Indian Air Force Day : हवाई दलाला मिळाला नवा ध्वज | पुढारी

Indian Air Force Day : हवाई दलाला मिळाला नवा ध्वज

प्रयागराज, वृत्तसंस्था : आपल्या 91 व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने भारतीय हवाई दलाला नवा ध्वज मिळाला आहे. येथे पार पडलेल्या दिमाखदार संचलन कार्यक्रमात या ध्वजाचे अनावरण हवाई दल प्रमुख व्ही. आर. चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. तब्बल 72 वर्षांनंतर हा बदल करण्यात आला आहे. यावेळी विमानांच्या चित्तथरारक कसरती सादर करण्यात आल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हवाई दलाला यानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

यानिमित्त आयोजित संचलनात प्रथमच महिलांच्या तुकडीने भाग घेतला. या तुकडीचे नेतृत्व ग्रुप कॅप्टन शालिजा धामी यांनी केले. हवाई दल प्रमुख चौधरी यांनी सलामी स्वीकारल्यानंतर त्यांच्या हस्ते नव्या ध्वजाचे अनावरण करण्यात आले. याप्रसंगी हवाई दलाचा जुना ध्वज उतरवून सन्मानपूर्वक हवाई दल प्रमुखांना सुपूर्द करण्यात आला. आता हा ध्वज वायुसेना संग्रहालयात प्रदर्शित केला जाणार आहे.

आठ ऑक्टोबर हा दिवस ‘भारतीय वायुसेना दिन’ म्हणून साजरा केला जातो. 1932 साली याच दिवशी भारतीय हवाई दलाची स्थापना झाली होती. जगातील सर्वाधिक शक्तिशाली हवाई दलांपैकी एक म्हणून हे दल ओळखले जाते. त्याचे सामर्थ्य गेल्या काही वर्षांपासून सातत्याने वाढत चालले आहे.

ही आहे खासियत

नव्या ध्वजावर उजव्या कोपर्‍यात भारतीय हवाई दलाचे बोधचिन्ह असून त्यामध्ये हिमालयीन गरुड आणि अशोक स्तंभाची भर पडली आहे. या नव्या रूपात भारतीय हवाई दलाचा ध्वज दिमाखात फडकला.

Back to top button