आता सूर्यविजय; शनिवारी झेप! | पुढारी

आता सूर्यविजय; शनिवारी झेप!

बंगळूर, वृत्तसंस्था : ‘आदित्य एल-1’चे प्रक्षेपण 2 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजून 50 मिनिटांनी करण्यात येणार आहे. आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ स्थानकावरून ‘पीएसएलव्ही-एक्सएल’ या महाबली रॉकेटच्या माध्यमातून ‘आदित्य एल-1’ अंतराळात पाठवले जाईल. ‘इस्रो’ या भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची ही पहिली सौरमोहीम आहे. मोहिमेंतर्गत येत्या 4 महिन्यांत पृथ्वीपासून 15 लाख कि.मी. अंतरावर ‘आदित्य एल-1’ सूर्याच्या प्रभामंडळातील ‘एल-1’ बिंदूवर पोहोचणार आहे.

सूर्याचा अभ्यास करणारी ‘आदित्य एल-1’ ही पहिली अंतराळआधारित भारतीय प्रयोगशाळा आहे. सूर्याभोवती असलेल्या कोरोनाचे (प्रभामंडळ) निरीक्षण, अध्ययन हा उपग्रह करेल. सूर्य-पृथ्वीदरम्यान पृथ्वीपासून 1.5 दशलक्ष कि.मी., तर सूर्यापासून 148.5 द.ल.कि.मी. अंतरावर असलेल्या ‘एल-1’ अर्थात लॅग्रेंज बिंदूवर (लॅग्रेंज पॉईंट) राहून सौरवादळांचा स्रोत काय, तीव्रता काय, परिणामकारता काय, या सगळ्यांचे गणित हा उपग्रह समजून घेईल. या बिंदूवर पोहोचण्यासाठी सुमारे 120 दिवस म्हणजे 4 महिने लागतील.

बंगळूरमधील यू. आर. राव उपग्रह केंद्रात हा उपग्रह तयार करण्यात आला असून, 2 आठवड्यांपूर्वीच तो ‘इस्रो’च्या श्रीहरिकोटा अंतराळ स्थानकावर पोहोचला आहे. ‘आदित्य एल-1’ हा विविध देशांतर्गत संस्थांच्या सहभागातून तयार करण्यात आला आहे. पूर्णतः स्वदेशी आहे. बंगळूरमधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अ‍ॅस्ट्रोफिजिक्सच्या (आयआयए) कोरोनाग्राफने या यानाचे पेलोड तयार केले आहेत. पुण्यातील इंटर-युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अ‍ॅस्ट्रॉनॉमी अँड अ‍ॅस्ट्रोफिजिक्सने या मोहिमेसाठी सोलर अल्ट्राव्हायोलेट इमेजर पेलोड विकसित केले आहेत.

‘एल-1’ पॉईंट काय?

‘एल-1’ हा एक लॅग्रेंज पॉईंटच आहे. पृथ्वी आणि सूर्य यांच्यादरम्यान सूर्य आणि पृथ्वीचे गुरुत्वबल संतुलित असलेले ‘एल-1’ ते ‘एल-5’ असे एकूण 5 पॉईंट (ठिकाणे) आहेत. या 5 ही पॉईंटवर सूर्य आणि पृथ्वीच्या गुरुत्वबलाच्या संतुलनाने केंद्रोपसारकबल (सेन्ट्रिफ्युगल फोर्स) तयार होऊन ते बल या ठिकाणी एखादी वस्तू आल्यास तिला दोहोंच्या (सूर्य आणि पृथ्वी) मध्ये स्थिर स्थितीत ठेवते. पहिला लॅग्रेंज पॉईंट म्हणजेच ‘एल-1’ होय. तो पृथ्वीपासून 1.5 दशलक्ष कि.मी.वर असून, या ठिकाणी कोणतीही वस्तू सूर्य आणि पृथ्वीदरम्यान स्थिर राहू शकते.

कोणते पेलोड काय करेल?

लॅग्रेंज बिंदूवरून हे यान सूर्याच्या फोटोस्फियर, क्रोमोस्फियर आणि सर्वात बाहेरील थर असलेल्या कोरोनाचे अध्ययन करेल आणि आपली निरीक्षणे नोंदवेल.
अल्ट्राव्हायोलेट पेलोड : याचा वापर कोरोनाच्या (सूर्याच्या प्रभामंडळातील सर्वात शेवटचा थर) निरीक्षणासाठी केला जाईल.
पार्टिकल डिटेक्टर : सूर्याच्या प्रभामंडळातून येणार्‍या, तसेच लॅग्रेंज पॉईंट-1 वरील कणांचे निरीक्षण, अध्ययन करेल.
मॅग्नेटोमीटर पेलोड : प्रभामंडल कक्षेपर्यंतच्या सूर्याच्या चुंबकीय क्षेत्राविषयी माहिती नोंदवेल.
वेल्स पेलोड : सूर्याची हायरिझॉल्युशन छायाचित्रे घेईल. स्पेक्ट्रॉस्कोपी (रंग, लहरींचे मूल्यांकन), पोलॅरीमेट्रीही (ध्रुवणमापन) करेल.

Back to top button