक शब्द अत्यंत संयमाने आणि नम्रतेने ऐकत आलो आहोत. पण आजही विरोधक न ऐकण्याच्या तयारीने आले आहेत. पण माझा आवाज कोणी दाबू शकत नाही. या आवाजाला देशातील जनतेने बळ दिले आहे. त्यामुळेच मी यावेळी पूर्ण तयारीनिशी आलो आहे. काँग्रेसला चाळीशी पार करता येणार नाही, असे आव्हान पश्चिम बंगालमधून आले आहे. मी प्रार्थना करतो की ४० जागा तरी वाचवू शकाल. दलितांना काँग्रेसचा कायम विरोध होता. देशाला त्यांची नीती समजली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर नसते तर दलितांना कधीच आरक्षण मिळाले नसते, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले. (PM Modi Speech)

‘काँग्रेसकडून देश तोडण्याची तयारी’

ज्या काँग्रेसने सत्तेच्या लालसेपोटी लोकशाहीचा खुलेआम गळा घोटला होता, लोकशाही मार्गाने निवडून आलेली सरकारे रातोरात बरखास्त केली होती, वृत्तपत्रे बंद करण्याचाही प्रयत्न केला होता, ती काँग्रेस आता देश तोडण्याची तयारी करत आहे. आता देशाचे उत्तर-दक्षिण असे तुकडे करण्याची विधाने केली जात आहेत. ज्या काँग्रेसने ओबीसींना कधीच पूर्ण आरक्षण दिले नाही, सर्वसामान्य प्रवर्गातील गरिबांना कधीच आरक्षण दिले नाही, बाबासाहेबांना भारतरत्नसाठी पात्र मानले नाही, ती काँग्रेस फक्त त्यांच्या कुटुंबालाच भारतरत्न देत राहिली. तेच आता आपल्याला उपदेश करत सामाजिक न्यायाचा धडा शिकवत आहेत, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

काँग्रेसने इंग्रजांचे कायदे का बदलले नाहीत?

काँग्रेस इंग्रजांपासून प्रेरित नाही तर इंग्रजांनी तयार केलेल्या दंड संहितेत सुधारणा का केली नाही? वसाहतकालीन कायदे अजूनही का अस्तित्वात होते? भारताचा अर्थसंकल्प संध्याकाळी ५ वाजता मांडला जायचा, कारण त्या वेळी ब्रिटिश संसदेची बैठक सकाळी व्हायची. त्यांनी बनवलेले शेकडो कायदे तुम्ही का सुरू ठेवले? असे सवाल पंतप्रधान मोदी यांनी केले. एकदा नेहरूजींनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिले होते, त्यात लिहिले होते की, मला कोणतेही आरक्षण आवडत नाही आणि विशेषतः नोकऱ्यांमधील. मी अकार्यक्षमतेला प्रोत्साहन देणाऱ्या कोणत्याही उपायाच्या विरोधात आहे. या आधारावर काँग्रेस ही आरक्षणाची जन्मजात विरोधक आहे. पंडीत नेहरू म्हणायचे की SC, ST, OBC यांना नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळाले तर सरकारी कामाची पातळी घसरेल. आज मोजल्या जाणाऱ्या या आकडेवारीचे मूळ येथेच आहे. त्यावेळेस त्यांची सरकारी भरती झाली असती तर ते पदोन्नतीनंतर पुढे गेले असते आणि आज इथपर्यंत पोहोचले असते. काँग्रेस पक्ष विचार करण्यापलीकडे जुना झाला आहे. जेव्हा विचारच जुना झाला आहे, तेव्हा त्यांनी त्यांचे काम देखील आउटसोर्स केले आहे, असेही ते म्हणाले. (PM Modi Speech)

यावेळी पंतप्रधान मोदी यांनी राहुल गांधी यांच्यावरही जोरदार टीका केली. ते म्हणाले की, “त्यांनी त्यांच्या ‘युवराज’साठी एक स्टार्ट-अप बनवला आहे. पण तो नॉन-स्टार्टर आहे, तो लिफ्टही घेत नाही आणि लॉन्चही करत नाही.”

आज उच्च शिक्षणात अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांमध्ये ४४ टक्के, अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांमध्ये ६५ टक्के तर ओबीसी विद्यार्थ्यांच्या नोंदणीत ४५ टक्के पर्यंत वाढ झाली आहे. गरीब, दलित, मागास, वंचित, आदिवासी कुटुंबातील मुले जेव्हा उच्च शिक्षण घेतील तेव्हा समाजात नवीन वातावरण निर्माण होईल, असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला. (PM Modi Speech)

हेही वाचा : 

Back to top button