Adani stock crash | OCCRP इफेक्ट! अदानींचे शेअर्स कोसळले, ३५,६०० कोटींचा फटका | पुढारी

Adani stock crash | OCCRP इफेक्ट! अदानींचे शेअर्स कोसळले, ३५,६०० कोटींचा फटका

पुढारी ऑनलाईन : हिंडेनबर्गनंतर आता ऑर्गेनाइज्ड क्राइम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्ट (OCCRP) नावाच्या एक जागतिक संघटनेने गौतम अदानी समुहावर शेअर्समध्ये फेरफार केल्याचा आरोप केलाय. यानंतर शेअर बाजारात खळबळ उडाली आणि अदानी समुहाच्या कंपन्यांचे काही शेअर्स ५ टक्क्यांपर्यंत घसरले. ओएसएसआरपीच्या अहवालानुसार, अदानी समूहाने गुपचूपपणे स्वत:चे शेअर्स खरेदी करून शेअर बाजारात लाखो डॉलर्स गुंतवले आहेत. याचे पडसाद शेअर बाजारात उमटले. यामुळे अदानी समुहाला शेअर बाजारात ३५,६०० कोटींचा फटका बसला आहे. (Adani stock crash)

यानंतर बीएसईवर अदानी एंटरप्रायझेसचा शेअर ५ टक्क्यांनी घसरून २,३८५ रुपयांच्या निचांकी पातळीवर पोहोचला. अदानी पोर्ट्स २.९२ टक्क्यांनी घसरून ७९५ रुपयांवर आला. अदानी पॉवर ४ टक्क्यांनी घसरून ३१३ रुपयांवर आला. अदानी एनर्जी सोल्युशन्स (पूर्वीचा अदानी ट्रान्समिशन) चा शेअर ३.५३ टक्क्यांनी घसरला. अदानी ग्रीनचा शेअर ४.३७ टक्क्यांनी घसरून ९२८ रुपयांवर आला. अदानी विल्मर, अदानी टोटल गॅस, एसीसी आणि एनडीटीव्ही ३ टक्क्यांपर्यंत घसरले. या शेअर्समधील घसरणींमुळे त्यांच्या १० कंपन्यांचे एकत्रित बाजार भांडवल ३५,६०० कोटी रुपयांनी कमी झाल्याचे वृत्त बिझनेस टुडेने दिले आहे.

आजच्या ट्रेडिंग सत्रात अदानी समुहाच्या शेअर्सवर मोठा दबाव दिसून आला. अदानी समुहाच्या १० सूचीबद्ध कंपन्यांचे एकत्रित बाजार भांडवल बुधवारच्या १०,८४,६६८.७३ कोटी रुपयांच्या तुलनेत गुरुवारी ३५,६२४ कोटी रुपयांनी कमी होऊन १०,४९,०४४ कोटी रुपयांवर आले.

अदानी एंटरप्रायझेसचे बाजार भांडवल ९,५७० कोटी रुपयांनी घसरले तर अदानी ग्रीन एनर्जीचे बाजार भांडवल ६,२०० कोटी रुपयांनी कमी झाले आहे. अदानी पोर्ट्स आणि अदानी पॉवरच्या बाजार भांडवलातील घट ही ५ हजार ते ५,३०० कोटी रुपयांची आहे. अदानी एनर्जी सोल्युशन्सने ३ हजार कोटी बाजार भांडवल गमावले आहे. तर अंबुजा सिमेंट्सचे बाजार भांडवल २,६८० कोटींनी घसरले आहे. (Adani stock crash)

काय आहे नेमकं प्रकरण?

ओएसएसआरपीने आरोप केला आहे की, प्रमोटर परिवाराच्या भागीदारांद्वारे मॉरिशस येथील एका निनावी गुंतवणूक निधीद्वारे अदानी समूहाच्या शेअर्समध्ये लाखो डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. दरम्यान, अदानी समुहाने हे आरोप फेटाळून लावले आहेत.

ओएसएसआरपी संघटनेला अब्जाधीश जॉर्ज सोरोस आणि रॉकफेलर ब्रदर्स फंड यांच्यासारख्या संस्थांकडून निधी मिळतो. जॉर्ज सोरोस हे अब्जाधीश असून त्यांनी अनेकवेळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. याआधी जानेवारी माहिन्यात अमेरिकेतील शॉर्ट सेलर हिंडेनबर्गने अदानी समुहावर फसवणूक आणि स्टॉक किंमतीत फेरफार केल्याचा आरोप केला होता. आता ओसीआरपी संघटनेने अदानी समुहावर गंभीर आरोप केले आहेत. याचा फटका अदानी समुहाला बसला आहे.

मल्टिपल टॅक्स हेव्हन्स आणि अदानी समुहाच्या अंतर्गत ईमेलच्या फायलींच्या आढाव्याचा हवाला देत नॉन-प्रॉफिट मीडिया संस्था OCCRP ने म्हटले आहे की, त्यांच्या तपासणीत किमान दोन प्रकरणे आढळून आली आहेत, जिथे गुंतवणूकदारांनी अशा ऑफशोर स्ट्रक्चर्सद्वारे अदानी शेअर्सची खरेदी आणि विक्री केली. (Adani stocks fall)

अदानी समूहाने आरोप फेटाळले

OCCRP ने केलेल्या आरोपांवर अदानी समुहाने खुलासा केला आहे. त्यांनी म्हटले आहे की “आम्ही हे आरोप स्पष्टपणे फेटाळतो. हे दावे एका दशकापूर्वीच्या बंद झालेल्या प्रकरणांवर आधारलेले आहेत जेव्हा महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) ओव्हर इनव्हॉइसिंग, परदेशात निधी हस्तांतरित करणे, संबंधित पक्षांचे व्यवहार आणि विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणुकीच्या माध्यमातून झालेल्या गुंतवणुकीशी संबंधित आरोपांची चौकशी केली होती. (Adani Group)

हे ही वाचा :

Back to top button