रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा सुरू होणार 12.45च्या मुहूर्तावर | पुढारी

रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा सुरू होणार 12.45च्या मुहूर्तावर

अयोध्या, वृत्तसंस्था : अवघा देश ज्या क्षणाची वाट पाहात आहे, त्या अयोध्येतील भव्य श्रीराम मंदिरातील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा मुहूर्त जाहीर झाला आहे. येत्या 22 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजून 45 मिनिटांनी सोहळ्याला प्रारंभ होईल व 23 जानेवारी रोजी रात्री एक वाजेपर्यंत मुख्य सोहळ्याचा मुहूर्त असेल.

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी सांगितले की, 22 जानेवारी रोजी पावन मुहूर्तावर सुरू होणार्‍या या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, 4 हजार संत आणि 140 पंथांचे प्रतिनिधी या सोहळ्यात सहभागी होतील.

याशिवाय या सोहळ्यासाठी विविध भागांतून 2500 जणांना विशेष निमंत्रित म्हणून बोलावण्यात आले असून त्यात शहीद जवानांचे कुटुंब, दिवंगत कारसेवकांचे कुटुंबीय यांचाही समावेश असेल. वाराणसीचे वैदिक पुरोहित लक्ष्मीकांत दीक्षित हे 22 जानेवारीच्या मुख्य प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे पौरोहित्य करतील. ज्योतिषी व वेदशास्त्र संपन्न पुरोहितांशी चर्चा केल्यानंतर 22 जानेवारीला शुभ मुहूर्ताच्या काळात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी व सरसंघचालक मोहन भागवत यांची यावेळी प्रमुख उपस्थिती असणार आहे, असेही चंपतराय म्हणाले. या कार्यक्रमाला राजशिष्टाचाराचा भाग म्हणून राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचीही उपस्थिती असेल. राय म्हणाले की, पंतप्रधान मोदी मंदिर परिसराबाहेर पडल्यानंतरच इतरांना रामलल्लाचे दर्शन घेता येईल.

आसनक्षमता मर्यादित असल्याने निमंत्रित पाहुण्यांना रामजन्मभूमी परिसरातील स्थानावर तीन तास आधी आपल्या जागी येऊन बसावे लागेल. ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींनी प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाल्यावर दर्शनाला यावे, असे आवाहन राय यांनी केले.

राय म्हणाले की, या कार्यक्रमाला येणार्‍या निमंत्रितांना आधार कार्ड सोबत बाळगणे अनिवार्य करण्यात आले आहे. या सोहळ्यासाठी जागा अत्यंत मर्यादित असून 100 हून माध्यम प्रतिनिधींनाच प्रवेश दिला जाणार आहे.

Back to top button