Chhattisgarh CM Vishnu Deo Sai: भाजपचे धक्कातंत्र; जाणून घ्या छत्तीसगडचे नवे मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांच्याविषयी…. | पुढारी

Chhattisgarh CM Vishnu Deo Sai: भाजपचे धक्कातंत्र; जाणून घ्या छत्तीसगडचे नवे मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांच्याविषयी....

पुढारी ऑनलाईन डेस्क: छत्तीसगड विधानसभा निवडणुक निकालानंतर मुख्यमंत्री पदासाठी कायम राहिलेला सस्पेन्स आज (दि.१०) अखेर संपला. मुख्यमंत्रीपदासाठी भाजपचे माजी मुख्यमंत्री रमण सिंह, माजी केंद्रीय मंत्री रेणुका सिंह, प्रदेशाध्यक्ष अरूण साव अशी दिग्गज नावे चर्चेत असताना भाजपने मुख्यमंत्री पदासाठी विष्णुदेव साय यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. गेल्या आठवडाभर चाललेल्या मॅरेथॉन बैठकांनंतर आता मुख्यमंत्र्यांचा चेहरा निश्चित झाला आहे. जाणून घेऊया छत्तीसगडचे नवे मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांच्याविषयी… (Chhattisgarh CM Vishnu Deo Sai)

भाजपचे निरीक्षक अर्जुन मुंडा, सर्बानंद सोनोवाल आणि दुष्यंत गौतम यांनी आज (दि.१०) दुपारी रायपूरमध्ये भाजप विधीमंडळ पक्षाची बैठक घेतली. छत्तीसगड भाजपचे प्रभारी ओम माथूरही या बैठकीला उपस्थित होते. अखेर आदिवासी नेते विष्णुदेव साय यांच्‍या नावावर शिक्‍कामाेर्तब केले आहे. ( Chhattisgarh New CM ) यावेळी केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल, अर्जुन मुंडा आणि दुष्यंत कुमार गौतम यांच्याशिवाय छत्तीसगड भाजपचे प्रभारी ओम माथूरही उपस्थित होते.

Chhattisgarh CM Vishnu Deo Sai: कोण आहेत विष्णुदेव साय?

२१ फेब्रुवारी १९६४ रोजी जन्‍म झालेले विष्णुदेव साय यांचे मूळ गाव छत्तीसगडमधील कुंकुरी भागातील कानसाबेलला नजीक बगिया हे आहे. राज्यात आदिवासी सामुराई समाजाची लोकसंख्या सर्वाधिक आहे. साय या समाजातील आहेत. १९८९ मध्ये त्यांनी बगिया गावातून ग्रामपंचायत सदस्‍य म्‍हणून म्हणून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. १९९०  मध्ये ते सरपंचपदी बिनविरोध निवड आले होते. तापकरा विधानसभा मतदारसंघातून प्रथम आमदार झाले. छत्तीसगड स्‍वतंत्र राज्‍याची निर्मिती हाेण्‍यापूर्वी १९९० ते १९९८ या कालावधीत मध्य प्रदेश विधानसभेचे सदस्य राहिले. १९९९ मध्ये ते १३ व्या लोकसभेसाठी रायगड लोकसभा मतदारसंघातून खासदार झाले. २०२० मध्ये ते छत्तीसगडचे प्रदेशाध्यक्ष झाले.

आदिवासी सामुराई समाजातील अजित जोगी यांच्यानंतर कोणीही छत्तीसगडचे मुख्यमंत्री होऊ शकले नाही. यानंतर ते खासदार आणि केंद्रीय मंत्रीही राहिले आहेत. एवढेच नाही तर साय यांची गणना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जवळच्या नेत्यांमध्ये केली जाते. तसेच ते रमण सिंह यांचेही निकटवर्तीय मानले जातात. मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात (२०१४-२०१९) विष्णुदेव साय यांना केंद्रात मंत्री करण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी आरएसएसच्या पदाचा राजीनामा दिला. (Vishnu Deo Sai)

२००९ आणि २०१४ मध्‍ये ते पुन्हा रायगडमधून खासदार झाले. २७ मे २०१४  ते २०१९ या काळात केंद्रीय पोलाद खाण, कामगार आणि रोजगार मंत्रालयाचे राज्यमंत्रीपद त्‍यांनी भूषवले. पक्षाने २ डिसेंबर २०२२ रोजी भाजप राष्ट्रीय कार्यसमितीचे सदस्य झाले. भाजपने ८ जुलै २०२३ रोजी राष्ट्रीय कार्य समितीचे सदस्य म्‍हणून त्‍यांची नियुक्‍ती केली होती.

रमण सिंह गटानेच मारली बाजी

छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी दावा करण्याच्या शर्यतीत माजी मुख्यमंत्री डॉ. रमण सिंह प्रबळ दावेदार म्हणून मानले जात होते. 2018 च्या निवडणुकीत भाजपचा मोठा पराभव झाला; पण आजही रमणसिंग हे छत्तीसगडच्या राजकारणात पक्षाचा सर्वात मोठा चेहरा मानला जातो. 15 वर्षे राज्य केल्यानंतर रमण सिंह गरिबांचे डॉक्टर आणि चौरवाले बाबा म्हणूनही प्रसिद्ध आहेत. आज त्‍यांचे निकटवर्ती मानले जाणार्‍या विष्‍णूदेव साय यांच्‍याकडे मुख्‍यमंत्रीपद सोपवल्‍याने रमन सिंह यांच्‍या गटाचा छत्तीसगडच्‍या राजकारणातील वरचष्‍मा कायम राहिल्‍याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

‘या’ नेत्यांच्या नावांचीही होती चर्चा

छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत भाजप अध्यक्ष अरुण साओ यांच्या नावाचीही चर्चा होती. ते ओबीसी समाजातून येतात. याशिवाय सरोज पांडे यांचेही नाव मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत होते. सरोज पांडे या भाजपच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा आणि राज्यसभा खासदार आहेत. त्या भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षाही होत्या. 2009 मध्ये त्यांनी लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला होता, मात्र 2014 मध्येही मोदी लाटेत त्या हरल्या होत्या. मुख्यमंत्रीपदासाठी आणखी एक नाव चर्चेत होते ते म्हणजे ब्रिजमोहन अग्रवाल. सातवेळा आमदार असलेले ब्रिजमोहन हे रमणसिंग सरकारमध्ये मंत्रीही राहिले आहेत.

हेही वाचा:

Back to top button