बंधारे भरण्यासाठी भामा आसखेडमधून सोडले पाणी. | पुढारी

बंधारे भरण्यासाठी भामा आसखेडमधून सोडले पाणी.

भामा आसखेड : पुढारी वृत्तसेवा : खेडच्या भामा आसखेड धरणातून 1 हजार क्युसेकने भामा नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आला आहे. या पाण्यातून तालुक्यातील भीमा व भामा नदीवरील 10 बंधारे भरणार आहेत. तसेच, या पाण्याचा फायदा उन्हाळी पिकांसह विविध गावांतील पाणीपुरवठा योजनांना होणार आहे. उन्हाळी पिकांसाठी तालुक्यातील शेतकर्‍यांनी धरणातून पाणी सोडण्याची मागणी केली होती. या मागणीनुसार भामा आसखेड धरण उपविभागाचे सहाय्यक अभियंता अश्विन पवार यांनी सूचना करताच धरणाच्या आयसीपीओमधून पाणी सोडण्यात आले.

या पाण्यामुळे खेड तालुक्यातील भामा व भीमा नदीवरील सिद्धेगव्हाणपर्यंतचे 10 कोल्हापुरी पद्धतीचे 10 बंधारे भरले जाणार आहेत. या पाण्याचा फायदा शेती पिकांना आणि नदीकाठावरील गावच्या पाणी योजनांना होणार आहे. पाणी सोडल्यामुळे शेतकरीवर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे. हे पाणी थोपटवाडी, शेलू, आसखेड, चांदुस, पिंपरी बुद्रुक व संतोषनगर, वाकी खुर्द बंधार्‍यापर्यंत आले असून, पुढील बंधार्‍यात जात आहे. दरम्यान, धरणातून पाणी सोडल्यानंतर नदीकाठच्या शेतकर्‍यांना सावध राहण्याच्या सूचना धरण प्रशासनाने दिल्या आहेत.

धरणात 1.77 टीएमसी पाणीसाठा

भामा आसखेड धरण 8.14 टीएमसी क्षमतेचे असून, सध्या धरणात रविवारी (दि. 12) 1.77 टीएमसी पाणीसाठा आहे. सध्या धरणातील पाण्याची पातळी 656.40 द.ल.घ.मी. आहे. एकूण पाणीसाठा 63.654 द.ल.घ.मी., तर धरणाचा उपयुक्त पाणीसाठा 50.132 द.ल.घ.मी. आहे. धरणात फक्त 23 टक्के पाणीसाठा आहे. धरणातील पाण्याचा फायदा भामा-भीमा नदीवरील सर्व बंधारे भरल्यानंतर विसर्ग बंद करण्यात येणार असल्याची माहिती धरण विभागाचे शाखा अभियंता नीलेश घारे यांनी दिली.

शेतकर्‍यांनी थेट धरणावर केली घोषणाबाजी

पिंपरी बुद्रुकचे शेतकरी विकास ठाकूर, रामराव ठाकूर, राहुल गोसावी, सचिन काळे, मयूर वाळुंज, गणेश ठाकूर, शांताराम ठाकूर, गणेश हुंडारे, रोहिदास हुंडारे, सुमीत भुजबळ, अजिंक्य कलवडे, बाळासाहेब डावरे, गणेश राळे आदींनी धरणावर जाऊन घोषणाबाजी करीत पाणी सोडण्याची मागणी केली होती. ती मागणी आता फळाला आली आहे.

हेही वाचा

Back to top button