मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस तातडीने दिल्लीला | पुढारी

मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस तातडीने दिल्लीला

नवी दिल्ली/मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवारी तातडीने दिल्लीत दाखल झाले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अटर्नी जनरल वेंकटरमणी यांची त्यांनी भेट घेतली असल्याचे सूत्रांनी सांगितले. या दौर्‍यात अमित शहा यांच्याशी मंत्रिमंडळ विस्तार, महामंडळ वाटप आणि आमदार अपात्रता कारवाई, या विषयांवर चर्चा झाल्याचेही सांगण्यात आले.

अजित पवार मुंबईतच

दुसरीकडे, राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार हे मात्र मुंबईतच थांबल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. मागील काही दिवसांत राज्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. राज्य मंत्रिमंडळाचा रखडलेला विस्तार, महामंडळ वाटप, आमदार अपात्रता कारवाई आणि सगळ्यात महत्त्वाच्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. त्यातच मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी केलेला महाराष्ट्र दौरा आणि राज्य सरकारला दिलेली अंतिम मुदत संपली आहे. सरकारने काहीच हालचाली केल्या नसल्याने बुधवारपासून त्यांनी पुन्हा उपोषण सुरू केले आहे. त्यामुळे हा प्रश्न चिघळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे-फडणवीस यांची भेट महत्त्वाची आहे.

मंत्रिमंडळ विस्ताराला परवानगी मिळणार

गेल्या महिन्यात 30 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची बैठक झाली होती. अचानक झालेल्या या बैठकीमुळे अनेक चर्चांना उधाण आले होते. पितृपंधरवड्यानंतर राज्यात सरकार एक महत्त्वाचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने ही बैठक झाली होती, असे त्यावेळी सांगण्यात आले होते. आता पितृपक्षानंतर नवरात्रौत्सवही संपल्याने मंत्रिमंडळ विस्तार आणि महामंडळ वाटपावर शिक्कामोर्तब होण्याची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.

Back to top button