Stock Market Updates | शेअर बाजाराची विक्रमी घौडदौड कायम, सेन्सेक्स ७०,८०० वर, निफ्टी २१,२५० पार | पुढारी

Stock Market Updates | शेअर बाजाराची विक्रमी घौडदौड कायम, सेन्सेक्स ७०,८०० वर, निफ्टी २१,२५० पार

पुढारी ऑनलाईन : जागतिक मजबूत संकेतांमुळे भारतीय शेअर बाजाराची विक्रमी घौडदौड कायम आहे. आज शुक्रवारी (दि.१५) सेन्सेक्सने नवीन विक्रमी उच्चांक नोंदवला. सेन्सेक्स ३१० अंकांनी वाढून ७०,८२४ वर खुला झाला. तर निफ्टीने २१,२५० चा टप्पा पार केला.

काल सेन्सेक्स ७०,५१४ वर बंद झाला होता. आज तो ७०,८०० वर खुला झाला. पॉवर ग्रिड, भारती एअरटेल, नेस्ले इंडिया वगळता सर्व शेअर्स हिरव्या चिन्हात व्यवहार करत आहेत. इन्फोसिस, एचसीएल टेक, टाटा स्टील, जेएसडब्ल्यू स्टील, टेक महिंद्रा हे शेअर्स सेन्सेक्सवरील तेजीत आघाडीवर आहेत.

अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने २०२४ मध्ये व्याजदरात कपात करण्याचे संकेत दिल्यानंतर जगभरातील बाजारात तेजीचे वारे आहे. काल सेन्सेक्स ७० हजारांच्या वर जाऊन बंद झाला होता.

संबंधित बातम्या 

निफ्टी बँक तेजीत

निफ्टी ५० निर्देशांक २१,२८७ वर खुला झाला. त्यानंतर तो २१,२९८ पर्यंत वाढला. सकाळी ९.३० च्या सुमारास निफ्टी ७५ अंकांच्या वाढीसह २१,२५८ वर व्यवहार करत होता. निफ्टी बँक ०.११ टक्के वाढून ४७,७८४ वर तर निफ्टी फायनान्सियल सर्व्हिसेस ०.१० टक्के घसरणीसह २१,४३९ वर व्यवहार करत आहे. निफ्टीवर हिंदाल्को, यूपीएल, जेएसडब्ल्यू स्टील, टाटा स्टील, इन्फोसिस हे टॉप गेनर्स आहेत. तर एचडीएफसी लाइफ, नेस्ले इंडिया, ॲक्सिस बँक, अल्ट्राटेक सिमेंट, कोटक बँक हे टॉप लूजर्स आहेत.

अमेरिकेतील बाजारात विक्रमी तेजी

यूएस फेडच्या व्याजदर कमी करणार असल्याच्या संकेतांनंतर अमेरिकेतील शेअर बाजार काल गुरुवारी वधारुन बंद झाला होता. डाऊ जोन्स इंडस्ट्रियल ॲव्हरेज सलग दुसर्‍या दिवशी विक्रमी उच्चांकासह बंद झाला. Apple शेअर्सने ०.०८ टक्के वाढून इंट्रा-डे विक्रमी उच्चांक गाठला. टेस्ला शेअर्स ४.९ टक्क्यांनी वाढले. या वर्षी कमी कामगिरी करणाऱ्या क्षेत्रांमध्येही वाढ झाली आहे.

११ एस अँड पी ५०० (S&P 500) सेक्टर इंडेक्सेसपैकी सहा उच्च पातळीवर बंद झाले. S&P 500 निर्देशांक ०.२६ टक्के वाढून ४,७१९.५५ अंकांवर बंद झाला. हा निर्देशांक जानेवारी २०२२ मधील त्याच्या विक्रमी उच्चांकापासून २ टक्क्यांपेक्षा कमी आहे. नॅस्डॅक कंपोझिट निर्देशांक ०.१९ टक्के वाढून १४,७६१.५६ अंकांवर पोहोचला, तर जोन्स डाऊ इंडस्ट्रियल अॅव्हरेज ०.४३ टक्के वाढून ३७,२४८.३५ अंकांवर पोहोचला. (US stock market)

Back to top button