मुंबई कर्नाटकात काँग्रेस, भाजपमध्ये काटेंकी टक्कर | पुढारी

मुंबई कर्नाटकात काँग्रेस, भाजपमध्ये काटेंकी टक्कर

ज्ञानेश्वर बिजले

कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्र लगत असलेल्या मुंबई कर्नाटक प्रांतातील 50 जागांसाठी सत्ताधारी भाजप आणि काँग्रेस यांच्यामध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. कर्नाटकातील नेत्यांपेक्षाही महाराष्ट्रातील नेत्यांचीच येथे मोठ्या प्रमाणात वर्दळ असल्याचे दिसून आले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी शनिवारी बेळगाव जिल्ह्यात येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही तीन दौरे या भागात झाले. राज्यातील बहुमतासाठी मुंबई कर्नाटक प्रांतात अधिकाधिक जागा जिंकाव्या लागतील, हे लक्षात घेत दोन्ही पक्षांनी त्यांची ताकद पणाला लावली आहे.

बेळगाव जिल्हा आणि परिसरात गेले चार दिवस निवडणूक वातावरण पाहताना दोन्ही पक्षांनी या ठिकाणी प्रचारात जोर लावल्याचे दिसून आले. येथे मराठी भाषिकांची संख्या अधिक असल्याने कर्नाटकातील नेत्यांपेक्षाही महाराष्ट्रातील दिग्गज नेतेच प्रचारात अग्रभागी आहेत. दोन्ही पक्षांचे अनेक नेते या परिसरात ठाण मांडून बसले आहेत. भाजपकडून उपमुख्यमंत्री देवेंद् फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, काँग्रेस कडून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार, निलेश लंके यांनी हजेरी लावली. तर, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या प्रचारासाठी शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांची बेळगावमध्ये सभा झाली राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजीनाम्यावरही येथे जोरदार चर्चा सुरू असल्याचे दिसून आले.

कर्नाटकातील एकंदरीत राजकारणाचा विचार केला तर एकूण 224 जागांपैकी 50 जागा म्हणजे सुमारे 22 टक्के जागा मुंबई कर्नाटक प्रांतात येतात. मुंबई कर्नाटक हा विभाग आता कित्तूर कर्नाटक तसेच उत्तर कर्नाटक या नावाने ओळखला जातो. कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यालगतचा हा परिसर आहे. या विभागात बेळगाव बागलकोट, गडग, हावेरी, आणि विजापूर या सहा जिल्ह्यातील 50 जागांचा समावेश होतो. बंगळुरू शहरानंतर कर्नाटकात सर्वाधिक 18 जागा या बेळगाव जिल्ह्यात आहेत. त्यामुळे सर्वांनीच या भागावर अधिक लक्ष पुरवले आहे.

2018 च्या निवडणुकीत भाजपने 44 टक्के मते मिळवीत 30 जागा जिंकल्या तर काँग्रेसने 39 टक्के मते मिळवीत 17 जागा मिळविल्या. 2013 च्या निवडणुकीत याच्या उलट चित्र होते. तेव्हा काँग्रेसने 38% मते मिळवत 31 जागा तर भाजपने 27 टक्के मते मिळवत 13 जागा जिंकल्या होत्या. तसेच 2013 मध्ये भाजपचे नेते माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी कर्नाटक जनता पक्ष स्थापन करीत दोन जागा जिंकल्या होत्या. मात्र, त्यावेळी भाजपची मत विभागणी मोठ्या प्रमाणावर झाली. धर्मनिरपेक्ष जनता दलाने एक दोन जागा जिंकल्या. त्यामुळे या भागात खरी लढाई काँग्रेस आणि भाजप यांच्यामध्येच आहे.

बेळगाव आणि लगतच्या परिसरात गेल्या तीन-चार दिवसात फिरताना सकाळी प्रचार फेरी तर सायंकाळी कोपरासभा ठिकठिकाणी दिसून येतात. मात्र, लोकांमध्ये फारसा उत्साह नाही. रणरणत्या उन्हामुळे दुपारी प्रचारच होत नाही. काँग्रेसने स्थानिक मुद्दे उपस्थित करण्यावर भर दिला आहे. राज्य सरकारचा भ्रष्टाचार, महागाई बेरोजगारी याच मुद्द्या भोवती काँग्रेसचा प्रचार गुंफला आहे. भाजपने विकासाच्या मुद्द्याबरोबरच हिंदुत्व, बजरंग दलावर बंदी घालण्याची काँग्रेसची भूमिका हे मुद्दे प्रचारात अग्रभागी ठेवले आहेत. बेळगाव जिल्ह्यात 18 जागा आहेत, त्यापैकी गेल्यावेळी भाजपने 10 तर काँग्रेसने आठ जिंकल्या होत्या. यावेळी काँग्रेस जास्त जागा जिंकेल असा स्थानिक जाणकारांचा होरा आहे. महाराष्ट्र एकीकरण समिती ही यावेळी खाते उघडणार का? याची बेळगाव शहरात चर्चा रंगली आहे. समितीने पाच उमेदवार दिले आहेत.

या विभागामध्ये लिंगायत समाजाचे वर्चस्व दिसून येते. त्यामुळे या समाजाचे अधिक उमेदवार आहेत. विजापूर आणि लगतच्या जिल्ह्यात मुस्लिम समाजाचे मतदान मोठ्या संख्येने आहेत, त्यामुळे त्या भागात काँग्रेसचे उमेदवार मोठ्या प्रमाणावर निवडून येतील असा अंदाज आहे. बागलकोट, धारवाड जिल्ह्यात गेल्यावेळी भाजपने अधिक जागा जिंकल्या होत्या. तिथे त्यांचे वर्चस्व राहील असे चित्र आहे.

मुंबई कर्नाटक प्रांतामध्ये 2013 इतकी भाजपची स्थिती वाईट नाही, तर 2018 इतकी चांगली ही नाही. त्यामुळे या दोन्ही वेळी जिंकलेल्या जागांमध्ये कुठेतरी भाजपचे पारडे स्थिरावे, असा येथील जाणकारांचा अंदाज आहे. काँग्रेस मात्र येथे चांगल्या स्थितीत आहे. त्यामुळे भाजपपेक्षा यावेळी काँग्रेसला अधिक संधी असल्याचे मत येथील स्थानिक पत्रकारांनी व्यक्त केले. 50 पैकी 25 पेक्षा अधिक जागा काँग्रेसच्या पारड्यात जातील असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. भाजप मात्र प्रत्येक ठिकाणी जागा टिकविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करत आहे. या भागात दोन्ही पक्षांचे बल समसमान असल्याने काँग्रेसने येथे आघाडी घेतल्यास त्यांना बहुमताकडे जाण्यास जास्त संधी मिळेल, असे मत तज्ञांनी व्यक्त केले.

Back to top button