गाझा पट्टीत मृत्यूचे तांडव ! दर 15 मिनिटाला होतोय एका चिमुकल्याचा मृत्यू | पुढारी

गाझा पट्टीत मृत्यूचे तांडव ! दर 15 मिनिटाला होतोय एका चिमुकल्याचा मृत्यू

पुढारी ऑनलाईन : पॅलेस्टाईन आणि इस्रायल या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांनी जगाच लक्ष आपल्याकडे खेचून घेतलं आहे. गेले अनेक दिवस गाझा पट्टी या दोन्ही देशांच्या हल्ले -प्रतिहल्ल्यात होरपळते आहे. पण या हल्ल्याची सर्वात जास्त झळ बसते आहे ती तेथील सामान्य नागरिकांना. दोन्ही देशाकडचे हजारांहून अधिक नागरिक या हल्ल्यात मृत्यूमुखी पडताना दिसत आहेत. पण याहून धक्कादायक बातमी अशी कि, गेल्या बारा दिवसांत जवळपास 1030 हून अधिक लहान मुलांचा हवाई हल्ल्यात मृत्यू झाला आहे.

या आकडेवारीकडे पाहिलं कि असं लक्षात येईल गाझा पट्टीत दर 15 मिनिटाला एका चिमुकल्याचा मृत्यू होतो आहे. इस्त्रायली सैन्याने ऑपरेशन आयर्न स्वॉर्ड्स नावाने मोठ्या प्रमाणावर लष्करी कारवाई सुरू केली. या कारवाईचं रूपांतर आता धुमश्चक्रीत झालेलं आहे. DCIP मधील गाझा क्षेत्राचे वरिष्ठ संशोधक मोहम्मद अबू रुकबेह म्हणतात, ‘या युद्धाचा परिणाम केवळ आपण गमावलेल्या बळींवरच होणार नाही. तर काहीजण अजूनही उद्ध्वस्त घरांच्या ढिगाऱ्याखाली अडकलेले आहेत त्यांच्यावर तसेच हा परिणाम होणार आहे. आमचे नागरिक, लहान मुले यांच्यावर होणाऱ्या मानसिक आघाताची भरपाई कशातच होऊ शकत नाही.

गाझामधील आरोग्य मंत्रालयाने दिलेली मृत्यू आणि दुखापतींची संख्या केवळ रुग्णालयात दाखल झालेल्या लोकांसाठीच आहे. त्यामुळे किमान अंदाजे अतिरिक्त 1,000 पॅलेस्टिनी नष्ट झालेल्या इमारतींच्या ढिगाऱ्याखाली बेपत्ता आहेत. या आकडेवारीची तुलना करता आतापर्यंत मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्याच अधिक आहे. युनायटेड नेशन्सच्या रिपोर्टनुसार आतापर्यंत सहा लाखांहून अधिक पॅलेस्टिनी लोक विस्थापित झाले आहेत

गाझावरील बॉम्बहल्ल्यात वाचलेली मुले फारशा उत्तम स्थितीत नाहीयेत. 16 वर्षांचा लष्करी वेढा, भीतीच्या छायेत जगणं आणि आता होणारा हल्ला यामुळे ही मुले मानसिकदृष्ट्या अत्यंत खचलेली आहेत. अगदी शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा गाझा पट्टीत पूर्णपणे विजेअभावी अंधार होता. अशा वेळी हॉस्पिटलमधील इंधनाचा साठा आणि बॅकअप जनरेटर 24 तासांपेक्षा जास्त काळ टिकणे अपेक्षित नाही. याशिवाय पुरेसा पाणीसाठा नसणं, मूलभूत सोई सुविधांची असलेली वानवा यामुळे गाझा पट्टीत युद्ध थांबलं तरी त्याचे व्रण हे बराच काळ तिथल्या मुलांना मानसिक आणि शारीरिक त्रास देत राहतीलच.

हेही वाचा : 

Back to top button