Closing Bell | सेन्सेक्स २५५ अंकांनी घसरला, अदानी स्टॉक्सने बिघडला मार्केटचा मूड, जाणून घ्या आजचे मार्केट | पुढारी

Closing Bell | सेन्सेक्स २५५ अंकांनी घसरला, अदानी स्टॉक्सने बिघडला मार्केटचा मूड, जाणून घ्या आजचे मार्केट

पुढारी ऑनलाईन : मजबूत जागतिक संकेत असतानाही आज गुरुवारी शेअर बाजारात घसरण झाली. याआधी तीन दिवस बाजारात तेजी राहिली होती. पण आज या तेजीला ब्रेक लागला. सेन्सेक्स २५५ अंकांनी घसरून ६४,८३१ वर बंद झाला. तर निफ्टी ९३ अंकांच्या घसरणीसह १९,२५३ वर स्थिरावला. शेअर बाजारात अदानी शेअर्समधील घसरणीचा मोठा परिणाम दिसून आला. (Stock Market Closing Bell)

बाजारात क्षेत्रीय पातळीवर आज संमिश्र कल दिसून आला. ऑईल आणि गॅस, पॉवर, एफएमसीजी आणि बँक हे ०.४ ते १.३ टक्क्यांनी घसरले. तर रियल्टी, मेटल, कॅपिटल गुड्स, आयटी हे ०.३ ते १ टक्क्यांनी वधारले. बीएसई मिडकॅप निर्देशांक किरकोळ वाढीसह बंद झाला, तर स्मॉलकॅप निर्देशांक ०.९ टक्क्यांनी वाढला. ऑर्गेनाइज्ड क्राइम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्टने त्यांच्या रिपोर्टमध्ये अदानी समुहावर शेअर्समध्ये फेरफार केल्याचा आरोप केला. यानंतर अदानीचे शेअर्स गडगडले.

‘हे’ शेअर्स घसरले

सेन्सेक्सवर बजाज फायनान्सचा शेअर १ टक्क्याहून अधिक घसरून ७,१७३ रुपयांवर आला. इंडसइंड बँक, एसबीआय, कोटक बँक हे शेअर्स १ टक्क्याने खाली आले. हिंदुस्तान युनिलिव्हर, पॉवर ग्रिड, एशियन पेंट्स, नेस्ले इंडिया, टीसीएस, बजाज फिनसर्व्ह हेही घसरले. दरम्यान, सुरुवातीला जियो फायनान्सियल शेअरने आघाडी घेतली होती. सुरुवातीला हा शेअर ५ टक्के वाढून २४४ रुपयांवर पोहोचला होता. त्यानंतर तो २४० रुपयांवर स्थिरावला. शुक्रवारी बाजार खुला होण्यापूर्वी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस (JFSL) ला सर्व S&P BSE निर्देशांकांमधून हटवले जाईल, असे एक्सचेंजने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे. आज जिओ फायनान्शियल सोबतच मारुती, टायटन, टाट स्टील, अल्ट्राटेक सिमेंट, टेक महिंद्रा, एचसीएल टेक हे शेअर्सही वाढले.

निफ्टीवर अदानी एंटरप्रायजेसचा शेअर ४ टक्क्यांनी घसरला. बीपीसीएल, अदानी पोर्ट्स हे शेअर्स ३ टक्क्यांनी खाली आले. ब्रिटानिया, आयशर मोटर्स हे देखील टॉप लूजर्समध्ये होते. तर मारुती, सिप्ला, एचडीएफसी लाईफ, जियो फायनान्सियल हे शेअर्स तेजीत राहिले.

अदानींना ३५,६०० कोटींचा फटका

हिंडेनबर्गनंतर आता ऑर्गेनाइज्ड क्राइम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्ट (OCCRP) नावाच्या एक जागतिक संघटनेने गौतम अदानी समुहावर शेअर्समध्ये फेरफार केल्याचा आरोप केलाय. यानंतर शेअर बाजारात खळबळ उडाली आणि अदानी समुहाच्या कंपन्यांचे काही शेअर्स ५ टक्क्यांपर्यंत घसरले. ओएसएसआरपीच्या अहवालानुसार, अदानी समूहाने गुपचूपपणे स्वत:चे शेअर्स खरेदी करून शेअर बाजारात लाखो डॉलर्स गुंतवले आहेत. याचे पडसाद शेअर बाजारात उमटले. यामुळे अदानी समुहाला शेअर बाजारात ३५,६०० कोटींचा फटका बसला. (Adani stock crash)

यानंतर बीएसईवर अदानी एंटरप्रायझेसचा शेअर ५ टक्क्यांनी घसरून २,३८५ रुपयांच्या निचांकी पातळीवर पोहोचला. अदानी पोर्ट्स २.९२ टक्क्यांनी घसरून ७९५ रुपयांवर आला. अदानी पॉवर ४ टक्क्यांनी घसरून ३१३ रुपयांवर आला. अदानी एनर्जी सोल्युशन्स (पूर्वीचा अदानी ट्रान्समिशन) चा शेअर ३.५३ टक्क्यांनी घसरला. अदानी ग्रीनचा शेअर ४.३७ टक्क्यांनी घसरून ९२८ रुपयांवर आला. अदानी विल्मर, अदानी टोटल गॅस, एसीसी आणि एनडीटीव्ही ३ टक्क्यांपर्यंत घसरले. या शेअर्समधील घसरणींमुळे त्यांच्या १० कंपन्यांचे एकत्रित बाजार भांडवल ३५,६०० कोटी रुपयांनी कमी झाल्याचे वृत्त बिझनेस टुडेने दिले आहे. (Stock Market Closing Bell)

अमेरिकेतील शेअर बाजारात काल सलग चौथ्या दिवशी तेजी राहिली. या पार्श्वभूमीवर आशियाई बाजारातील निर्देशांकही वधारले आहेत.

हे ही वाचा :

 

Back to top button