राजस्थानात बंडोबा करतील खेळखंडोबा? | पुढारी

राजस्थानात बंडोबा करतील खेळखंडोबा?

जयपूर, वृत्तसंस्था : राजस्थानातील उमेदवारी अर्ज दाखल भरण्याची प्रक्रिया आटोपली असून, राज्यात काँग्रेसचे 199, तर भाजपचे 200 उमेदवार अनुक्रमे हाताचा पंजा व कमळ चिन्हावर निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट झालेले आहे. पक्षाचे चिन्ह मिळू शकले नाही, अशा 35 नेत्यांनी बंडाचे निशाण रोवले असून, निवडणुकीच्या मैदानात शड्डू ठोकल्याचेही समोर आले आहे.

भाजपमध्ये 19 जागांवर बडे नेते बंडोबा बनलेले असून, यात 5 माजी मंत्री आहेत. झोटवाडा येथे राजपाल सिंह शेखावत, डिडवानात युनूस खान, कामा येथे मदन मोहन सिंघल, खंडेला येथे बंशीधर बाजिया आणि शाहपुरा (भीलवाडा) येथे कैलाश मेघवाल यांचा त्यात समावेश आहे.

वो सात दिन!

युवा नेते रवींद्र सिंह भाटी हे तिकिटासाठीच भाजपमध्ये आले होते. मोजून 7 दिवस पक्षात राहिले. तिकीट मिळणार नाही, हे स्पष्ट झाले आणि आता शिव मतदारसंघातून अपक्ष म्हणून लढत आहेत.

काँग्रेसमध्ये भाजपच्या तुलनेत बंडोबांची संख्या जरा कमी आहे. या पक्षात 16 जणांनी बंडखोरी केली आहे. लुणकरणसरला वीरेंद्र बेनीवाल, नागौरला हबिब ऊर रेहमान आणि शाहपुरातून आलोक बेनीवाल यांनी बंडखोरी केली आहे.

सूरसागर येथे रामेश्वर दाधिच यांनी बंडाचे निशाण उंचावले आहे. दाधिच यांनी यापूर्वी जोधपूरचे महापौरपदही भूषविले आहे. 40 वर्षांपासून ते मुख्यमंत्री गेहलोत यांचे निकटवर्तीय आहेत. अयुब खान यांना आरपीएससी सदस्यत्व बहाल झाल्याने यावेळी सुरसागर मतदार संघातून आपल्यालाच तिकीट मिळेल, अशी खात्री दाधिच यांना होती, पण तसे घडू शकले नाही.

वरीलप्रमाणे एकूण 35 पैकी 12 बंडखोर विजय-पराभवादरम्यानची पुसटशी का होईना सीमारेषा ठरू शकतात, या दमाचे आहेत.

चित्तौडगडला आमदार बंडखोर!

चित्तौडगड येथे विद्यमान भाजप आमदार चंद्रभान सिंह यांनी शेवटच्या दिवशी मंगळवारी आपले नामांकन भरले. या जागेवर भाजपने नरपत सिंह राजवी यांना यावेळी उमेदवारी दिली आहे. ते माजी उपराष्ट्रपती भैरवसिंह शेखावत यांचे जावई आहेत. चंद्रभान यांची बंडखोरी चर्चेेचा विषय आहे.

Back to top button