INS Kirpan : भारताची व्हिएतनामला स्वदेशी ‘आयएनएस कृपाण’ भेट | पुढारी

INS Kirpan : भारताची व्हिएतनामला स्वदेशी 'आयएनएस कृपाण' भेट

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : दक्षिण चीन समुद्रात चीनची वाढती आगळीकता लक्षात घेता भारत नौदलातील स्वदेशी निर्मित मिसाईल कोरवेट ‘आयएनएस कृपाण’ (INS Kirpan) भेट स्वरूपात देणार आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारत आणि व्हिएतनाम दरम्यान संरक्षण सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी सोमवारी व्हिएतनामचे समकक्ष जनरल फान वान गियांग यांच्यासोबत राजधानी दिल्लीत द्विपक्षीय वार्ता केली. वार्ता दरम्यान संरक्षण क्षेत्रासंबंधी विविध मुद्दयावर सिंह आणि गियांग यांनी आढावा घेतला.

स्वदेशी निर्मित इन-सर्विस मिसाईल कोरवेट ‘आयएनएस कृपाण’ (INS Kirpan) व्हिएतनाम पिपल्स नौदलाची क्षमता वृद्धिंगत करण्यात एक मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास सिंह यांनी यानिमित्ताने व्यक्त केला. गियांग दोन दिवसीय भारत दौऱ्यावर होते. राष्ट्रीय युद्ध स्मारकावर पुष्पांजली अर्पित करीत गियांग यांनी त्यांच्या भारत दौऱ्याची सुरूवात केली. दोन्ही देशाच्या संबंधांसाठी ही वार्ता एक महत्वपूर्ण स्तंभ असल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाने दिली आहे.

करारवर हस्ताक्षर

मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही देशांमध्ये संरक्षण, लष्कर, उच्च स्तरीय दौरे, प्रशिक्षण कार्यक्रम, संयुक्त राष्ट्र शांती स्थापना तसेच द्विपक्षीय सेवांसंबंधी व्यापक संपर्क समाविष्ट आहे. यापूर्वी 2022 मध्ये राजनाथ सिंह यांनी व्हितनामचा दौरा केला होता. या दौऱ्यादरम्यान दोन्ही देशांमध्ये संरक्षण सहकार्यावर संयुक्त व्हिजन स्टेटमेंट तसेच म्यूचअल लॉजिस्टिक सपोर्ट करारवर हस्ताक्षर करण्यात आले होते.

दोन्ही देशांनी विविध द्विपक्षीय संरक्षण सहकार्यासंबंधीच्या प्रगतीचा आढावा घेतला तसेच समाधान व्यक्त केल्याचे मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. सागरी सुरक्षा, बहुराष्ट्रीय सहकार्य तसेच संरक्षण उद्योग सहकार्यासंबंधी उभय देशामध्ये चर्चा झाली. द्विपक्षीय संरक्षण संबंधांना वाढवण्यासह दक्षिण चीन समुद्रात स्थितीचा आढावा घेण्यावर दोन्ही देश लक्ष केंद्रित करीत आहे. या क्षेत्रात चीनची आक्रमकता दिसून आली आहे. वार्ता दरम्यान सीडीएस जनरल अनिल चौहान आणि संरक्षण मंत्रालयाचे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. भारताच्या एक्ट ईस्ट धोरण आणि हिंद-प्रशांत क्षेत्रात व्हिएतनाम एक महत्वाचा भागीदार आहे. जुलै 2007 मध्ये व्हितनामचे तत्कालीन पंतप्रधान गुयेन तान दुंग यांनी भारत यात्रेदरम्यान दोन्ही देशांदरम्यान संबंधांवर रणनीती भागदीरीपर्यंत पोहचले होते.

Back to top button