Closing Bell | सेन्सेक्स २६७ अंकांनी वाढून बंद, ‘या’ शेअर्समुळे बाजाराला मिळाला सपोर्ट | पुढारी

Closing Bell | सेन्सेक्स २६७ अंकांनी वाढून बंद, 'या' शेअर्समुळे बाजाराला मिळाला सपोर्ट

पुढारी ऑनलाईन : आशियाई बाजारात कमकुवत स्थिती असतानाही भारतीय शेअर बाजारात आज आठवड्याच्या पहिली दिवशी तेजी राहिली. सेन्सेक्स आज २६७ अंकांनी वाढून ६५,२१६ वर बंद झाला. तर निफ्टी ८३ अंकांच्या वाढीसह १९,३९३ वर स्थिरावला. रियल्टी, मेटल, पॉवर आणि कॅपिटल गुड्स १ ते २ टक्क्यांनी वाढले. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकात जवळपास प्रत्येकी १ टक्का वाढ झाली. आजच्या ट्रेडिंग सत्रात चौफेर खरेदी दिसून आली. यामुळे बाजाराला सपोर्ट मिळाला.

निफ्टीवर बजाज फायनान्स, अदानी पोर्ट्स, पॉवर ग्रिड, अदानी एंटरप्रायजेस आणि हिंदाल्को इंडस्ट्रीज हे शेअर्स टॉप गेनर्स होते. तर रिलायन्स, एम अँड एम, ब्रिटानिया इंडस्ट्रीज, एसबीआय लाईफ इन्शुरन्स आणि बजाज ऑटो हे घसरले. (Stock Market Closing Bell)

बजाज फायनान्स टॉप गेनर

सेन्सेक्स आज सोमवारी ६४,८५२ वर खुला झाला होता. त्यानंतर तो ६५,३३५ पर्यंत वाढला. सेन्सेक्सवर बजाज फायनान्सचा शेअर २.६३ टक्के वाढून ७,०४२ रुपयांवर पोहोचला. इंडसइंड बँकेचा शेअरही २ टक्के वाढून १,३९९ रुपयांवर गेला. भारती एअरटेल, एनटीपीसी, आयटीसी, बजाज फिनसर्व्ह,, इन्फोसिस, टीसीएस, टाटा स्टील हे शेअर्स १ ते २ टक्क्यांपर्यंत वाढले. तर रिलायन्स, एम अँड एम, मारुती हे शेअर्स घसरले.

जियो फायनान्सियलला लोअर सर्किट

रिलायन्समधून वेगळ्या झालेल्या जियो फायनान्सियल सर्व्हिसेसची (Jio Financial Services) आज शेअर बाजारात एंट्री झाली. जियो फायनान्सियल सर्व्हिसेसचा शेअर आज बाजारात लिस्ट झाला. या शेअरचे बीएसई निर्देशांकावर २६५ रुपयांवर लिस्टिंग झाले. तर एनएसईवर हा शेअर २६२ रुपयांवर लिस्ट झाला. रिलायन्समधून जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचे डिमर्जर झाले होते. त्यानंतर हा शेअर आज लिस्ट झाला. दरम्यान, लिस्टिंगनंतर बीएसईवर या शेअरला ५ टक्क्यांचे लोअर सर्किट लागले. बीएसईवर हा शेअर ५ टक्क्यांनी खाली येऊन २५१ रुपयांवर आला. तर रिलायन्सचा शेअरही १ टक्क्यांच्या घसरणीसह २,५२६ रुपयांवर ट्रेड करत आहेत.

Jio Fin राहणार ट्रेड- टू- ट्रेड सेगमेंटमध्ये

५ टक्के सर्किट मर्यादेमुळे या शेअर्समध्ये कोणताही मोठा चढ-उतार होण्याची शक्यता नाही, असे बाजारातील विश्लेषकांचे म्हणणे आहे. एखाद्या दिवशी शेअर बाजारात मोठी पडझड झाली अथवा बाजाराने उसळी घेतली तर लोअर किंवा अप्पर सर्किट लावले जाते. दरम्यान, जियो फायनान्सियलचा शेअर जरी लिस्टिंग झाला असला तरी पुढील १० ट्रेडिंग दिवसांत हा शेअर इंट्रा-डे- ट्रेडिंग करणार नाही. तर १० ट्रेडिंग सत्रात हा शेअर ट्रेड- टू- ट्रेड सेगमेंटमध्ये (Trade-to-Trade segment) राहील.

परदेशी गुंतवणूक किती?

नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या आकडेवारीनुसार, परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी मागील सत्रात २६७ कोटी रुपयांच्या भारतीय शेअर्सची विक्री केली. तर देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांनी ३३९ कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले.

आशियाई बाजारात घसरण

आज आशियाई शेअर बाजारांमध्ये कमकुवत स्थिती दिसून आली. याचे कारण म्हणजे चीनने बाजाराच्या अंदाजापेक्षा कमी व्याजदरात कपात केली आहे. त्यामुळे जपान आणि इतर आशियाई शेअर बाजारांमध्ये नरमाईचा कल दिसून आला. (Stock Market Closing Bell)

हे ही वाचा :

Back to top button